बाळेकुंद्री, पंतमहाराज
बाळेकुंद्री पंतमहाराज यांचा जन्म त्यांच्या मातुलगृही, बेळगाव जिल्ह्यातील दड्डी ऊर्फ अजापूर येथे श्रावण वद्य अष्टमी म्हणजे गोकुळाष्टमीला झाला. त्यामुळे वडिलांनी याचे नाव ‘श्रीकृष्ण’ ऊर्फ ‘बाळकृष्ण’ असे ठेवले. पण या घराण्यात परंपरागत दत्तोपासना चालत आली होती. त्यामुळे सर्व जण यास ‘दत्तू’ या नावानेच संबोधू लागले.
पंतमहाराजांचे मूळ घराणे मराठवाड्यातील देऊळगावराजा येथील वतनदार घराणे होते. गुराप्पा कुलकर्णी हा त्यांचा मूळ पुरुष. या घराण्यातील नरसिंह नावाच्या गृहस्थाने गाणगापुरी गुरुचरित्राचे तप केले व त्याला भगवान दत्तात्रेय प्रसन्न झाले. ‘तुझ्या घराण्यात सातव्या पिढीत मी जन्म घेईन,’ असा त्यांना दृष्टान्त झाला. हे सातव्या पिढीतील दत्तावतारी बालक म्हणजे बाळकृष्ण उर्फ दत्तू होय. दत्तूच्या वडिलांचे नाव रामचंद्रपंत आणि आईचे नाव सीता ऊर्फ गोदाक्का असे होते. बाळकृष्णाच्या आईचे वडील श्री नृसिंहपंत कुलकर्णी हे दड्डीचे वतनदार होते. ‘राजर्षी’ म्हणून या घराण्यास बेळगाव परिसरात खूप मान होता.
बाळेकुंद्री येथे शाळा नसल्याने बाळकृष्णाचे सर्व शिक्षण मामा श्रीपादपंत यांच्याकडे दड्डी येथे झाले. मामाच्या घरात मराठी बोलली जात होती व बाहेर, शाळेत सर्वत्र कन्नड, त्यामुळे बाळकृष्णाला मराठी-कन्नड या दोन्ही भाषा बालपणापासूनच उत्तम अवगत झाल्या. मामाच्या घरामध्येच त्यांना महाभारत, हरिविजय, भक्तिविजय, पांडवप्रताप, रामविजय हे ग्रंथ वाचण्यास मिळाले. या काळातच गुरुचरित्राची पोथी त्याच्या पाहण्यात व पुढे वाचनात येऊन तो दत्तभक्तीकडे ओढला गेला. श्रीपाद वल्लभ व नृसिंह सरस्वती यांच्यावर त्याची श्रद्धा जडली.
बेळगाव येथील लंडन मिशन स्कूलमध्ये दत्तूचे माध्यमिक शिक्षण झाले. येथेच दत्तूची भेट ‘बालावधूत’ या योगीपुरुषाशी झाली आणि त्यांच्या कृपेने दत्तूची आध्यात्मिक प्रगती झाली. हे बालावधूत बेळगाव जिल्ह्यातील मलप्रभा नदीतीरावरील पारखपूर (पार्शवाड) येथील सिद्धयोगी होते.
लोक त्यांना बाळप्पा व बालमुकुंद असे म्हणत होते. या बालावधूत स्वामींनी दत्तूला आपले निजतत्त्व देऊन कृपा केली, तेव्हापासून दत्तू परिपूर्ण सिद्ध-साधक झाला. बालावधूत यांनी अवधूत संप्रदायाची सर्व सूत्रे सोपवून दत्तूला आपल्या परंपरेचे उत्तराधिकारी केले. पुढे दत्तू ‘श्री पंत महाराज बाळेकुंद्री’ या नावाने प्रसिद्ध झाले.
१८५६ च्या दुष्काळात वडील रामचंद्रपंत यांनी कोठारातील सर्व धान्य लोकांना, गरिबांना वाटून टाकले आणि १८७७-७८ साली पावसाअभावी शेतात फार पिकले नाही. त्यामुळे बाळेकुंद्री घराणेही गरीब झाले. १८७९ पासून अवधूत संप्रदायाची धुरा खर्या अर्थाने श्री पंतमहाराज यांनी स्वीकारून प्रबोधन कार्यास प्रारंभ केला; शिष्यांना उपदेश देऊन संप्रदायाचा विस्तार केला. घरची स्थिती बिकट झाल्याने संसार चालविण्यास त्यांना नोकरी करणेच भाग पडले. लंडन मिशन स्कूलमध्ये दरमहा ८ रुपये पगारावर त्यांनी शिक्षकाची नोकरी पत्करली व ते घरीही शिकवण्या घेऊ लागले.
पंतमहाराज १८८० साली मॅट्रिक उत्तीर्ण झाले. त्यांचा १८८२ मध्ये रायबाग येथे यमनाक्कांशी विवाह झाला आणि गृहलक्ष्मीच्या आगमनाने त्यांची आर्थिक स्थितीही सुधारत गेली. उत्तम प्रपंच करीतच उत्तम परमार्थ कसा करता येतो, याचा आदर्श पंतमहाराजांनी सर्वांना स्वत:च्या उदाहरणाने दाखवून दिला व प्रपंचात राहून परमार्थ करण्याचा सर्वांना उपदेश केला.
कोणतीही विशेष साधना न करता केवळ गुरुकृपेने पंतमहाराजांना अनेक गोष्टी प्राप्त झालेल्या होत्या. राजयोग, तारकयोग यात ते निपुण होते. सांख्ययोगापेक्षा मोक्षप्राप्तीसाठी तारकयोग सोपा व महान आहे असे पंतमहाराजांचे मत होते व ते तारकयोगाचा प्रचार करीत होते. त्यांनी अनेक अनाथ मुलांचे शिक्षण केले. त्यांचे घर एक ‘गुरुकुल’ होते.
त्यांना कुटुंबातील अनेकांचे वियोग सहन करावे लागले. त्यांच्या मुलाचा अकाली मृत्यू झाला. त्यानंतर प्लेगच्या साथीत १८९७-९८ या एका वर्षात घरातील चुलते, मावसभाऊ, आजी अशी माणसे मृत्युमुखी पडली. १९०४ मध्ये त्यांची पत्नीही निधन पावली.
पंतमहाराजांचे ‘बालबोधामृतसार’ प्रसिद्ध आहे. त्याशिवाय ३००० भक्तिरचना त्यांच्या नावावर आहेत. ‘श्रीदत्त प्रेमलहरी’ ही त्यांची रचना दत्तभक्तांची गीताच आहे. त्यांच्या बहुसंख्य रचना मराठीत आहेत. त्यांनी कन्नड व हिंदीमध्येही काही रचना केलेल्या आहेत. १९०३ मध्ये पंतमहाराजांची प्रकृती बिघडली व बिघडतच गेली. या साडेतीन महिन्यांत त्यांनी १७५ पदे- भक्तिगीते लिहिली. अखेर ‘ॐ नम: शिवाय’चा जप ऐकत त्यांनी देह ठेवला. बाळेकुंद्री येथे त्यांची समाधी आहे.