Skip to main content
x

अर्जुनवाडकर, कृष्ण श्रीनिवास

डॉ.कृ.श्री.अर्जुनवाडकर यांचा जन्म बेळगाव या गावी झाला. १९३९ साली त्यांनी बेळगाव सोडले व पुण्याच्या वेद शास्त्रोत्तेजक सभेची ‘अद्वैत वेदान्त कोविद’ ही संस्कृतची पदवी मिळवली. मुंबई विद्यापीठाच्या मॅट्रिकच्या परीक्षेतील संस्कृतची मानाची जगन्नाथ शंकरशेट शिष्यवृत्ती त्यांना मिळाली. १९५६मध्ये पुणे विद्यापीठाच्या एम.ए परीक्षेत ते प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. १९५५ ते १९६० या काळात ते वाडिया महाविद्यालयात अर्धमागधीचे व संस्कृतचे प्राध्यापक होते. नंतर १९६१ ते १९७९ या काळात सर परशुराम महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू झाले. स्वतः नोकरी करून अतिशय खडतर मार्गाने त्यांचे शिक्षण झाले. १९५४ मध्ये लीला देव या विदुषीशी त्यांचा विवाह झाला. त्याही सर परशुराम महाविद्यालयातच संस्कृत व पाली या विषयांच्या प्राध्यापिका होत्या.

मराठी व्याकरणशास्त्राचे चिकित्सक व अचूक दृष्टीचे अभ्यासक व समीक्षक म्हणून त्यांचा लौकिक आहे. संस्कृत साहित्यशास्त्राचे ते साक्षेपी खोल दृष्टीचे अभ्यासक म्हणून प्रसिद्ध आहेत. प्रारंभीच्या काळात त्यांनी कथा, विनोदी कथा असे ललित संशोधनपर लेखन केले. त्यानंतर समीक्षात्मक वैचारिक लेखनाकडे ते वळले. १९७८ साली त्यांना केंब्रिजचा ‘जागतिक कीर्तीचा लेखक’ म्हणून मान्यता मिळाली. त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना संस्कृत विषयातील डॉक्टरेटसाठी मार्गदर्शन केलेले आहे. त्यांनी प्रा.अरविंद मंगळूरकर यांच्या साहाय्याने ‘मराठी घटना, रचना व परंपरा’ (१९५८) हा ग्रंथ लिहिला. ‘मम्मटकृत काव्यप्रकाश’ (१९६२) हा विश्लेषणात्मक ग्रंथ लिहिला.‘शास्त्रीय मराठी व्याकरण’ (मोरो केशव दामले, १९७०) ग्रंथाचे तपशीलवार संपादन केले.‘महाराष्ट्र प्रयोग चंद्रिका’ (वेंकट माधव, १९७०) हे त्यांचे लेखन विद्वज्जनांत मान्यता पावले.

            अर्जुनवाडकरांनी केलेले मोरो केशव दामल्यांच्या व्याकरण ग्रंथाचे संपादन ही मराठी भाषेच्या दृष्टीने मोलाची कामगिरी ठरली. यातील व्याकरण ग्रंथात यापूर्वी मांडली गेलेली महत्त्वाची सामग्री वर्गीकृत करून यात ग्रंथाची सांगोपांग चर्चा केली आहे. त्यामुळे त्यांच्या या ग्रंथाला व्याकरणविषयक संदर्भ-ग्रंथाचे व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यात त्यांनी मराठी व्याकरणाकडे बघण्याचा शास्त्रशुद्ध दृष्टिकोन कोणता असू शकतो, याचे विवेचन केले आहे. व्याकरण विषयासारख्या क्लिष्ट विषयावरचा उत्कृष्ट संपादित ग्रंथ या दृष्टीने त्यांचे हे संपादन फार महत्त्वाचे व अभ्यासू ठरले आहे.

            ‘मराठी व्याकरण’ (वाद आणि प्रवाद) या त्यांच्या ग्रंथात पारंपरिक व्याकरणाची सडेतोड समीक्षा करून शास्त्रीय दृष्टिकोनातून पुनर्मांडणी कशी करता येईल, याविषयीचे दिग्दर्शन केले आहे. व्याकरणविषयक सखोल अभ्यासामुळे मराठी व्याकरण परंपरेत ते परिमाण मानले जाते, हे त्याचे महत्त्व आहे. त्यांच्या या ग्रंथातील ‘दामले व त्यांचे कार्य’ याविषयीचा संपादकीय भाग राज्य मराठी विकास संस्थेने ‘अर्वाचीन महाराष्ट्राची जडणघडण’ या मालिकेत ‘मोरो केशव दामले: व्यक्ती आणि कार्य’ (१९९७,२००५) यात प्रकाशित केला आहे. १९९९ - २००० या काळात त्यांनी लंडनमधील योगसंस्थेत योगावर तत्त्वज्ञानपर व्याख्याने दिली. त्यावर मीरा मेहता यांच्या सहकार्याने त्यांनी योगावर ग्रंथ लिहिला. याची अमेरिकन, जपानी, स्पॅनिश भाषांत रूपांतरे प्रकाशित झाली आहेत. २००६ मध्ये ‘ध्वन्यालोक- एक विहंगमावलोकन’ हे पुस्तक सिद्ध झाले. पातंजल योगसूत्रावरच्या १९२५ मध्ये प्रकाशित ग्रंथाला अर्जुनवाडकरांनी योगाची प्रस्तावना लिहून त्यातील राजयोग व हठयोग यांचा साधार चिकित्सक परिचय त्यांनी करून दिला आहे. अशी चिकित्सक सखोल अभ्यासलेली, संशोधनात्मक, समीक्षात्मक तीस-पस्तीसच्यावर त्यांची पुस्तके आहेत. 

     - रागिणी पुंडलिक

अर्जुनवाडकर, कृष्ण श्रीनिवास