अन्नपूर्णा देवी
उ. अल्लाउद्दीन खाँ यांच्या कन्या अन्नपूर्णादेवी यांचा जन्म मैहर येथे चैत्रपौर्णिमेस झाला. याच महिन्यात शांती व संपन्नतेची देवी म्हणून अन्नपूर्णेचे पूजन केले जाते. तिचेच प्रतीक समजून मैहर संस्थानचे महाराजा ब्रिजनाथ सिंगांनी त्यांचे नाव अन्नपूर्णा ठेवले. त्यांचे मुस्लीम नाव रोशनआरा होते. त्यांच्या आईचे नाव मदिना बेगम होते.
त्या काळी उस्ताद मंडळी आपल्या कलेचा वारसा आपल्या मुलांनाच देत. अगदी अपवादात्मक परिस्थितीत कन्या, जावई किंवा शिष्याला हा वारसा मिळे. अन्नपूर्णादेवींची मोठी बहीण जहाँआराला तिच्या संगीतप्रेमामुळे लग्नानंतर काही महिन्यांतच मैहरला परतावे लागले आणि त्यातच तिचे दु:खद निधन झाले. या परिस्थितीमुळे संगीताच्या संदर्भात अन्नपूर्णादेवींना शिकवणे हे अल्लाउद्दीन खाँसाहेबांच्या मनात येणे शक्यच नव्हते.
एक दिवस अल्लाउद्दीन खाँ बाहेर गेले असताना अली अकबरना अन्नपूर्णादेवी गाऊन शिकवू लागल्या. अचानक खाँसाहेब आल्यावर त्यांनी ते दृश्य पाहिले. त्या दिवसापासून अन्नपूर्णादेवींचे शिक्षण सुरू झाले. त्यांना प्रथम सतारीवर व नंतर धृपद अंगाच्या वादनासाठी सूरबहारवर शिकविले. त्या वेळी त्यांचे वय वर्षे दहा होते. त्याच वेळी पं. रविशंकरही अल्लाउद्दीन खाँ साहेबांजवळ शिकत होते. पं. रविशंकर यांच्याबरोबर १५ मे १९४१ रोजी अन्नपूर्णादेवींचा विवाह झाला.
रविशंकरांशी झालेल्या विवाहानंतर काही काळातच त्या त्यांच्यासह मुंबईत वास्तव्यास आल्या. तेव्हापासून त्यांचे वास्तव्य व सांगीतिक योगदानाची कर्मभूमी मुंबईच आहे. या दांपत्याला ३० मार्च १९४२ रोजी एक पुत्र झाला. त्याचे नाव शुभेन्द्र ठेवण्यात आले. सतारवादनात तयार झालेल्या या शुभेन्द्रचे १५ सप्टेंबर १९९२ रोजी आकस्मिक निधन झाले.
अन्नपूर्णादेवींनी रविशंकरांबरोबर जुगलबंदीचे कार्यक्रम केले, तसेच एकल कार्यक्रमही केले. ‘इप्टा’ या संस्थेतर्फे ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ या रविशंकरांनी बसविलेल्या बॅलेच्या पार्श्वसंगीतात अन्नपूर्णादेवींचा वादक म्हणून सहभाग होता. त्यांनी १९५५-५६ पासून जाहीर कार्यक्रम करणे बंद केले.
त्यांचा १९८२ मध्ये रविशंकरांशी घटस्फोट झाला. त्याच वर्षी प्रा. ॠषिकुमार पंड्या यांच्याशी त्यांचा दुसरा विवाह झाला. ॠषिकुमार हे अली अकबर व अन्नपूर्णादेवींचे शिष्य, तसेच तणाव व्यवस्थापन (स्ट्रेस मॅनेजमेंट) क्षेत्रातील अग्रगण्य व्यक्तिमत्त्व होय. अन्नपूर्णादेवींना भारत सरकारतर्फे ‘पद्मभूषण’ (१९७७), ‘संगीत नाटक अकादमी’ पुरस्कार (१९९१), विश्वभारती विद्यापीठ (१९८८), असे अनेक पुरस्कार प्राप्त झाले. त्यांना शांतिनिकेतनतर्फे १९९८ साली ‘देशिकोत्तम’, डी.लिट. ही पदवी मिळाली. भारत सरकारने २००४ साली ‘रत्न’ पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला.
अन्नपूर्णादेवींच्या शिष्यांत पं. निखिल बॅनर्जी, शुभेन्द्र शंकर, शाश्वती घोष, अमित रॉय, डॅनियल ब्रॅडले (सतार); बहादुर खान, आशिष खान,ध्यानेश खान, वसंत काब्रा, प्रदीप बारोट (सरोद); तर हरिप्रसाद चौरसिया, नित्यानंद हळदीपूर, मिलिंद शेवडे (बासरी) यांचा समावेश आहे.