Skip to main content
x

अंपडकर, काशी धोंडू

चव्हाण, काशीबाई महाराज

     काशीबाई धोंडू अंपडकर यांचा जन्म कोकणातील राजापूर तालुक्यातील भूतेखण येथे झाला. त्यांच्या आईचे नाव उमाबाई होते. धोंडू व उमाबाई यांना एकूण चार अपत्ये झाली. काशीबाईंच्या पणजोबांनी जंगलात सापडलेल्या एका अनाथ मुलाचा सांभाळ केला म्हणजे अनाथाला आपंगिले म्हणून त्यांचे आडनाव आपंगकर पडले, पुढे ते अपभ्रंश होत ‘अंपडकर’ झाले. अशा परोपकारी घराण्यात एक योगिनी म्हणून काशीचा जन्म झाला. तिचे शिक्षण झाले नाही; पण बालपणापासूनच तिला नामस्मरणाची व लोकांची सेवा करण्याची आवड होती. गरिबीमुळे कष्टानेच या कुटुंबाला रोजीरोटी मिळवावी लागत होती.

     आई जंगलात जाऊन लाकूडफाटा आणत असे. तेव्हा काशी तिच्याबरोबर जाऊन मदत करीत असे. आईबरोबरच्या बायका काम करताना देवाची गाणी, ओव्या म्हणायच्या, कहाण्या सांगायच्या, व्रतवैकल्य-पुराणकथांच्या गप्पा-गोष्टी व्हायच्या. या देवाधर्माच्या गप्पा काशीताईला खूप आवडत असत. या कथा ऐकायला मिळतात म्हणून ती हट्ट करून आईसमवेत लाकूडफाटा आणण्यास जंगलात जाई. काशी लहान असतानाच तिचे वडील धोंडू यांचे निधन झाले.

     रोज जंगलात जाण्याने काशीची तेथे वस्ती करणाऱ्या लोकांशी जवळीक निर्माण झाली व त्यांच्याकडूून अनेक दुर्मिळ वनौषधींची, झाडपाल्याची तिला माहिती झाली. काही उपजत दैवी गुण व हे झाडपाल्याचे ज्ञान या योगे ती गरिबांवर मोफत उपचार करू लागली. अल्पावधीतच तिच्या या विद्येची पंचक्रोशीत प्रसिद्धी झाली. असंख्य गरीब, गरजू रुग्ण काशीकडे येऊन बरे होऊ लागले.

     दरम्यान, तिचा मोठा भाऊ, आई यांनी काशीचे लग्न करण्याचे ठरविले. नवऱ्याच्या घरी ती सुखाने दोन घास खाईल व आपलीही एक जबाबदारी कमी होईल, एवढाच त्यांचा हेतू होता. मुंबईतील उपनगरात काशीबाईंचा भाऊ हरी चाकरमानी होता. त्याच्या ओळखीने एका केशकर्तनालयातील हरिश्चंद्र चव्हाण याच्याशी काशीचे लग्न ठरले. फारशी चौकशी न करता घाईने लग्न उरकून टाकण्यात आले. काशीबाईंची सासू महा खाष्ट होती. ती काशीचा खूप छळ करून तिला दिवस-दिवस उपाशी ठेवत असे. या त्रासातून सुटका व्हावी या इच्छेने तिचा भाऊ हरी याने काशीला श्री रामकृष्ण महाराज जांभेकर यांच्याकडे नेले. दोघांना प्रथम भेटीतच आपल्या पूर्वजन्माची ओळख पटली.

    काशीचा नवरा तेव्हा खूप आजारी होता. नवऱ्याची प्रकृती बरी व्हावी यासाठी तिने जांभेकर महाराजांना प्रार्थना केली. महाराजांनी तिला २१ गुरुवारांची उपासना सांगितली. २१ गुरुवार संपता-संपता काशीबाईंच्या नवऱ्याचे निधन झाले. काही काळाने तिच्या मुलाचेही निधन झाले. हे दोन्ही आघात केवळ उपासनेमुळेच काशीबाई सोसू शकली. आता ना पती, ना मुलगा, ना संसार. त्यामुळे काशीबाई यांनी पूर्ण वेळ जांभेकरांच्या मठातच सेवेसाठी स्वत:ला समर्पित केले. अल्पावधीतच तिच्यावर जांभेकरांची गुरुकृपा झाली. गुरूच्या मठाची सर्व जबाबदारी काशीबाईंवर सोपविली गेली. नित्य नामस्मरण आणि समर्पित सेवा साधना हेच काशीबाईंचे जीवन होते. या साधनेने त्या ‘महायोगिनी’ पदाला पोहोचल्या. सर्वजण त्यांना ‘काशीबाई महाराज’ म्हणू लागले.

     काशीबाई यांनी गुरू जांभेकरांच्या निर्वाणानंतर त्यांच्या समाधीची सेवा केली. गुरुबंधू नामदेव महाराज यांचीही गुरूप्रमाणे सेवा केली. त्यांनी काशीबाई महाराजांच्या मांडीवर डोके ठेवून प्राण सोडला. यानंतर मठाकडे आशेने व श्रद्धेने येणाऱ्या सर्व रंजल्या-गांजल्या भक्तांचे काशीबाई आपल्या ठायीच्या सिद्धीने समाधान, कल्याण करू लागल्या. वयाच्या चौऱ्याहत्तराव्या वर्षी त्यांनी विरक्ती पत्करली व त्या एकांतवासात गेल्या.

     मठात ‘गुरुलीलामृत’ पारायण सप्ताह होतो. नवरात्रात देवीची स्थापना केली जाते. आता माउली काशीबाई महाराज पूर्ववत सेवेत रुजू झाल्या असे वाटत असतानाच २५ सप्टेंबर १९७६ रोजी पहाटे काशीबाईंनी मठाचे प्रमुख अप्पा जगदाळे यांच्या हस्ते पाणी मागितले आणि गुरूंचे स्मरण करत त्या समाधिस्थ झाल्या. श्रीगुरू जांभेकर यांच्या समाधीजवळ काशीबाईंच्या स्मरणार्थ पादुका स्थापन करण्यात आल्या आहेत.

     काशीबाई यांना वाचासिद्धी प्राप्त होती. सतत नामस्मरण आणि सेवा हीच साधना हे त्यांच्या जीवनाचे सार होते. अनेक सिद्धी प्राप्त असलेले  सत्पुरुष त्या सिद्धी स्वत:चे दु:ख, व्याधी दूर करण्यास वापरत नाहीत, तर लोकांच्या कल्याणार्थ वापरतात व स्वत:चे दु:ख, व्याधी, व्यथा, देहभोग म्हणून साक्षीभावाने भोगतात. त्या अशाच कोटीतील संतपदाला पोहोचलेल्या होत्या.

विद्याधर ताठे

अंपडकर, काशी धोंडू