Skip to main content
x

आर्वे, वसंत महादेव

मनोहर आर्वे

          तासगाव चमन’ या द्राक्षकुलाचे नाव युरोपपर्यंत नेण्याची कामगिरी करणार्‍या वसंत महादेव आर्वे यांचा जन्म त्यांच्या आजोळी बार्शी येथे झाला. त्यांचे बालपण आजोळीच गेले. त्यांचे प्राथमिक शिक्षण सांगलीतील बोरगाव प्राथमिक शाळेत झाले. बोरगाव येथे इंग्रजी शिक्षणाची सोय उपलब्ध नसल्यामुळे वसंत यांना पंढरपूर येथे राहणारे त्यांचे काका विश्‍वनाथ आर्वे यांनी इंग्रजी शिक्षणासाठी १९४५ साली पंढरपूरला नेले. तेथे १९५२ पर्यंत त्यांनी माध्यमिक शिक्षण घेतले व पुढील शिक्षणासाठी कोल्हापूर येथे स्थलांतर केले. त्यांनी १९५४ मध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली. नंतर त्यांनी कोल्हापूर येथील राजाराम महाविद्यालयात प्रवेश घेतला, पण घरगुती अडचणींमुळे शिक्षण अर्धवट सोडून ते बोरगावला गेले, ते पुन्हा कोल्हापूरला परतलेच नाहीत. त्यामुळे त्यांच्या पुढील शिक्षणात खंड पडला. आर्वे यांचे थोरले चुलते दत्तात्रय व वडील या दोघांचीही प्रकृती खालावल्याने लहान भावंडांची जबाबदारी त्यांना उचलावी लागली. त्यामुळेच वयाच्या १८ व्या वर्षी त्यांनी पारंपरिक शेती व्यवसायात लक्ष घालण्यास सुरुवात केली. त्यांची शेती गावाजवळून वाहणार्‍या ओढ्याजवळ होती. तेथे आर्वे कुटुंबीय केवळ केळीचेच पीक घेत. या केळीच्या पिकास ओढ्याचे अडवलेले पाणी देत. त्यासाठी खूप कष्ट करावे लागत असल्यामुळे आर्वे यांनी आपल्या शेतामध्येच एक विहीर खोदली व पाणी वर आणण्यासाठी इंजिनही बसवले. त्यांच्या वडिलांचे १९५५ मध्ये निधन झाले. त्यानंतर शेतीची सर्व जबाबदारी त्यांच्यावर पडली. तेव्हा आपल्या शेतात उत्कृष्ट प्रतीचे उत्पन्न घेण्यासाठी काय प्रयत्न करावे लागतील, याचा त्यांनी विचार केला, तसेच कोणती खते वापरली म्हणजे केळीच्या खुंटास मोठ्या प्रमाणावर केळीचे घड येऊ शकतात, याबाबतची माहिती त्यांनी सांगलीच्या शेती अधिकार्‍याकडून मिळवली. त्यांनी केळीच्या बागेमध्ये वेगवेगळी खते वापरली व केळीचे उत्कृष्ट उत्पादन घेतले आणि सांगलीच्या प्रदर्शनामध्ये १५० केळी असलेला घड पाठवला. या घडाला प्रदर्शनामध्ये पहिले पारितोषिक मिळाले. त्यानंतर आर्वे यांची शेतीबद्दलची आवड अधिक दृढ झाली व त्यांनी नवनवे प्रयोग करण्यास जोमाने सुरुवात केली. वाढत्या खर्चामुळे त्यांचे चुलते त्यांना नवनवे प्रयोग करण्यापासून परावृत्त करत, परंतु नवीन प्रयोग करण्याच्या ध्येयाने प्रेरित झालेल्या आर्वे यांनी आपले काम निष्ठेने व अखंडपणे चालू ठेवले.

