Skip to main content
x

भोगीशयना के.

      के. भोगीशयना यांचा जन्म कणकणहळ्ळी या कर्नाटकातील बंगळुरू जिल्ह्यातील कनकपुरा या छोट्याशा खेड्यात झाला. त्यांचे वडील के. राघवाचार व्यवसायाने शिक्षक होते. एस.एस.एल.सी. च्या परीक्षेत म्हैसूर बोर्डाच्या गुणवत्ता यादीत ते १५ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. इंग्लिश विषयातील पदवी परीक्षेत ते म्हैसूर विद्यापीठात दुसरे आले तर म्हैसूर विद्यापीठातूनच एम.ए., इंग्लिशच्या परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावण्याचा बहुमान त्यांनी मिळविला होता. त्याप्रीत्यर्थ पूर्ण कृष्ण सुवर्णपदकाचे ते मानकरी ठरले होते. बेळगावच्या लिंगराज महाविद्यालयात काही काळ अध्यापनाचे कार्य केल्यानंतर त्यांनी १९५३ मध्ये सोलापुरातील संगमेश्वर महाविद्यालयात इंग्रजी विषयाचे प्राध्यापक म्हणून नोकरी स्वीकारली आणि १९६० मध्ये ते या महाविद्यालयाचे प्राचार्य झाले. १९८३ पर्यंत म्हणजे सलग २३ वर्षे त्यांनी प्राचार्यपदाची धुरा समर्थपणे सांभाळली आणि शिक्षण क्षेत्रात कुशल प्रशासक आणि व्यासंगी प्राध्यापक म्हणून आपला ठसा उमटवला. शिक्षणाबरोबरच शिस्त, चारित्र्य आणि मूल्यांवरची श्रद्धा या गुणांचा विकास विद्यार्थ्यांमध्ये व्हावा यासाठी ते अविरत प्रयत्नशील राहिले.

       पुणे विद्यापीठाच्या विद्या परिषदेचे ते सदस्य होते. तसेच पुणे विद्यापीठाच्या इंग्लिश अभ्यास मंडळाचे, क्रीडा मंडळाचे, विद्यार्थी कल्याण मंडळाचेही ते सदस्य होते. शिवाजी विद्यापीठाच्या कला शाखेच्या विद्या परिषदेचेही ते सदस्य होते. रेडक्रॉसच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य, रोटरी क्लबचे प्रांतपाल, फॅमिली प्लॅनिंग असोसिएशनच्या सोलापूर शाखेचे अध्यक्ष, कोल्हापूरच्या सायबर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष, सोलापूरातील श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी कार्य पाहिले. अशा विविध सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. १९७२ मध्ये अलाबमा (युनायटेड स्टेटस् ऑफ अमेरिका) येथे गेलेल्या रोटरीच्या अभ्यासगटाचे नेतृत्त्व त्यांनी केले होते. सोलापूरच्या डॉ. वैशंपायन स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाच्या चौकशी संबंधात नेमलेल्या कुलगुरू टोपे आयोगाचे ते सदस्य होते. सोलापूरचे वैद्यकीय महाविद्यालय शासनाने चालवावे यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

      शैक्षणिक आणि सामाजिक जाणिवेतून त्यांनी केलेल्या कार्याची नोंद घेत महाराष्ट्र शासनाने त्यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित केले होते. असोसिएशन ऑफ इंडियन युर्निव्हर्सिटीजच्या स्थायी समितीचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले. २२ सप्टेंबर १९८३ रोजी शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी त्यांची नियुक्ती झाली व १९८३ ते १९८६ या कालावधीत कुलगुरुपदाची जबाबदारी त्यांनी समर्थपणे सांभाळली. नवीन शैक्षणिक आराखडा निर्मितीकरिता महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या राज्यस्तरीय समितीत त्यांनी आपले मौलिक योगदान दिले. महाराष्ट्र शासनातर्फे मागासवर्गीय भरती संदर्भात नेमलेल्या जिल्हा दक्षता समितीतही त्यांनी कार्य केले. संगमेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून तसेच शिवाजी  विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून त्यांनी केलेले कार्य सर्वतोमुखी आहे. प्राचार्य के. भोगीशयना यांच्या अमृतसिद्धीप्रीत्यर्थ त्यांचा अमृतमहोत्सवी सत्कार महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या उपस्थितीत सोलापुरात झाला होता.

- प्रा. डॉ. सुहास गोविंद पुजारी

भोगीशयना के.