Skip to main content
x

बखले, भास्कर रघुनाथ

भास्कर रघुनाथ बखले यांचा जन्म बडोदा संस्थानातल्या कठोर या गावी झाला. घराण्यात संगीताची गोडी कुणालाच नव्हती. त्यांचे वडील हे सरकारी तलाठी असल्याने त्यांची फिरतीची नोकरी होती. आठव्या वर्षी म्हणजे आई-वडिलांजवळ राहिलेल्या बाल भास्करला नंतर दोन वर्षे बहिणीकडे, त्यानंतर वडिलांच्या शेजारी देव नावाच्या गृहस्थांकडे राहावे लागले. संस्कृत पाठशाळेत शिकायचे, वार लावून जेवायचे अशा दिनक्रमात आवाज मधुर व पल्लेदार असलेल्या भास्करने श्लोकगायनात प्राविण्य मिळवले.

विष्णूबुवा पिंगळे हे कीर्तनकार भास्करबुवांचे पहिले गुरू. पिंगळ्यांनी त्यांना विविध पदे शिकवली होती. हळूहळू गावात उत्सव असेल तेव्हा त्यांना गाण्यासाठी आमंत्रण दिले जाई. एकदा संस्थानिक सयाजीराव यांनी त्यांचे गाणे ऐकल्यावर त्यांची चौकशी केली आणि बडोद्यातील मौलाबक्षांच्या सरकारी गायनशाळेत त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था केली. या संगीतशाळेच्या समारंभात भास्करबुवा गायले आणि त्या कार्यक्रमाचा वृत्तान्त ‘सयाजी-विजय’ या अंकात छापून आला. १८८४ साली किर्लोस्कर कंपनीत श्री. अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी त्या वृत्तान्तानुसार पत्रव्यवहार करून भास्करबुवांना आपल्या नाटक कंपनीत ठेवून घेतले.

किर्लोस्कर नाटक मंडळीत पंधरा वर्षांच्या भास्करबुवांना बाळकोबा नाटेकर हे गायनगुरू मिळाले.  अभिनय शिकवायला गोविंद बल्लाळ देवल होते. अभिनय व गायन या दोन्ही गोष्टींमध्ये भास्करबुवांनी प्रगती केली. ८ नोव्हेंबर १८८४ रोजी ‘रामराज्यवियोग’ या संगीतनाटकात कैकेयीच्या भूमिकेद्वारे भास्करने रंगभूमीवर प्रवेश केला. यासह ‘सौभद्र’ व ‘शाकुंतल’ याही नाटकांत त्यांनी मुख्य स्त्री-भूमिका केल्या. दरम्यान घरी त्यांच्या नाटक प्रवेशाची बातमी कळली. वडील भेटायला आले आणि सुशिक्षित मंडळींत मुलगा वावरतोय, बिघडणार नाही या विश्वासाने, समाधानाने परत गेले.

यानंतर काही काळातच त्यांचे वडील वारले, तसेच अण्णासाहेब किर्लोस्करही अचानक वारले. भास्करबुवा अगदी पोरके झाले. पण कंपनी १८८५ साली इंदूरला खेळ करण्यासाठी गेली असताना तिथे बीनकार उ.बंदेअलीखाँनी नाटकात बुवांचे गाणे ऐकून त्यांना गंडाबंध शिष्य करून घेतले. इंदूरचा नाटक कंपनीचा मुक्काम संपेपर्यंत बुवांना बीनवादक बंदेअलींकडून तालीम मिळाली.

भास्करबुवांचा आवाज १८८६ मध्ये फुटला, त्यामुळे कंपनीतल्या स्त्री-भूमिका मिळणे अवघड होणार हे ओळखून त्यांनी आवाजाची मेहनत सुरू केली. पण एकदा कंपनीत अपमानास्पद वागणूक मिळाल्यावर ते बडोद्याला निघून गेले. तिथे त्यांना उ. फैज महंमदखाँसारखे गुरू मिळाले. त्यांना १८८६ ते १८९४ या आठ वर्षांच्या तालमीत ग्वाल्हेर घराण्यातील १५० ते २०० उत्तम ख्याल व ठुमर्‍यांचा लाभ झाला.

त्यांचे लग्न १८९२ साली झाले. भाऊराव कोल्हटकरांनी गणेशोत्सवात त्यांचे गाणे ऐकून त्यांना १८९५ मध्ये सर्व जुने अपमान विसरून पुन्हा किर्लोस्कर कंपनीत येण्याविषयी सुचविले आणि थोर मनाचे भास्करबुवा पुन्हा कंपनीत दाखल झाले. पुढे १८९६ ते १९०१ या काळात त्यांनी सुमारे पाच वर्षे आग्रा घराण्याच्या उ. नत्थनखाँची तालीमदेखील घेतली आणि त्यांच्या मृत्यूनंतर गुरुपत्नी-मुलांची पोषणाची जबाबदारीदेखील घेतली.

त्यांना १९०३ साली उ.अल्लादियाखाँचा घरी पाहुणचार करण्याची संधी मिळाली. खाँसाहेबांचा त्यांच्यावर विश्वास बसला, सूर जुळले आणि ते १९०३ ते १९२२ या काळात खाँसाहेबांची अवघड गायकी शिकले. बडोदा, मुंबई वगैरे ठिकाणी राहून, गुरूंचा सहवास मिळवून नंतर स्थैर्यासाठी भास्करबुवांनी १९०६ पासून धारवाडच्या ट्रेनिंग कॉलेजमध्ये तीन वर्षे नोकरी केली. शेवटी ते पुण्यात स्थायिक झाले.

