Skip to main content
x

बर्वे, मालती पद्माकर

पांडे, मालती

मालती पद्माकर बर्वे, पूर्वाश्रमीच्या मालती वामन पांडे यांचा जन्म वर्धा येथे झाला. मालतीबाईंच्या गळ्यातला सूर हा त्यांना आईकडून मिळालेला वारसा होता, मात्र गळा गोड असूनही आईला चारचौघांत गाण्याची परवानगी नव्हती. म्हणून आपल्या मुलीने खूप गाणे शिकावे, गाण्यात पुढे यावे, नाव मिळवावे अशा ईर्षेनेच आईने त्यांना गाणे शिकवायला सुरुवात केली.

त्यांचा पहिला सुगम संगीताचा कार्यक्रम १९४५ साली, वयाच्या पंधराव्या वर्षी मुंबई आकाशवाणी केंद्रावरून  झाला. त्यानंतर संगीताच्या शिक्षणासाठी त्या पुण्यात आल्या. त्या वेळी प्रख्यात संगीत दिग्दर्शक सुधीर फडके ऊर्फ बाबूजी ‘आगे बढ़ो’ या हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शन करीत होते. त्यातील एका गाण्यासाठी ते नवीन आवाजाच्या शोधात होते. त्यावेळी प्रसिद्ध भावगीत गायक गजानन वाटवे यांच्या वतीने वसंत थिटे हे मालतीबाईंना ‘प्रभात’ स्टुडिओमध्ये आवाजाच्या चाचणीसाठी घेऊन गेले आणि मालतीबाईंच्या संगीत क्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात झाली. त्यांनी गायलेले ‘वंदे मातरम्’ या चित्रपटातील ‘अपराध मीच..’ हे युगुलगीत, पु.ल.आणि सुनीताबाई देशपांडे या नायकनायिकेच्या तोंडी चित्रित झाले. त्यानंतर मालतीबाईंनी अनेक चित्रपटांमध्ये पार्श्वगायन केले. 

‘जिवाचा सखा’, ‘कल्याण खजिना’, ‘मायाबाजार’, ‘जिवाची मुंबई’, ‘वंशाचा दिवा’, ‘पारिजातक’, ‘श्रीकृष्णदर्शन’, ‘मालतीमाधव’, ‘अपराधी’, ‘सती अनसूया’, ‘गावगुंड’, ‘विठ्ठलपायी’, ‘जरा जपून’, ‘कुंकवाचा धनी’, ‘स्वराज्याचे शिलेदार’, ‘गुरुदेव दत्त’, ‘लाखाची गोष्ट’ अशा अनेक बोलपटांमधून त्या गायल्या. ‘लपविलास तू हिरवा चाफा’, ‘या कातरवेळी’, ‘त्या तिथे पलीकडे’, ‘खेड्यामधले घर कौलारू’, ‘कुणीही पाय नका वाजवू’ यांसारखी त्यांची अनेक अवीट गोडीची गाणी रसिकांच्या मनात घर करून आहेत.

सुधीर फडके, गजानन वाटवे, श्रीनिवास खळे, प्रभाकर जोग, राम फाटक, दत्ता डावजेकर, मधुकर पाठक अशा अनेक मातब्बर संगीतकारांच्या रचना मालतीबाईंनी गायल्या आहेत.

मालतीबाईंनी १९४७ ते १९६४ या सोळा-सतरा वर्षांच्या कालावधीत हिराबाई बडोदेकर, विनायकबुवा पटवर्धन, पं. जगन्नाथबुवा पुरोहित  (गुणिदास) आणि पती पं. पद्माकर बर्वे यांच्याकडे  शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले.

मालती पांडे यांनी मधुर आवाज, शास्त्रीय संगीताची अभ्यासपूर्ण जाण, लवचिक गळा, काव्यातील आणि प्रसंगातील भाव योग्य प्रकारे जाणून ते स्वरांच्या साहाय्याने गळ्यातून व्यक्त करण्याचे नैसर्गिक कौशल्य या गुणांमुळे चित्रपट पार्श्वगायनाच्या क्षेत्रात आपला स्वतंत्र ठसा उमटवला.

शास्त्रीय संगीतातील त्यांचे गुरू पं.पद्माकर बर्वे यांच्याशी १९६४ मध्ये त्यांचा विवाह झाला. मात्र १९६४ नंतर जवळजवळ १४-१५ वर्षे महाराष्ट्राबाहेर राहिल्यामुळे त्यांचा पार्श्वगायन क्षेत्राशी संबंध तुटल्यासारखा झाला. याच काळात, १९७४ मध्ये त्यांनी गांधर्व महाविद्यालयाची डॉक्टरेट पदवी प्राप्त केली. त्यांना त्याचबरोबर शास्त्रीय गायनासाठी आकाशवाणीच्या ‘अ’ दर्जाच्या कलाकार श्रेणीत मान्यता मिळाली.

मध्यम वर्गातील मुलींनी गायन क्षेत्रात काम करणे कठीण होते अशा प्रतिकूल काळात मालती पांडे यांनी ध्वनिमुद्रण, पार्श्वगायन, मैफली अशा संगीताच्या विविध क्षेत्रांत कार्य करून आपला ठसा उमटवला.

मालतीबाईंचे जीवन कलासक्त होते. ज्या दिवशी त्यांचे निधन झाले तेव्हाही, २७ डिसेंबर १९९७ रोजी काही जर्मन पाहुणे घरी आले असताना त्यांच्यासमोर त्या गायल्या होत्या. त्यानंतर तासाभरातच हृदयविकाराने त्यांचे निधन झाले. मालतीबाईंच्या आवाजातील २३ भावगीते एकत्रित करून २००६ मध्ये सारेगामा इंडिया लिमिटेड या कंपनीने विंटेज ७८ आर.पी.एम. ध्वनिफितीद्वारे त्यांच्या गाण्यांचा संगीतमय ‘हिरवा चाफा’ रसिकांसाठी सादर केला.

           — डॉ. संगीता बर्वे

बर्वे, मालती पद्माकर