Skip to main content
x

भिडे, सरला केशव

रला केशव भिडे यांचा जन्म मुंबईला एका सुशिक्षित, सुखवस्तू, मध्यमवर्गीय कुटुंंबात झाला. त्यांच्या घरातच संगीताची आवड होती. त्यांची आई आकाशवाणी, मुंबईची ‘दिलरुबावादक’ कलाकार होती. त्यांना गायन शिकण्यास प्रोत्साहन आईकडूनच मिळाले. मुंबईतच ‘महाराष्ट्र संगीत विद्यालय’ या संस्थेत पं. नारायणराव दातार यांच्याकडे त्यांनी संगीताचे धडे घेण्यास सुरुवात केली. स्वरज्ञान उपजतच असल्याने सरला भिडे यांची खूपच प्रगती झाली. निकोप आवाज असलेल्या सरला भिडे ख्यालगायन तर शिकल्याच, तथापि त्यांचे मन ख्यालगायनापेक्षा उपशास्त्रीय म्हणून गणल्या गेलेल्या ठुमरी, होरी, दादरा, चैती, झूला वगैरे गीतप्रकारांत अधिक रमू लागले. नंतर माणिक वर्मा यांचेही मार्गदर्शन त्यांना लाभले.

एकीकडे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण चालू होतेच; त्यातच वयाच्या पंधराव्या, सोळाव्या वर्षी १९५५-५६ मध्ये ‘आकाशवाणी’ने घेतलेल्या गायनाच्या स्पर्धेत सरला भिडे यांना प्रथम क्रमांक (सुवर्णपदक) प्राप्त झाला. स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते हे पदक स्वीकारण्याचा बहुमान त्यांना लाभला.

सरला भिडे यांनी १९५९ मध्ये रसायनशास्त्रात मुंबई विद्यापीठाची पदवी मिळविली. त्यानंतर मात्र आपल्या उपजत प्रवृत्तीला अनुसरून त्यांनी आपले जीवनच संगीत विषयाला वाहून घेतले. म्हणूनच विवाह करून कौटुंबिक जबाबदाऱ्यांच्या  बंधनांत न पडता पूर्ण वेळ संगीताच्या व्यासंगासाठी देण्याचे त्यांनी ठरविले. शोभा गुर्टू यांच्याकडे त्यांनी उपशास्त्रीय संगीताचे धडे घेण्यास प्रारंभ केला.

एकाग्र बुद्धीने अनेक वर्षे संगीत साधना केल्याने त्यांची गणना उपशास्त्रीय संगीताची धुरा वाहण्यात अग्रणी म्हणून होऊ लागली. त्यांच्या आधीच्या पिढीत बेगम अख्तर, सिद्धेश्वरी देवी, नंतर गिरिजादेवी, शोभा गुर्टू वगैरेंनी ठुमरी गायनपरंपरा समृद्ध करून ठेवलीच होती. त्यानंतर ठुमरी प्रस्तुतीकरणात त्यांच्या गायनातून एक सात्त्विक, सौंदर्यपूर्ण शृंगाररस अधिक दिसू लागला असा अभिप्राय या क्षेत्रातील जाणकार रसिक देत असत.

सरला भिडेंनी मुंबईच्याच श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठातून संगीत विषयात एम.ए. पूर्ण करून तेथेच संगीत शिकविण्यावर लक्ष केंद्रित करून स्वत:चा व्यासंग चालू ठेवला. दरम्यान १९७०-८० च्या दशकात पं. रविशंकरांच्या समूहगानवृंदात सामील होण्याची त्यांना संधी मिळाली. या निमित्ताने त्यांच्या सांगीतिक व्यक्तिमत्त्वाचा भिडेंवर बराच प्रभाव पडला. पंडितजींनी स्वरबद्ध केलेल्या रचनांत सहभाग असल्याने दिल्लीतील आशियाई खेळांच्या उद्घाटन समारोहात त्यांनी महत्त्वाची जबाबदारी उचलली होती. या काळातच पं. विजय राघवराव यांच्याबरोबर सरला भिडेंनी इंग्लंडचा सांगीतिक दौराही केला.

जुन्या ठुमर्‍यांचा संग्रह असलेल्या सत्येंद्रभाई त्रिवेदी यांच्याकडून दोनशे ठुमर्‍या शिकून त्यांचे ध्वनिमुद्रण सरला भिडेंनी अभ्यासकांसाठी करून ठेवले आहे.

सरला भिडे यांनी त्यांच्या स्वत:च्या संशोधनात्मक अभ्यासासाठी ठुमरीचीच निवड केली. त्यानुसार ‘संगीताचार्य’ या पदवीसाठी पं. विनायकराव आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रबंध लिहून तो त्यांनी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाकडे सादर केला होता.

‘संगीताचार्य’ (डॉक्टरेट) पदवी प्राप्त झाल्यानंतर सरला भिडे नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठाच्या संगीत विभागाच्या विभागप्रमुख झाल्या. या संगीत विभागासाठी त्यांनी एक महत्त्वाकांक्षी सुधारणा आराखडा सादर केला होता; परंतु दुर्दैवाने आराखड्यानुसार संगीत विभागाची उभारणी करणे त्यांना शक्य झाले नाही. कारकिर्दीच्या उत्कर्षबिंदूकडे तडफदारपणे वाटचाल करणार्‍या सरला भिडेंचे छोट्याशा आजाराचे निमित्त होऊन मुंबईत निधन झाले.

गो.के. भिडे

भिडे, सरला केशव