पुढे नटवर्य नानासाहेब जोगळेकरांच्या प्रेरणेने ‘किर्लोस्कर भारत गायन समाजा’ची स्थापना १९११ साली पुण्यात झाली. नानासाहेबांच्या मृत्यूनंतर नुसते ‘भारत गायन समाज’ हे नाव झाले. या ‘समाजा’साठी त्यांनी खूप कष्ट सोसले. पण आपल्यासारखे कष्ट गाणे शिकणार्‍याला पडू नयेत म्हणून ते दक्ष राहिले. ते उत्तम प्रकारे तालीम देत. गणपतराव पुरोहित, गुंडोपंत वालावलकर, बापूराव केतकर,ताराबाई शिरोडकर, ठाकुरदास, पित्रे, पं. मास्तर कृष्णराव, नटश्रेष्ठ बालगंधर्व, गोविंदराव टेंबे, दिलीपचंद्र वेदी वगैरे त्यांचे प्रमुख शिष्य होत. बाई रहीमूबाई, नरहरबुवा पाटणकर, जगन्नाथबुवा पंढरपूरकर, दत्तोबा बागलकोटकर, पित्रे वकील हेही त्यांचेच शिष्य होत. त्यांचे गुरू उ. नत्थन खाँ यांचे पुत्र विलायत हुसेन खाँ यांनाही भास्करबुवांनी काही काळ शिकवले. सूरश्री केसरबाई केरकर यांनीही भास्करबुवांकडून वर्षभर तालीम घेतली होती.

पंजाब व सिंध प्रांतात त्यांची गाणी १९०४ पासून झाली. सर्व भारतभर त्यांचे नाव गाजू लागले. त्यांच्या गायकीत तीन गुरूंची शैली एकजीव झाली होती. रागवाचक स्वरवाक्ये मींडेने परस्परांना जोडून युक्तीने व मोहकपणे संपवत समेवर येणे, चिजा म्हणताना वेगवेगळ्या स्वररचनांच्या योजना करून ती चीज नटवणे, त्याच वेळी रागाचे शुद्ध स्वरूप व वातावरण कायम राखणे हे उ. फैज महंमद खाँच्या गायकीचे ढंग भास्करबुवांच्या गाण्यात होते. लयकारी, बोलबनाव, तानेची विविधता, अनपेक्षित असा तानेचा उठाव आणि तिची सुंदर गुंफण हा उ. नत्थन खाँच्या गाण्यातला विशेष भाग बुवांच्या गाण्यात होता. सौंदर्ययुक्त डौलदार गायकी व अप्रसिद्ध रागांचे सिद्धकंठाने प्रस्तुतीकरण हा उ. अल्लादिया खाँच्या गायकीतून घेतलेला वैशिष्ट्यपूर्ण गायकीचा ‘अंदाज’ त्यांच्या गाण्यात होता. ख्यालाबरोबर ठुमरी-दादरा, टप्पा, अष्टपदी, होरी, गझल, गरबा, लावणी असे अनेकविध गीतप्रकारही ते तन्मयतेने गात. ग्वाल्हेर, आग्रा व जयपूर या तीन घराण्यांच्या एकत्रीकरणाने त्यांची अनोखी गायकी घडली व या गायकीचा प्रभाव महाराष्ट्रावर पुढची शंभर वर्षे टिकला.

भास्करबुवांचे मराठी संगीत रंगभूमीलाही मोठे योगदान आहे. त्यांची कारकीर्द संगीतनट म्हणून सुरू झाली होती व पुढे एक गवई म्हणून सिद्ध झाल्यावर त्यांनी घडवलेले बालगंधर्व, मा. कृष्णराव, टेंबे, इ. अनेक शिष्यही संगीतरंगभूमीवर गाजले. त्यांच्या मार्फत भास्करबुवांची गायकी नाट्यपदांत आली. तसेच भास्करबुवांनी ‘संगीत स्वयंवर’ (१९१६, कृ.प्र. खाडिलकर), ‘संगीत द्रौपदी’ (१९२०, खाडिलकर), ‘संगीत विद्याहरण’ (१९१३, खाडिलकर; केवळ ‘देवयानी’ या पात्राच्या पदांच्या चाली) या नाटकांना जे संगीत दिले, ते संगीत रंगभूमीच्या इतिहासात ‘सोन्याचे पान’ ठरले.

त्यांनी संगीतबद्ध केलेली ही पदे अत्यंत गाजली व आजही विलक्षण लोकप्रिय आहेत : ‘नाथ हा माझा’, ‘स्वकुलतारकासुता’, ‘सुजन कसा’, ‘नरवर कृष्णासमान’, ‘एकला नयनाला’, ‘मम आत्मा गमला’, ‘मधुकर वन वन’, ‘थाट समरीचा’, इ. पदांद्वारे भास्करबुवांनी कित्येक राग, बंदिशी सर्वसामान्य वर्गात रुजवल्या. अशा या ‘देवगंधर्व’ भास्करबुवा बखले यांचे रक्तक्षयाच्या आजाराने  पुण्यात निधन झाले.

          —  डॉ. सुधा पटवर्धन

बखले, भास्कर रघुनाथ