          आर्वे हे १९५८ मध्ये विवाहबद्ध झाले. त्याच दरम्यान ते आपल्या जमिनीतून कोरडवाहू पीक घेण्याच्या प्रयत्नात होते. तसेच, ते केळीच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठीही झटत होते. चुलत्यांच्या मृत्यूमुळे १९६२ मध्ये संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर पडली. त्यामुळे आर्थिक प्रगती करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी १९६४ मध्ये आपल्या प्रक्षेत्रावर ‘सिलेक्शन सेव्हन’ या जातीच्या द्राक्षाच्या काड्या लावून त्याची रोपवाटिका तयार केली. शेती अधिकारी ठाकूर यांच्या सल्ल्याने आवश्यक खतांचा वापर करून चांगल्या प्रतीचे उत्पादन काढले. या पहिल्या उत्पादनाची विक्री त्यांनी कळकी पाटीमधून जवळ असणार्‍या सांगली व कोल्हापूरच्या बाजारपेठेत केली. बोरगाव येथे ‘सिलेक्शन सेव्हन’ या जातीच्या द्राक्षाचे उत्पन्न आर्वे यांनीच प्रथम घेतले.

          नाशिक व अकलूज येथील द्राक्ष बागायतदार ‘सिलेक्शन सेव्हन’ या जातीच्या द्राक्षांचे पीक घेत व ते मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केट येथे विकत. तेथे ती नाशिकची द्राक्षे म्हणून प्रसिद्ध होती. वसंत आर्वे यांनी आपल्या पांडुरंग या धाकट्या भावाच्या मदतीने ‘सिलेक्शन सेव्हन’ जातीची द्राक्षे ‘आर्वेबंधू’ या नावाने विकली व ती प्रसिद्ध पावली. त्यांनी १९६६ मध्ये ‘थॉमसन सीडलेस’ या जातीची कलमे मिळवून त्याचे उत्पादन घेतले. त्या काळी द्राक्षाचे पीक सररासपणे घेतले जात नव्हते. सदर पीक घेण्यासाठी खर्च जास्त येत असे व उत्पन्न घेतल्यावर मालाची विक्री करणे सोपे नसे. त्यामुळे सामान्य शेतकरी द्राक्षाचे पीक घेण्यास तयार नव्हता, परंतु वसंत आर्वे यांनी ‘थॉमसन सीडलेस’ या द्राक्षाचे पीक घेण्यासाठी लागणारे शास्त्रोक्त ज्ञान मिळवण्यासाठी मौनी विद्यापीठातील प्रा. श्री.अ. दाभोळकर यांची भेट घेतली.

         ‘थॉमसन सीडलेस’ कलमाची छाटणी पावसाळ्यानंतर करावी. ज्या वेळेस फूलकळी येऊन पीकधारणा होण्यास सुरुवात होते, तेव्हा वेलीवरती घड असल्यास त्या घडाच्या वरच्या बाजूस कातरीने गर्डलिंग करावे लागते. पानापासून मिळणारा अन्नरस घडाच्या पोषकतेसाठी आवश्यक असतो, म्हणून गर्डलिंग पद्धती अवलंबली जाते. तसेच घडामधील मणी मोठे व्हावेत व वातावरणामधील दूषित हवेचा परिणाम त्यावर होऊ नये, म्हणून त्यावर जिब्रॅलिक अ‍ॅसिडचा वापर केला जातो. हे दोन्ही प्रयोग आर्वे यांनी यशस्वी केले. उत्पादित मालाची विक्रीही तितकीच उत्तम झाली पाहिजे, म्हणून आर्वे यांनी ती फळे कळकी पाटीमधून मुंबई येथील क्रॉफर्ड मार्केटमध्ये पाठवली. ‘थॉमसन सीडलेस’ या जातीची द्राक्षे दिसण्यास उठावदार, मोठी व गोडीस उत्तम असल्यामुळे बाजारपेठांमध्ये त्यांची मागणी वाढली. सकाळी काढलेला माल बोरगावहून मुंबई येथे पोहोचवण्याची दक्षता ते स्वतः घेत.

