Skip to main content
x

भाटे, सरोजा विद्याधर

           नेक कामे झपाट्याने उरकून पुन्हा नवी कामे करण्यात पुढाकार घेणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. सरोजा भाटे. यांचे पूर्वाश्रमीचे नाव सरोजा सदाशिव चितारी. त्यांचे आजोबा औंध संस्थानात चित्रकार होते व त्यांना पंतप्रतिनिधींनी चितारी ही पदवी दिली होती. १९५८साली त्या पुण्याच्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील श्री बालमुकुंद संस्कृत महाविद्यालयात दाखल झाल्या. त्या बरोबरीने फर्ग्युसन महाविद्यालयातून १९६२साली संस्कृत, इंग्लिश व तत्त्वज्ञान हे विषय घेऊन त्या प्रथम श्रेणीत बी.ए. झाल्या. १९५८साली मॅट्रिकमध्ये सर्वाधिक बक्षिसे मिळवणार्‍या पहिल्या पाच विद्यार्थ्यांमध्ये त्या होत्या. १९६४साली पुणे विद्यापीठातून प्रथम श्रेणी व प्रथम क्रमांकासह त्या एम.ए. झाल्या. १९७१मध्ये 'Pre-paninian Grammatical Element in Panini's Astadhayi' या विषयावर प्रबंध सादर करून त्यांनी पीएच.डी. मिळवली. १९६२पासून २००१पर्यंत त्यांचा पुणे विद्यापीठातील संस्कृत विभागाशी अनेक प्रकारे संबंध आला. १९८७पासून २००१पर्यंत त्या संस्कृत विभागप्रमुख म्हणून कार्यरत होत्या.

राष्ट्रीय संस्कृत पंडित म्हणून राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.

टिळक विद्यापीठात त्या सर्व विद्यार्थ्यांत लोकप्रिय होत्या. पं. वा. बा. भागवत यांच्याकडून त्यांनी व्याकरणाचे पारंपरिक पद्धतीने, तर डॉ. शि. द. जोशी यांच्याकडून आधुनिक पद्धतीने अध्ययन केले. त्यांना संगीतातही उत्तम गती होती. त्या नाटकातही उत्तम कामे करत. वाराणसी येथे संस्कृत वक्तृत्वात त्यांनी १९६४साली दोन सुवर्णपदके पटकावली होती.

भाटे यांनी त्यांच्या कारकिर्दीत एक उत्तम प्रशासक म्हणूनही लौकिक मिळवला. त्यांची अनेक विषयांवरील पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांतील महत्त्वाची पुस्तके पाणिनी, पाणिनीय संप्रदाय, महाभाष्य, भर्तृहरीची महाभाष्य दीपिका, वाक्यपदीय, सिद्धान्तकौमुदी ही आहेत. तसेच अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमधील त्यांच्या निबंधांची संख्या पन्नासपेक्षाही अधिक आहे. हे सर्व लिखाण इंग्लिश, मराठी किंवा संस्कृत यामध्ये केलेे आहे. याखेरीज त्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. मिळवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या वीसपेक्षा अधिक आहे.

पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्यामंदिर, दिल्ली येथील केंद्रीय संस्कृत मंडळ, अखिल भारतीय प्राच्यविद्या परिषद, अभ्यंकर पाठशाळा, पुणे, पाणिनी प्रतिष्ठान वगैरे अनेक संस्थांशी त्या निगडित आहेत.

डॉ. हेमा डोळे

भाटे, सरोजा विद्याधर