भोसले, प्रभाकर बाबूराव
प्रभाकर बाबूराव भोसले यांचा जन्म पंढरपूर येथील सरकोली या गावी झाला. त्यांचे आईवडील अशिक्षित होते. त्यांच्याकडे घरची ८-१० एकर कोरडवाहू जमीन होती. भोसले यांचे प्राथमिक शिक्षण गावातच झाले. त्यांच्यावर राष्ट्रसेवा दलाचे संस्कार झालेले होते. गावामध्ये माध्यमिक शिक्षणाची सोय नसल्यामुळे ते सोलापूरला गेले. त्यांचे कुटुंब खाऊनपिऊन सुखी असले तरी आर्थिक सुबत्ता नसल्यामुुळे त्यांना शिक्षण मध्येच सोडावे लागण्याची परिस्थिती निर्माण झाली. परंतु शासनाने दिलेल्या मोफत शिक्षणाच्या सुविधेमुळे त्यांनी दोन वर्षाचा शेतीशाळेचा अभ्यासक्रम पूर्ण केला. याच आधारावर १९५५ साली ते पुणे येथील कृषी महाविद्यालयात कृषी-साहाय्यक म्हणून नोकरीला लागले. नोकरी सांभाळून ते बी.ए. झाले.
सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून प्रभाकर भोसले यांनी श्री.अ. दाभोळकर यांच्या सहकार्याने पुण्यात शिकणाऱ्या मुलांसाठी स्वाश्रय हा गट स्थापन करून विद्यार्थ्यांसाठी अर्धवेळचा स्वयंरोजगार मिळवून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. एकीकडे शेतीविषयक नवेनवे संशोधन आणि दुसरीकडे वेगळे काही करू पाहणारा नवसाक्षर तरुण शेतकरी वर्ग या दोघांना जोडणारा दुवाच नव्हता. कृषी विद्यापीठांकडे अशी यंत्रणाच नव्हती. शेतीतले हे नवे संशोधन, नवे बदल आणि शेती व शेतकरी यांना जोडण्याचे काम शेतीविषयक मासिक उत्तम करू शकेल या विचाराने भोसले यांनी शेतीविषयक मासिक काढण्याची कल्पना काढली व त्यासाठी भांडवलाची अपेक्षा घेऊन ते किर्लोस्कर समूहाकडे गेले. किर्लोस्कर समूहाने भांडवल देण्याचे मान्य केले. हे मासिक चालवण्यासाठी भोसले यांनी कायमस्वरूपी सरकारी नोकरी सोडली व ते १९६८मध्ये किर्लोस्करमध्ये दाखल झाले. त्यांनी मासिकासाठी जुळवाजुळव करण्यास सुरुवात केली. त्या वर्षी किर्लोस्कर समूहाने कृषिक्रांती पुरवणी काढली. भोसले यांनी त्याचे संपादन केले. या पुरवणीसाठी त्यांनी पूर्ण महाराष्ट्र पालथा घातला व प्रगतिशील शेतकरी, वेगवेगळ्या खात्याचे अधिकारी यांच्या मुलाखती घेतल्या. त्यांनी कृषी विद्यापीठे, कृषी महाविद्यालय व कृषी प्रदर्शने यांना भेटी दिल्या. पुरवणी प्रकाशित झाली. परंतु दोन वर्षे झाल्यावरही मासिक सुरू झाले नाही. तेव्हा अस्वस्थ झालेल्या भोसले यांनी स्वतःचे मासिक काढण्याचा निर्णय घेतला व १९७० साली बळीराजा नावाचे मासिक चालू केले. आपला शेतकरी उद्यमी व्हावा, व्यवहारी व्हावा, त्याचा संसार चांगला चालावा यासाठी त्यांनी मासिकाच्या माध्यमातून स्वतंत्रपणे प्रयत्न केले. अर्थसाहाय्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले, परंतु त्यांना यश आले नाही. भोसले यांच्या पत्नीचे कर्करोगाने निधन झाले. पत्नीच्या आजारपणासाठी व मासिकासाठी काढलेल्या कर्जात वाढ झाली. हा काळ भोसले यांना आर्थिकदृष्ट्या अतिशय खडतर गेला. त्या काळात त्यांनी वेगवेगळी कामे केली. कालनिर्णय प्रकाशनाच्या शेती