Skip to main content
x

बांदिवडेकर, चंद्रकांत महादेव

     डॉ.चंद्रकांत बांदिवडेकर यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील भालवली या गावी झाला. प्राथमिक शिक्षण रत्नागिरीच्या नगरपालिकेच्या शाळेत झाले. नंतरचे माध्यमिक शिक्षण पटवर्धन हायस्कूलमध्ये झाले. मॅट्रिकच्या परीक्षेत त्यांना हिंदीमधील ‘सागरमल खेतान’ स्कॉलरशिप मिळाली. गोगटे महाविद्यालयातून बी.ए. (१९५४) व मुंबईच्या रुईया महाविद्यालयातून एम.ए. (१९५६) झाले. शिकत असताना एकीकडे ओरिएन्ट हायस्कूलमध्ये त्यांनी मराठी व संस्कृत शिक्षकाची नोकरी केली. एम.ए. नंतर डॉ.जगदीशचंद्र जैन यांच्या मार्गदर्शनाखाली ‘हिंदी-मराठी उपन्यासों का तुलनात्मक अध्ययन’ (१९६४) या विषयात पीएच.डी. पदवी मिळवली. मुंबईच्या एस.आय.इ.एस. महाविद्यालयात हिंदीचे अध्यापक म्हणून ते रुजू झाले. मुंबई विद्यापीठातील ‘टागोर अध्यासनाच्या तौलनिक अध्यासना’चे काम त्यांनी १९८४ ते १९८८ या काळात पाहिले. पुढे १९८८ ते १९९२ या काळात मुंबई विद्यापीठात ते हिंदी विभागाचे प्रमुख होते. ‘एमेरिट्स फेलो’ हे विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे सन्माननीय पद भूषविले.

     त्यांनी हिंदी-मराठी साहित्याचा तौलनिक अभ्यासातून शोध व वेध घेण्याचा प्रयत्न केला. ‘आपले जीवन अत्यंत व्यापक तत्त्व आहे’ या उदार, व्यापक व समीक्षा-दृष्टिकोनातून ते लेखन करतात.

     मराठी-हिंदी साहित्याचे ते गाढे अभ्यासक, अनुवादक, समीक्षक, विचारवंत व उत्तम वाचक आहेत. विद्यार्थ्यांवर भारतीय साहित्य समीक्षेचे उत्तम संस्कार करणारे ते नामवंत प्राध्यापक म्हणून शिक्षणक्षेत्रात ज्ञात आहेत. गुरूपेक्षा शिष्य मोठा व्हावा, यात मनोमन आनंद मानणारे ते एक सत्त्वशील, प्रामाणिक, विद्वान अध्यापक आहेत. हिंदी-मराठी साहित्यकृतींचा विद्यार्थ्यांकडून उत्तम अनुवाद करवून घेणारे व त्यांना श्रेष्ठता मिळवून देणारे गुरुश्रेष्ठ शिक्षक म्हणून ते प्रसिद्ध आहेत.

     हिंदी वाङ्मयातून भारतीयत्वासारख्या एखाद्या महान संकल्पनेचा विचार विविध बाजूंनी, वेगवेगळ्या पातळ्यांवर करण्याची सूत्रबद्ध संकल्पना व संपादनाची ओळख वाचकांना करून देणे, हे त्यांच्या विश्लेषक समीक्षेचे वैशिष्ट्य म्हणता येईल.

     ‘मराठी कादंबरी चिंतन आणि समीक्षा’ (१९८३), ‘प्रेमचंद व्यक्ती आणि वाङ्मय’ (१९८३), ‘मराठी कादंबरीचा इतिहास’ (१९८४), ‘स्वभाषेत खरी प्रगती’ (२०००) ही त्यांची मराठीतील गाजलेली विशेष पुस्तके. कुसुमाग्रजांच्या कविता, रा.भा.पाटणकरांचा ‘सौंदर्य मीमांसा’, ‘चानी’ या मराठीतील प्रसिद्ध ग्रंथांचे त्यांनी हिंदीत अनुवाद केले आहेत.

     अज्ञेय, जैनेंद्र (चंद्रकांत देवताळे), गोविंद मित्र, धर्मवीर भारती या नामवंत लेखकांच्या वाङ्मयीन व्यक्तिमत्त्वाचा त्यांनी परिचय करून दिला. त्यांच्या अनेक पुस्तकांना पुरस्कार मिळाले. ‘मराठी कादंबरी: चिंतन व समीक्षा’ या ग्रंथास महाराष्ट्र सरकारचा राज्य पुरस्कार मिळाला. १९९०मध्ये उत्तर प्रदेश ‘सौहार्द पुरस्कार’, ‘माता कुसुमकुमारी आंतरराष्ट्रीय पुरस्कार’ ‘संत ज्ञानेश्वर गौरव कार्य’, ‘महाराष्ट्र राज्य हिंदी अकादमी’ १९९६, असे अनेक मानाचे वीस पुरस्कार त्यांना लाभले आहेत. त्यांच्या पत्नी शीला बांदिवडेकर ह्या हिंदीच्या प्राध्यापिका होत्या. त्यांनी हिंदी कादंबर्‍यांचे मराठीत अनुवाद केलेले आहेत.

     - रागिणी पुंडलिक

बांदिवडेकर, चंद्रकांत महादेव