अंभोरे,भिवासन लक्ष्मण
भिवासन लक्ष्मण अंभोरे यांचा जन्म अकोला जिल्ह्यातील रायगड या खेड्यात झाला. दि. २२ एप्रिल १९५१ रोजी 'बॉय' म्हणून ते भूसेनेत रुजू झाले. माउण्टन डिव्हिजनच्या खेमकरण विभागात नायब सुभेदार म्हणून कार्यरत होते. सैनिकांच्या एका कंपनीचे म्हणजे सुमारे २४० सैनिकांचे ते त्यावेळी प्रमुख होते. शत्रूच्या प्रदेशात, त्यांनी त्यांच्या या पथकासह तीन वेळा टेहाळणी करून शत्रूची उपयुक्त माहिती मिळवली.
दि. १७ सप्टेंबर १९६५ रोजी पाकिस्तानी सैन्याने रनगाडे आणि मशीनगन्स घेऊन अंभोरे यांच्या तुकडीवर हल्ला केला, तेव्हा अंभोरे यांनी प्रत्येक खंदकात शिरून आपल्या जवानांना धीर दिला. शत्रूशी निकराने लढून हल्ला परतवून लावण्यासाठी उत्तेजन दिलं. त्याच दिवशी दुपारी, पुन्हा पाक सैन्याने जोरदार हल्ला चढवला. शत्रू केवळ १८ यार्डांवर येऊन ठेपला होता. अशा वेळी ते आपल्या एका तुकडीसह पुढच्या खंदकाकडे गेळे आणि तिथून त्यांनी शत्रूवर गोळीबार सुरू केला. अशा प्रकारे अंभोरे यांनी धैर्य, कुशल नेतृत्वाची चुणूक दाखवत, शत्रूला जोराचा तडाखा देत मागे हटवले. या कामगिरीसाठीच भिवासन लक्ष्मण अंभोरे यांना 'वीरचक्र' प्रदान करण्यात आले.
-संपादित