         द्राक्षाच्या मागणीमध्ये वाढ झाल्यामुळे आर्वे यांनी जादा प्रक्षेत्रावर जादा उत्पादन घेण्यास सुरुवात केली. घेतलेल्या उत्पादनाची विक्री व्यवस्थितपणे व्हावी, म्हणून त्यांनी वैज्ञानिक द्राक्षकूल हा संघ स्थापन केला व उत्पादित केलेला द्राक्षाचा माल ‘तासगाव चमन’ या नावाने विक्रीला पाठवण्यास सुरुवात केली. कोलकाता, अहमदाबाद, बडोदा, बंगळुरू, मद्रास, मुंबई येथून त्याला मोठ्या प्रमाणात मागणी येऊ लागली. मागणी वाढल्यानंतर त्यांनी रेल्वे व विमान यांनी माल पाठवण्यास सुरुवात केली, परंतु वाहतुकीच्या खर्चात वाढ होते, हे लक्षात आल्यावर त्यांनी रेल्वेमंत्र्यांचा सातत्याने पाठपुरावा करून प्रयत्नपूर्वक वाहतूक खर्च कमी करून घेतला. तसेच १९७८-७९ पर्यंत ते द्राक्षाच्या पॅकिंगसाठी लाकडी खोकी वापरत असत; परंतु त्यानंतर लाकडाच्या खोक्यांची कमतरता लक्षात घेऊन त्यांनी कार्डबोर्डची खोकी वापरात आणली.

         आर्वे यांची द्राक्ष उत्पादनातील प्रगती पाहून आजूबाजूच्या गावांतील शेतकर्‍यांनीही द्राक्ष पीक घेण्यास सुरुवात केली. परिसंवाद व चर्चासत्र यांमार्फत शेतकर्‍यांना त्यांनी विनामूल्य मार्गदर्शन केले. त्यामुळे या भागातील द्राक्ष पिकांमध्ये वाढ झाली व शेतकर्‍यांची आर्थिक सुधारणा होण्यास मदत झाली. 

         आर्वे यांनी १९७५-७६ मध्ये आपल्या भावाच्या सहकार्याने ‘तास-ए-गणेश’ नावाच्या द्राक्षवेलीचे संशोधन करून त्याची लागवड १९७९ मध्ये केली आणि प्रत्यक्ष उत्पादन १९८१ मध्ये घेतले. त्यानंतर त्यांनी ‘थॉमसन सीडलेस’ऐवजी ‘तास-ए-गणेश’ या जातीचा वापर करून उत्पादन घेण्यास प्रारंभ केला. द्राक्षवेलीच्या या संशोधनासाठी १९८१ मध्ये बोरगाव येथे त्यांचा सत्कार करण्यात आला. ‘तास-ए-गणेश’ या जातीच्या द्राक्षांची मागणी वाढल्यामुळे आर्वे यांनी अधिक उत्पादन घेण्यास सुरुवात केली. या पिकाला आवश्यक असणारी खते, औषधे व जिब्रॅलिक अ‍ॅसिड यांची व्यवस्थाही त्यांनी केली. जिब्रॅलिक अ‍ॅसिड हे पाश्‍चिमात्य राष्ट्राकडून मागवावे लागत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात आयात कर भरावा लागे. आर्वे यांनी शेती खात्यामार्फत अर्थ खात्याशी संपर्क साधला व कर माफ करून घेतला आणि सदर द्राक्ष पीक परदेशामध्ये पाठवण्यास सुरुवात केली. परदेशात या द्राक्षांची मागणी वाढल्यामुळे भारताला परकीय चलन मिळू लागले. द्राक्ष निर्यातीमधून परकीय चलन मिळवण्यासाठी त्यांनी केलेली कामगिरी महत्त्वपूर्ण होती.

         आर्वे यांनी मजुरांचा आस्थेने विचार करताना सहा-सहा फूट उंच असणारे मांडव कमी उंचीचे केले. त्यामुळे मजुरांच्या मानेला होणारा त्रास कमी केला. तसेच, गर्डलिंगसाठी लागणार्‍या विशिष्ट प्रकारच्या कातर्‍या तयार करून घेतल्या. पाण्याचा अभाव लक्षात घेऊन पाणी बचतीसाठी त्यांनी द्राक्ष पिकांसाठी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केला व पाणी बचतीचा नवा पायंडा पाडला.

