Skip to main content
x

बधेका, गिरिजाशंकर भगवानदास

गिजुभाई

       गिरिजाशंकर भगवानदास बधेकांनी माँटेसरी पद्धतीच्या बालशाळा भारतीय बालकांसाठी असल्या पाहिजेत, विकसित होऊन लोकप्रिय झाल्या पाहिजेत हेच आपल्या जीवनाचे एकमेव ध्येय ठरवून अहर्निश त्याच्या पूर्तीसाठी प्रयत्न केले व अनेकांना प्रेरित केले.

       गिजुभाईंचे वडील वकील होते. गिजुभाई मॅट्रिक परीक्षा १९०५ मध्ये उत्तीर्ण होऊन श्रीमंत होण्याच्या उद्देशाने आफ्रिकेत गेले. तेथे नोकरी करू लागले, परंतु त्यांच्या स्वाभिमानाला धक्का पोहोचल्याने, नोकरी सोडून तीन वर्षांनी ते मायदेशी परतले.

       अभ्यास करून उच्चन्यायालयातील प्लीडरची परीक्षा पास करून वकिली करू लागले, परंतु वकिलीत खोट्याचे खरे व खऱ्याचे खोटे करणे त्यांच्या विवेकास पटेना. त्यांनी वकिली सोडली आणि बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड व शिक्षणतज्ज्ञ गोपाळराव विद्वांस यांच्या सल्ल्याने व मदतीने युरोपात जाऊन तेथे त्यांनी फ्रोबेल व माँटेसरी यांच्या बालशिक्षण पद्धतीचा अभ्यास केला. ती पद्धत अतिशय आवडल्यामुळे येताना गिजुभाई काही शिक्षण साहित्यही बरोबर घेऊन आले.

       भावनगर येथे राहणारे त्यांचे मामा हरगोविंदभाई पंड्या हे व मित्र नानाभाई भट्ट व हरभाई त्रिवेदी अशा तिघांनी मिळून आपले गुरू श्री दक्षिणामूर्ती यांच्या आशीर्वादाने ‘कुमार छात्रालय’ सुरू केले होते. मुलांचे सुचारित्र्य व सुशिक्षण हे या मंडळींचे ध्येय होते. नंतर त्यांनी कुमार माध्यमिक विद्यालयही उघडले. ध्येयनिष्ठ असे बरेच शिक्षक शाळेत काम करीत. गिजुभाईंनी संस्थेच्या संमतीने ३ ते ६ वयोगटातील मुलांसाठी माँटेसरी पद्धतीवर पूर्वप्राथमिक शाळेचा विभाग सुरू केला. १९२० मध्ये त्यांनी बालकांच्या विकासासाठी योग्य सोय करण्याच्या पूज्य भावनेने बालमंदिर सुरू केले.

        गिजुभाईंचे बालमंदिर सर्वसामान्यांच्या मुलांसाठी होते. माध्यम मातृभाषा होती. सर्व गोष्टी भारतीय चालीरीतींना धरून होत्या. स्वातंत्र्य, स्वयंस्फूर्ती, स्वयंशिक्षण व व्यक्तिगत शिक्षण हे चार मूलभूत सिद्धान्त चालकांच्या डोळ्यांसमोर होते. भारतीय संस्कृतीला पोषक असे बालशिक्षण क्षेत्रात प्रस्थापित करणे ही त्यांची अमोल देणगी म्हटली पाहिजे. गिजुभाई गोष्टी फार चांगल्या सांगत. गोष्टींची नाटके करीत. स्वत: भाग घेत. मुलांमध्ये मूल होऊन ते समरस होत. ते इतके मातृहृदयी होते की मुले त्यांना ‘मिशीवाली बाई’ म्हणत.

        १९२९ मध्ये नूतन बाल शिक्षण संघाची स्थापना झाली. बालशिक्षणाच्या प्रचारासाठी ‘शिक्षण पत्रिका’ हे मासिक सुरू केले. या मासिकात ते स्वत: पुुष्कळ लिहित व ताराबाई मोडक आणि इतर सहकाऱ्यांना लिहायला प्रवृत्त करीत. घरामध्ये पालकांचे मुलांशी वागणे, परस्परांशी वागणे, बोलणे, घरातील वातावरण व त्याचा मुलांच्या चारित्र्य  घडणीवर होणारा परिणाम इत्यादीची चर्चा पत्रिकेत असे. गुजराती भाषेतील ही पत्रिका १९५६ पर्यंत चालली. ताराबाईंनी १९३३ मध्ये ती मराठीत सुरू केली.

        गिजुभाईंनी ताराबाईंच्या सहकार्याने ‘बाल अध्यापन मंदिर’ अर्थात पूर्व प्राथमिक प्रशिक्षण केंद्र सुरू केले. त्याचा अभ्यासक्रम १ वर्षाचा होता. पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही त्यात प्रवेश होता. लिहिता - वाचता येणे व मुलांविषयी प्रेम असणे या दोन गोष्टी प्रवेशासाठी आवश्यक होत्या. अभ्यासक्रमात त्यांनी माँटेसरीबरोबरच किंडरगार्टन मधील हस्तव्यवसाय, गोष्टी, नाटके इत्यादी उपयुक्त भाग समाविष्ट केला होता.

        गिजुभाई पालक - शिक्षक - चालक सामंजस्य निर्माण करीत, बालमंदिराचे महत्त्व पटवून देत. त्यांनी लिहिलेल्या छान छान गोष्टींचे  ‘बाळवार्ताओ’ म्हणून ५ भाग आहेत. लहान मुलांनी वाचावे अगर त्यांना वाचून दाखवावे असे लहान सुबोध धडे त्यांनी लिहिले. इंग्रजी बालगीतांच्या पद्धतीवर बडबडगीते लिहिली. त्यांनी मुलांसाठी सुमारे ७५ च्या वर पुस्तके लिहिली. गुजरातमध्ये त्यांना ‘बालसाहित्य सम्राट’ म्हणतात. बालशिक्षण क्षेत्रातले ते आद्यगुरूच होत.

        १९०२ मध्ये गिजुभाईंचा हरिबेन यांच्याशी विवाह झाला. परंतु १९०६ मध्येच या पत्नीचे निधन झाल्यावर त्यांनी जदिबेन यांच्याशी विवाह केला. नरेंद्र हा त्यांचा एकुलता एक मुलगा.

        १९३८ मध्ये आजारी पडल्या कारणाने गिजुभाई राजकोटला गेले. तेथेही बिछान्यात पडून ते बाल अध्यापन मंदिर चालवत होते. त्यांनी डॉ. माँटेसरींना भारतात येण्याचे आमंत्रण दिले होते, परंतु त्या येण्यापूर्वीच गिजुभाईंचे मुंबईच्या हरकिसनदास रुग्णालयात निधन झाले.

        गुजरात साहित्य सभेने गिजुभाई बधेकांना ‘रणजितराम सुवर्णपदक’ व दहा हजार रुपयांची थैली अर्पण करून त्यांचा गौरव केला होता.

- वि. ग. जोशी

बधेका, गिरिजाशंकर भगवानदास