बोराडे, विजय संपत
विजय संपत बोराडे यांचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यातील प्रिंप्री (राजा) या गावी शेतकरी कुटुंबात झाला. त्यांच्या आईचे नाव गोदावरी होते. औरंगाबाद येथील सरस्वती भुवन शाळेत त्यांनी आपले प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याच शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयातून कला शाखेची पदवी मिळवली.
बोराडे यांनी १९६४-६५पासून प्रस्थापित मराठवाडा शेती साहाय्य मंडळ, औरंगाबादच्या माध्यमातून कृषी व ग्रामीण विकास उद्दिष्ट समोर ठेवून पाण्याच्या दुर्भिक्षाच्या समस्येवर मात करण्यासाठी विहिरी खोदण्याची मोहीम हाती घेतली, तथापि या कार्याच्या मर्यादा लक्षात आल्यावर विहिरींच्या पुनर्भरणाचा कार्यक्रम हाती घेतला.
देवपिंपळगाव (औरंगाबाद जिल्हा) येथील भूजल संवर्धन, वनीकरण व कृषी विकास कार्याने संस्थेचे भविष्यात हाती घेण्यात येणाऱ्या प्रकल्प संकल्पनेचे महत्त्व प्रस्थापित केले. अनेक मान्यवरांनी व शेतकऱ्यांनी देवपिंपळगाव प्रकल्प कार्याला भेटी दिल्या आहेत. तेथून परत गेल्यावर त्या शेतकऱ्यांनी आपल्या गावी भूजल संवर्धन, वनीकरण यांसारखे उपक्रम राबवले. बोराडे यांनी संस्थेच्या वतीने अप्पर दुधना खोरे विकास नियोजनाचे कार्य हाती घेतले.
अडगाव प्रकल्पाची खऱ्या अर्थाने १९८३मध्ये सुरुवात झाली. अडगावप्रमाणेच इतर जलदुर्भिक्ष भागात कृषी उत्पादन कार्यक्रम, हैदराबाद येथील इक्रीसॅट, औरंगाबाद येथील वाल्मी, राज्य भू-संवर्धन विभाग, सामाजिक वनीकरण विभाग तथा संबंधित कार्यकर्ते व तज्ज्ञांच्या सहकार्याने त्यांनी राज्यातील नव्हे तर देशातील जल-संवर्धन, वनीकरण, कृषी व ग्रामीण विकासासाठी, तसेच शाश्वत स्वरूपात नियोजन करणारे व धोरण निश्चितीत कार्यरत असणारे अधिकारी व नेते यांच्यासाठी उपयुक्त ठरले. त्यानंतर अडगाव येथील प्रकल्प स्विस डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या मदतीने घेण्यात आला.
अडगाव हे देशाच्या नकाशावर प्रकर्षाने दिसू लागले. तसेच ‘अडगाव पद्धती’चे अवलंबन करण्यासाठी शासनाचे वतीने आदेश काढण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन राज्यपाल डॉ.पी.सी.अलेक्झांडर यांनी प्रकल्पाला भेट देऊन मुक्तकंठाने प्रशंसा केली.
अडगाव प्रकल्पातील बहुमोल तंत्रज्ञानाचे प्रभावी प्रसारण झाले. त्याचा कृषी व ग्रामीण विकासावर निश्चितच चांगला परिणाम झाला. ही पद्धत ज्या ज्या ठिकाणी अवलंबली गेली त्या त्या ठिकाणी ‘पाणी अडवा-पाणी जिरवा’ कार्यक्रमामुळे पीक पद्धतीत आमूलाग्र बदल झाला. विहिरीचे पुनर्भरण साधले गेले, भू-जल-संवर्धन, वनीकरणामुळे कृषीशी निगडित व्यवसाय सुरू झाले आणि त्या क्षेत्रातील लोकांच्या आर्थिक क्षमतेत वृद्धी झाली. कृषी शिक्षण, प्रशिक्षण, तंत्रप्रसारण, विस्तार शिक्षण आणि महिला सक्षमीकरण क्षेत्रांतही बोराडे यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे.
नोकरी करण्याचा मुळात पिंडच नसणार्या बोराडे यांनी समाजकार्य करण्याचा निश्चय केला. तसेच त्यांनी कृषी व पाणलोटसंबंधित विविध शासकीय समित्यांवर सदस्य म्हणून ज्ञानाचा लाभ इतरांना दिला.
बोराडे यांना महाराष्ट्र शासनाचा कृषिभूषण पुरस्कार (१९८८), झुआरी अॅग्रो केमिकल्स-मुंबईचा कृषी सम्राट पुरस्कार (१९९०), वसंतराव नाईक ग्रामीण विकास प्रतिष्ठान पुरस्कार, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईच्या वतीने ग्रामीण विकास पुरस्कार (१९९१), मा.विलासराव देशमुख फाउंडेशन, लातूरच्यावतीने कै. दगडोजीराव दादा देशमुख स्मृती पुरस्कार, दैनिक सत्यप्रभाच्या वतीने देण्यात येणारा कै.कुसुमताई शंकरराव चव्हाण पुरस्कार (२००५), डॉ. अण्णासाहेब शिंदे स्मृती प्रतिष्ठान, श्रीरामपूरकडून कृतिशील समाजसेवक पुरस्कार (२००६), महाराष्ट्र राज्य सामाजिक वनीकरण, पुणे यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य वनश्री पुरस्कार (२००६), महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणारा डॉ.पंजाबराव देशमुख कृषी रत्न पुरस्कार (२००८) असे विविध पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.