          आर्वे यांनी १९८२ मध्ये अरब राष्ट्रांमध्ये प्रवास केला. त्या वेळी प्रथमच भारतातून समुद्रमार्गे रेफर कन्टेनर्समधून द्राक्षे पाठवली होती. त्यांनी १९८३ मध्ये सांगली जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदारांचा मेळावा घेतला. तेव्हा त्यांनी द्राक्ष बागायतदारांच्या वाहतुकीच्या अडचणी, सेंद्रिय खताच्या अडचणी यांबाबतच चर्चा घडवून आणण्याची मोलाची कामगिरी केली. त्यांनी १९८३ मध्येच पंढरपूरजवळील माळरान खरेदी करून आधुनिक पद्धतीने द्राक्षवेलीची लागवड केली. तसेच, औषध फवारणीसाठी त्यांनी आधुनिक पद्धतीने लहान धारणीचे ट्रॅक्टर खरेदी केले. त्यामुळे औषध फवारणीचे काम कमी वेळेत होऊ लागले. तसेच मजुरांचा भेडसावणारा प्रश्‍नही सुटला. त्याच वर्षी त्यांनी कॅलिफोर्निया या देशाला भेट देऊन द्राक्ष पीक संदर्भातील अद्ययावत ज्ञान अवगत केले व त्याचा उपयोग आपल्याकडील पिकांसाठी कसा करून घेता येईल याचा विचार केला. १९८८ मध्ये त्यांनी फ्रान्स, इजिप्त, स्वित्झर्लंड या देशांना भेटी दिल्या व तेथील ठिबक सिंचन पद्धतीचा अभ्यास केला, तर १९९३ मध्ये शेती विज्ञानाचे व विपणनाचे तंत्र अभ्यासण्यासाठी इस्रायल, इजिप्त, दुबई या ठिकाणी प्रवास केला.

         द्राक्ष पिकांचे उत्पादन वाढल्यावर बाजारपेठेतील मालाची आवक वाढते, मालाचे दर कमी होतात व उत्पादनासाठी लागणारा खर्चही शेतकर्‍यांना मिळत नाही. ही समस्या लक्षात आल्यावर आर्वे यांनी शीतगृहात साठवणीची (कोल्ड स्टोअरेजची) कल्पना मांडली. त्यामुळे हंगाम नसतानाही ग्राहकांना द्राक्षे मिळू लागली व शेतकर्‍यांचेही आर्थिक नुकसान टळू लागले. तसेच अतिरिक्त पिकांमुळे होणारे नुकसान लक्षात घेऊन त्यांनी नवीन तंत्रज्ञान वापरून बेदाणा निर्मितीला सुरुवात केली. त्यामुळे परदेशातून मोठ्या प्रमाणात कराव्या लागणार्‍या आयातीत घट झाली व परकीय चलन वाचवण्यासाठी मदत झाली.

          द्राक्ष उत्पादनामध्ये केलेल्या भरीव कामगिरीमुळे आर्वे यांची द्राक्ष उत्पादन समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. तसेच महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक म्हणून त्यांची निवड झाली. नॅशनल हॉर्टिकल्चर मंडळाचे संचालकपदही त्यांना देण्यात आले. द्राक्ष पिकामध्ये त्यांनी केलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल महात्मा फुले शेती विद्यापीठ (१९८२) व फाय फाऊंडेशन (१८८३) यांनी प्रशस्तिपत्रक व पदक देऊन त्यांचा सन्मान केला. महाराष्ट्र सरकारच्या शेतकी विभागाने १९८५ मध्ये त्यांना फळफळावळ शेतीमध्ये प्रगती केल्याबद्दल ‘कृषिभूषण’ ही पदवी दिली, तर भारत फळफळावळ सोसायटी-दिल्ली यांनी सुवर्णपदक (१९९३) देऊन त्यांचा सन्मान केला. परदेशात केलेली निर्यात लक्षात घेऊन अपेडा, व्यापार खाते, भारत सरकार यांनी खास प्रशस्तिपत्रक देऊन त्यांचा गौरव केला. द्राक्ष उत्पादनामध्ये केलेल्या भरीव कामगिरीबद्दल १९९६ मध्ये तत्कालीन पंतप्रधान देवेगौडा यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.

- डॉ. अर्चना कुडतरकर

आर्वे, वसंत महादेव