Skip to main content
x

बोरावके, नारायण सोपान

रावबहादूर बोरावके

       पुण्याजवळील सासवड गावी एका गरीब शेतकरी कुटुंबात नारायण सोपान बोरावके यांचा जन्म झाला. घरच्या गरिबीमुळे त्यांना सहावीपर्यंतच शिक्षण घेता आले. त्यांनी बारामती-निंबुत येथे जमीन खंडाने घेऊन शेतीला सुरुवात केली. पुढे त्यांनी नगर जिल्ह्यात राहाता, शिर्डी व कोपरगाव येथे शेती सुरू केली. त्यांनी ऊस शेतीमध्ये बरेच नाव कमवले, तसेच गूळनिर्मितीमध्ये बदल घडवले. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरसजवळील साखर कारखान्याच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा होता. महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या स्थापनेमध्ये तसेच सुरुवातीच्या वाटचालीमध्ये बोरावके यांचा महत्त्वाचा सहभाग होता. द्राक्ष पिकाशी निगडित नवीन द्राक्ष जाती, नवीन मांडव पद्धत, बाजारपेठ उत्यादी अनेक बाबींवर त्यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. त्यांनी स्वतःच्या बागेत बारा द्राक्ष जातींची लागवड केली. विशेषतः भोकरी, सिलेक्शन ७, अनाबेशाही, बेंगलोर पर्पल, उतर काळ्या व निळ्या जातींचा यात समावेश होता. त्यांनी या जातीच्या काड्या इतर द्राक्ष बागायतदारांनाही पुरवल्या. द्राक्ष लागवडीबरोबरच त्यांनी निफन, टेलिफोन, बावर अशा विविध प्रकारच्या मांडवपद्धतीची निर्मिती केली. त्यांनी द्राक्ष विक्री व्यवस्थापनामध्येही काही कल्पना प्रत्यक्षात आणल्या.

       बोरावके यांनी १९३६ ते १९६६पर्यंत महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष म्हणून कार्य केले. याबरोबरच अखिल भारतीय द्राक्ष बागायतदार परिषदेचे अध्यक्ष, महाराष्ट्र प्रगत शेतकरी संघाचे अध्यक्ष अशा संस्थांवर आपल्या कामाचा ठसा उमटवला.

- संपादित

बोरावके, नारायण सोपान