Skip to main content
x

भानोसे, अंबादास यादव

      वेदमूर्ती अंबादास यादव भानोसे यांचा जन्म नाशिक इथला. भानोसे घराण्याला वेदाध्ययन व वेदाध्यापनाची मोठी परंपरा लाभलेली आहे. वयाच्या आठव्या वर्षी उपनयन संस्कार झाल्यावर घरी म्हणजे वडिलांकडे-वेदभूषण यादव नारायण भानोसे यांंच्याकडे-अंबादासशास्त्रींचे प्राथमिक वेदशिक्षण झाले. त्यानंतर वेदभास्कर नारायण केशव देव गुरुजींकडे त्यांनी शुक्ल यजुर्वेद संहिता, पद यांचे व वेदमूर्ती पुरुषोत्तम दीक्षित शौचे यांच्याकडे शतपथ ब्राह्मण, श्रौत यासारख्या विषयांचे अध्ययन केले.

      सन १९४२ मध्ये अंबादास शास्त्रींनी स्वयंस्फूर्तीने स्वत:च्या राहत्या घरीच वेदपाठशाळा सुरू केली. अनेक शिष्यांना वेदांचे मौखिक ज्ञान प्राप्त करून दिले. हे अध्यापन तीस वर्षे सातत्याने चालू राहिले, अनेक शिष्योत्तम तयार होत गेले. १९७२ पासून १९८२ पर्यंत दहा वर्षे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात पिंपरी कोलंदर येथे निवासी गुरुकुल चालविले. या गुरुकुलातही अनेक वैदिक पंडित त्यांनी घडविले. अंबादासशास्त्रींनी सतत चाळीस वर्षे वेदांच्या अध्यापनाचे कार्य केले. या त्यांच्या कार्याबद्दल अनेक संस्थांनी त्यांचा गौरव केला. नाशिकच्या शिक्षक गौरव समितीच्या वतीने कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांंच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्याचे त्यावेळचे शिक्षणमंत्री मधुकरराव चौधरी यांच्या हस्ते ‘आदर्श शिक्षक  पुरस्कार’ प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात आला. चित्पावन मंगल कार्यालयात गुरुजींचा नागरी सत्कार सोहळा संपन्न झाला.

दिल्ली येथील भारतीय वेदशास्त्रसंमेलनात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते भानोसेशास्त्रींच्या कार्याबद्दल त्यांचा सन्मानपत्र देऊन गौरव झाला. आजही वेदाध्ययन व वेदाध्यापन कार्याची भानोसे घराण्यातील परंपरा खंडित झालेली नाही. त्यांचे नातू शांताराम शास्त्री भानोसे हे ही परंपरा पुढे चालवत आहेत.

       - प्रा. सुहासिनी पटेल

भानोसे, अंबादास यादव