Skip to main content
x

भालेराव, एकनाथ काशिनाथ

           कनाथ काशिनाथ भालेराव ऊर्फ सुधाकर भालेराव हे जागतिक कीर्तीचे खगोलशास्त्रज्ञ आहेतच, पण  ते उत्तम शिक्षक आहेत. त्यांचा जन्म चाळीसगावचा. भालेरावांचे प्राथमिक शिक्षण चाळीसगावच्या लोकल बोर्डाच्या शाळेत व माध्यमिक शिक्षण आनंदीबाई बंकट विद्यालयामध्ये झाले. महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी ते इंदूरच्या ख्रिश्‍चन महाविद्यालयात दाखल झाले. तेथील इंग्रजी रीतीरिवाज, वातावरण ह्यांचा मोठा प्रभाव त्यांच्यावर  पडला. त्यांनी इंग्रजी साहित्याचा अभ्यास करुन त्या  भाषेवर प्रभुत्व मिळविले.

            त्यानंतर भालेरावांनी मनमाडच्या जी.आय. पी. इंडियन शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. धुळ्याच्या ग्रॅज्युएटस बेसिक ट्रेनिंग सेंटर मधून १९५५ मध्ये ते बी.टी. झाले. त्याच वर्षी लोणी येथे शिक्षणखात्यात त्यांना नोकरी मिळाली. पण त्यांच्यातील शिक्षक या नोकरीत रमला नाही.

           भालेराव  नाशिकला आले आणि नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या पेठे विद्यालयात शिक्षक म्हणून रुजू झाले. विषयाचा सखोल अभ्यास, विद्यार्थ्यांविषयीचे प्रेम, अत्यंत परिणामकारक व मुलांना आनंद देणारे अध्यापन यामुळे इंग्रजी, गणित, इतिहास, भूगोल या विषयांचे उत्तम अध्यापक म्हणून काही काळातच त्यांचे नाव झाले. संस्थेच्या विविध माध्यमिक शाळांत त्यांनी शिक्षक, उपमुख्याध्यापक म्हणून काम करीत असताना अनेक उपक्रम राबविले. नवे नवे शैक्षणिक प्रयोग केले. त्यांनी शालेय विद्यार्थ्यांच्या छोट्या छोट्या नियोजनबद्ध सहली काढल्या. नि.सं.विद्यामंदिर या भगूरसारख्या ग्रामीण भागातील शाळेतील मुलांना दगडाच्या खाणीत प्रत्यक्ष चालणारे काम दाखविले तर कधी ‘बर्डस् अ‍ॅट द रिव्हरसाईड’ सारखी कविता शाळेजवळून वाहणार्‍या दारणा नदीच्या तीरावर नेऊन शिकविली. नाशिकमध्ये पांडवलेणी, चांभारलेणे येथील सहलीतून इतिहास, पर्यावरण, शिल्पकला यांचा  मुलांना परिचय करून दिला. त्यांनाही ग्रामीण भागातील मुलांच्या आकलनक्षमतेचा जिवंत अनुभव मिळाला. त्याचा त्यांना लेखन करताना फार उपयोग झाला.

          त्यांचे वडील मोठे ज्योतिर्गणिती होते. भालरावांना बालपणीच त्यांनी आकाशातील ग्रहतार्‍यांशी ओळख करून दिली होती. याच काळात त्यांचे ग्रहांशी, तार्‍यांशी नाते जुळले होते. नाशिकला आल्यावर त्यांनी पहिली दुर्बीण विकत घेतली. जेव्हा सोन्याचा भाव एकशे दहा रुपये तोळा होता तेव्हा भालेरावांनी पंधराशे रूपये किमतीची दुर्बीण आपल्या आपल्या आवडीपोटी विकत घेतली होती. या दुर्बिणीमुळे त्यांच्या भूगोलाच्या अध्यापनास नवे परिमाण लाभले व त्यांचा खगोलशास्त्राचा अभ्यास गतिमान होत गेला. या आकाश निरीक्षणाचा अनुभव व आनंद त्यांनी शाळांमधील मुलांना दिला. चंद्रसूर्यग्रहणे, चंद्राच्या कला, ग्रह, बुध - शुक्राची अधिक्रमणे, धूमकेतू, उल्कापात, कृत्रिम उपग्रह यांच्या निरीक्षण प्रयोगात मुलांना, त्यांच्या पालकांना, इतर लोकांना ते  सहभागी करून घेत. त्यांच्या विचारांना नवी दिशा देण्याचे काम करीत. त्यातूनच धूमकेतूविषयीचे अपसमज दूर करण्यात ते यशस्वी झाले. खगोलशास्त्रीय घटनांच्या माहितीच्या माध्यमातून विज्ञानसाक्षरता निर्माण करण्याचा प्रयत्न आपल्या वृत्तपत्रीय लेखनातून, आकाशवाणीवरील कार्यक्रमातूनही केला. यासाठी ‘चंदूची मंगळावर स्वारी’ यासारख्या श्रुतिका प्रसारित केल्या.

             समाजजागृतीसाठी सोबत दुर्बीण घेऊन ते खेडोपाडी हिंडले. अंधश्रद्धा, लोकभ्रम दूर करण्याचा त्यांनी सातत्याने प्रयत्न केला. त्यांनी त्यासाठी हजारो व्याख्याने दिली, स्लाईड शोज केले. १९६३ मध्ये  त्यांचे ‘विज्ञानाची किमया’  हे पहिले पुस्तक प्रकाशित झाले. त्यांची २००७ पर्यंत ‘विज्ञान शतपत्रे’, ‘वेध आकाशाचा’, ‘एडिसनची आगळी कहाणी’ अशी मराठी व ‘इन्ट्रोडक्शन टू कॉमेटस्’, ‘पायोनियर सायंटिस्टस्’  अशी इंग्रजी मिळून एकूण बहात्तर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यातील काही पुस्तकांना राज्यवाङ्मय पुरस्कार लाभले आहेत. एक शिक्षक, एक खगोलशास्त्रज्ञ इंग्रजी, मराठी, संस्कृत साहित्याचा रसिक वाचक म्हणून झालेला त्यांचा प्रवास त्यांनी ‘माझे जीवनगाणे’या आत्मचरित्राच्या रूपाने शब्दांकित केला आहे. 

        १९७८ मध्ये आदर्श शिक्षक राष्ट्रपती पुरस्कार देऊन भारत सरकारने सुधाकर भालेराव यांच्या या महत्त्वपूर्ण  कार्याचा गौरव केला, तर १९९२ मध्ये म्हणजे ते सेवानिवृत्त झाल्यानंतरच्या काळात त्यांना राष्ट्रपती विज्ञान लोकप्रियता पुरस्कार मिळाला. रॉयल अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटी, लंडन या संस्थेने त्यांंना सन्माननीय सदस्यत्व दिले. अशा एकूण पंधरा महत्त्वाच्या  पुरस्कारांचे ते मानकरी झाले आहेत.

           ते सध्या सौरडागांच्या निरीक्षणाचे कार्य पद्धतशीरपणे करीत आहेत. या संदर्भातील ‘विल्सन परिणाम’ सोडविण्याच्या मार्गावर त्यांची वाटचाल सुरू आहे.

         - प्रा. सुहासिनी पटेल

भालेराव, एकनाथ काशिनाथ