आवृत्तीसाठी दिनदर्शिकेच्या मागची शेतीविषयक माहिती तयार करणे यांसारखे मिळेल ते काम त्यांनी स्वीकारले व पूर्ण केले. परंतु त्यातही त्यांना हवे तसे यश आले नाही. त्यामुळे निराश झालेल्या भोसले यांनी मासिक विकण्याचे ठरवले, परंतु कर्जबाजारी असणारे मासिक कुणीही विकत घेतले नाही. म्हणून त्यांनी मासिकाची जबाबदारी आपल्या भावाकडे रामचंद्र यांच्याकडे सोपवली व सरकोली या आपल्या जन्मगावी जाऊन शेती करण्याचे निश्चित केले. शेतीसोबतच मासिकाच्या कामाकडे लक्ष देण्यासाठी ते सतत येणेजाणे करत. महाराष्ट्रात १९८०-८२मध्ये ऊस आणि शेतमालाच्या रास्त भावाबाबत, त्याच प्रमाणे शेतीत आणि शेती करण्याच्या पद्धतीत क्रांतिकारक बदल झाले. बागायती क्षेत्र वाढले, फलोद्यान योजनांमुळे आंबा, काजू, द्राक्ष, डाळिंब यांच्या क्षेत्रात भरीव वाढ झाली. साखर कारखाने, दुग्धव्यवसाय, कोंबडीपालन यांमुळे काही गावांचा पूर्ण कायापालटच झाला. सिंचन योजना, ठिबक सिंचन यांमुळे जुन्या पारंपरिक शेतीचा व शेती व्यवस्थेचा कायापालट झाला. महाराष्ट्रातल्या २० ते २५ टक्के शेतकऱ्यांनी हे आव्हान पेलले आणि आपल्या शेतात यशस्वीपणे राबवले. पण बदलत्या काळाबरोबर नवे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम भोसले यांनी बळीराजाच्या माध्यमातून केले. त्यांनी शेती करण्यासाठी लागणारी मानसिक व वैचारिक बैठक तयार करण्याची महत्त्वाची जबाबदारी पाडली. तसेच नवीन तंत्रज्ञान वापरून पैसे मिळवता येतात. याबद्दलचा विश्वास शेतकऱ्यांमध्ये निर्माण केला. शेतकरी वर्गासाठी बळीराजा हे शंका-समाधानाचे, अडचणी मांडण्याचे, अनुभव सांगण्याचे, प्रयोग व विचार यांची देवाणघेवाण करण्याचे एक हुकमी व्यासपीठ बनले. भोसले यांनी शेतकऱ्याला किमान उत्पन्नाची हमी मिळणे आवश्यक मानले. शेतकऱ्याची शेती फायदेशीर व्हावी, त्यांचे जीवनमान सुधारावे म्हणून ते सतत प्रयत्नशील होते.
कुटुंबविभाजन पद्धतीमुळे शेतजमिनीच्या कसण्यायोग्य आकारात फरक होऊन शेती उत्पन्नात घटच होत आहे. शेती हा एक उद्योग आहे आणि उद्योग हा आर्थिकदृष्टया परवडणारा असावा असे भोसले यांना वाटत असे. यासाठी किमान बागायती क्षेत्र ३ एकर व कोरडवाहू अथवा जिरायती क्षेत्र १५ एकर असावे, असे त्यांना वाटे. भोसले यांनी बळीराजा मासिकाद्वारे शेतीची व शेतकऱ्यांची ४२ वर्षे अखंडितपणे सेवा केली. शेतकरी वर्गाच्या प्रगतीसाठीच समर्पित असणाऱ्या या मासिकाने शेतकरी वर्गाला वाचतेलिहिते केले. सेझसाठी शेतजमिनी गेल्यास विस्थापितांना नोकरीमध्ये सामावून घ्यावे अशी भोसले यांची भूमिका होती. तसेच शेतकरी हा सैनिकांप्रमाणे लढत असल्यामुळे त्यांच्याबद्दलही समाजाने आदर बाळगावा, असे त्यांना वाटते. भोसले यांनी सर्व प्रतिकूल परिस्थितीवर सातत्याने मात करीत बळीराजा मासिकाला एका उंचीवर नेऊन ठेवण्याचे काम केले. त्यांनी आता बळीराजा मासिकाच्या कामकाजातून निवृत्ती घेतली असून मासिकाचा कारभार त्यांचे चिरंजीव नितीन भोसले समर्थपणे चालवत आहेत.