आपटे, अजित श्रीकांत
अजित श्रीकांत आपटे यांचा जन्म एका सुसंस्कृत शेतकरी कुटुंबात सातारा येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण सातारा येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झाले व महाविद्यालयीन शिक्षण पुण्याच्या बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयात झाले. त्यांनी त्याच संस्थेच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट या संस्थेतून व्यवस्थापनशास्त्रातील पदव्युत्तर पदवी (एम.बी.ए.) मिळवली. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी आपल्या वडिलोपार्जित शेतीत आवडीने विशेष लक्ष घातले. बदलत्या काळानुरूप शेतीत जाणीवपूर्वक योग्य ते बदल केले व एक प्रयोगशील आणि यशस्वी शेतकरी म्हणून लौकिक मिळवला.
खेडेगावात राहणार्या कुटुंबाला लागणारे अन्नधान्य स्वतःच्या शेतातच पिकवावे लागते, त्यानुसार त्यांच्या शेतात कशाचीही ‘पेरणी’ नाही, फक्त ‘लावणी’च होते. त्यांची सर्व उत्पादने ही बाजारात विकली जातात. त्यातला कोणताही भाग कुटुंबाच्या उपभोगासाठी नसतो. आपटे प्रामुख्याने चार पिके घेतात. उदा., उसासारखे बारमाही पीक, भाजीपाला, विशेषतः वेल भाजी, कांदा बी यांसारखे बी-बियाणे व हळदीसारखे भूमिगत पीक. त्यांच्या शेतावर पशूंऐवजी सर्व कामे यंत्र व मानवी श्रम यांद्वारेच होतात.
अन्नधान्याची पिके घेणे फायदेशीर नाही, असा अनुभव आल्यामुळे आपटे यांनी व्यापारी पिके घेण्याचे ठरवले. शेतात असलेल्या दोन विहिरी बारमाही पाणी देणार्या आहेत. त्यामुळे बागायती पिकेच घेण्याचे त्यांनी ठरवले. अशाच पिकांपैकी एक पीक म्हणजे हळद. ते नगदी पीक आहे. हळदीचा औषध क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर उपयोग होऊ लागला आहे. त्याला बाजारात चांगली किंमत मिळू लागली आहे. त्यांनी सलग पाच वर्षे आपल्या शेतात हळद लागवड केली. हळदीचे कंद जमिनीखाली वाढतात. त्यामुळे त्याच्या चोरीचे प्रमाणही कमी असते. किडीचे प्रमाण कमी आहे. प्रक्रिया केलेली विक्रीयोग्य हळद टिकाऊ असते. तिचा साठा करता येतो. भावही चांगला मिळतो. फायद्याचे प्रमाण चांगले आहे.
आपटे यांनी व्यवस्थापनशास्त्राचे पदव्युत्तर शिक्षण घेतल्यामुळे शेतीत आर्थिक शिस्त पाळण्याचे त्यांनी ठरवले. त्यांनी हळद लागवडीसाठी येणार्या खर्चाची नोंद ठेवली. त्या खर्चाचा थोडक्यात आढावा पाहता हळद लागवड कितपत फायदेशीर आहे याची कल्पना येईल. हा खर्च पाच वर्षांच्या निरीक्षणाच्या अनुभवावर आधारित आहे. एका हंगामासाठी त्यांना हळद लावल्यापासून विक्रीयोग्य हळद तयार करण्याचा सरासरी खर्च दर एकरी रु. १.०३ लाख आला आणि हळद विक्री उत्पन्न रु. १.३७ लाख मिळाले. दरवर्षी ते अंदाजे सात-आठ एकर हळद वेगवेगळ्या ठिकाणी लावतात. त्यामुळे उत्पादन चांगले मिळते.
आपटे कुटुंब गेली साठ वर्षे कांदा बी तयार करत आहे. सतत एकाच क्षेत्रात कांदा बी घेतल्यास उत्पादन घटते, हा अनुभव लक्षात घेऊन त्यांनी काही वर्षांच्या अंतराने ‘बी’साठी कांदा लागवड केली.
वर्षभर हप्त्याहप्त्यात उत्पन्न मिळत राहावे, या उद्देशाने आपटे ‘कारले’ हे पीक घेतात. कारले हे पीक वेली फळभाजी वर्गात मोडते. त्याचे वेल मांडवावर चढवावे लागतात. घातलेला मांडव पाच-सहा वर्षे टिकतो. तसेच कारल्याचा तोडा झाल्यावर त्याचा साठा करून ठेवण्यासाठी व बाजारात विक्रीस घेऊन जाण्यासाठी प्लॅस्टिकचे क्रेटस् विकत घ्यावे लागतात व तेही पुढील पाच-सहा वर्षांसाठी उपयोगी पडतात. कारले हे बागायती पीक आहे. त्यामुळे सात-आठ महिने पाण्याची व्यवस्था करावी लागते. आपटे यांनी त्यासाठी ठिबक सिंचनाची व्यवस्था केली आहे. कारले दोन ऋतूंत घेता येते. एक फेब्रुवारी ते ऑगस्ट व दुसरे जून ते डिसेंबर. या काळात अंदाजे वीस तोडे घेता येतात.
आपटे कुटुंब ५० हून अधिक वर्षे उसाची लागवड करत आहेत. त्यांच्या एकूण कृषी क्षेत्रातील तिसरा भाग ते ऊस शेतीसाठी वापरतात. काळानुसार ऊस लावणीचे, खत देण्याचे, पिकाला पाणी देण्याचे आधुनिक तंत्र ते वापरतात. पारंपरिक टिपरी लागणप्रमाणेच पिशवीत एक डोळा पद्धतीने लागण वा कोकोपिटमध्ये एक डोळ्याची रोपे तयार करणे, ही आधुनिक तंत्रेही ते वापरतात. खतांमध्ये पारंपरिक शेणखत व निंबोळी पेंडीबरोबरच रासायनिक खतांचा, विशेषतः सूक्ष्म अन्नद्रव्यांचा ते उपयोग करतात व पिकाला ठिबक सिंचन पद्धतीने पाणी देतात.