Skip to main content
x

चौधरी, सोपानदेव नथुजी

     चौधरी यांची कविता ‘रविकिरण मंडळा’च्या कवितेला -माधव जूलियन, यशवंत, गिरीश, वि. द. घाटे ह्यांच्या कवितेला; नंतरच्या काळात तांबे, कुसुमाग्रज, बोरकर ह्यांच्या कवितेला; पुढे मर्ढेकर, मुक्तिबोध ह्यांच्या कवितेला; आणि नंतर विंदा करंदीकर, बापट, पाडगांवकर ह्यांच्या कवितेला समांतर राहिली. ह्या कवितांबरोबर वावरतानाच ती स्वतःचा ठसा उमटवून गेली. ते महाकवी नसतील, पण त्यांची कविता रसिकाला काही उत्कट क्षणांचा आनंद नक्की देते, इतकी अस्सल आहे.

     नाशिकला आकाशवाणीचे केंद्र नसताना १९६१-१९६२ साली आकाशवाणीने मुद्दाम एक खास कविसंमेलन आयोजित केले होते. त्या वेळी सोपानदेव ह्यांनी त्यांच्या स्वतःच्या कविता तर म्हटल्याच पण रेव्हरन्ड टिळकांची ‘पाखरा, येशील का परतून?’ ही कविता अत्यंत सुरेल आवाजात आवर्जून गायली होती. त्यांचा आवाज अतिशय स्वच्छ, अजिबात खर नसलेला, अत्यंत वजनदार, दाणेदार होता. पहाडी, थिएटर भरून टाकणार्‍या आवाजातील त्यांचे गाणे (कविता) ऐकताना श्रोता गुंग, मुग्ध होऊन जाई. 

     पंडित विष्णू दिगंबर पलुस्करांच्या गायकीचे सूक्ष्म, खोल असे संस्कार त्यांच्या गळ्यावर झाले होते. पलुस्करांच्या गांधर्व संगीत महाविद्यालयात त्यांनी संगीताचे शिक्षण घेतले आणि पुढे तेथेच संगीताचे अध्यापनही केले. संगीताचा वारसा आणि वसा घेतल्यामुळे त्यांच्या काव्यगायनाला इतर कवींच्या तुलनेत आपोआपच एक विशिष्ट परिमाण प्राप्त होत असे. सार्‍या महाराष्ट्रात (मराठी साहित्य संमेलनांसह) ह्या सुरेल काव्यगायनामुळे त्यांना प्रचंड प्रसिद्धी लाभली आणि ते लोकप्रिय झाले. 

     कवितेचा- काव्यरचनेचा संस्कार त्यांच्यावर त्यांच्या घरातच झाला. त्यांची आई म्हणजे बहिणाबाई चौधरी. त्या शिकलेल्या नव्हत्या, पण दारिद्य्रात जगण्याचा त्यांचा जीवनानुभवच त्यांच्या कवितेला प्रेरक ठरला. त्या वेळचे जळगाव शहर मोठे नव्हते, खेड्यातच जमा होणारे होते. सततच वाट्याला आलेले, शेतीतले काबाडकष्ट  शेतीतील पेरणी, कापणी, मळणी, उपाणणी हे सारे करताना बहिणाबाईंना कविता सुचू लागल्या. दळण-कांडण करताना त्या सुचू लागल्या. निसर्ग तर त्यांचा सखा-सोबतीच होता. त्यामुळे त्यांच्या कवितेत निसर्गाची, माणसाच्या सुखदुःखाची स्पंदने अनिवारपणे आविष्कृत होतात. त्या कविता गात असत. बहुतेक कविता ओवी-अष्टाक्षरी छंदातल्या असल्यामुळे त्यांना स्वाभाविक लयही प्राप्त व्हायची. कविता ऐकत राहावी असे वाटायचे, म्हणून सोपानदेवांनी एक केले; आई कविता म्हणू लागली की ते ती कविता उतरून घेत. अशी कवितांची वहीच तयार झाली. आचार्य अत्र्यांना त्या कविता अत्यंत आवडल्या. सोपानदेवांच्या ते मागे लागले आणि ‘बहिणाबाईंची गाणी’ हा संग्रह तयार झाला. सोपानदेवांच्या प्रतिभेवर हा संस्कार संगीताच्या संस्काराइतकाच गडद असा झाला.

     लक्ष्मीबाई टिळकांना (रेव्हरन्ड नारायण वामन टिळकांच्या पत्नी) सोपानदेव आई मानायचे. लक्ष्मीबाईंची ‘स्मृतिचित्रे’ म्हणजे अक्षरशिल्पेच- शब्दशिल्पेच! त्यांचाही सोपानदेवांवर संस्कार झाला.

     एका अर्थाने ते ‘बालकवी’ही होते. शाळेत शिकत असतानाच त्यांनी ‘गोकुळीचा कान्हा माझा, कुणी कधी पाहिला काय ग’ ही कविता केली. ती कविता महाराष्ट्रभर गाजली आणि आजही अनेकांच्या ओठांवर ती रुळत असते, रुंजी घालत असते. ‘प्रतापी प्रतापसिंह’, ‘पुण्यश्लोक महात्मा’ (महात्मा गांधींवरचा पोवाडा) ह्या रचनांप्रमाणेच अहिराणी बोलीतही त्यांनी कविता रचली आहे. लहानपणी त्यांचा वावर खानदेशात होता आणि अहिराणी बोली रोजच्या भाषिक व्यवहारात प्रचलित होती. ‘काय सांगू माझ्या मोर्‍याची बल्हारी’, ‘आडाचं पाणी लई खोल ग’ यासारख्या त्यांच्या कविता लोकांच्या ओठी रुळल्या. त्यांची सारी कविताच नादानुकूल, संगीत अंगी वागणारी होती. ‘आली कुठूनशी कानी/टाळ मृदंगाची धून/नाद विठ्ठल विठ्ठल/उठे रोमारोमांतून’ कुणी विसरू शकेल? केव्हाही ऐकली की मन मोहून, गुंजून जाते. कान शब्द साठवू लागतात.

     नादानुकूल कवितेवर प्रेम होते म्हणूनच सोपानदेवांना मुक्तछंद अजिबात पसंत नसे. मुक्तछंद म्हणजे त्यांना  बेदिली- अस्ताव्यस्तपणा वाटायचा. नवकाव्यावरही ते रुष्ट असत. ‘मी ताक पितो’, ‘पाटा-वरवंटा’, ‘सिगारेट’, ‘वगैरे-वगैरे’ सारख्या कविता नवकाव्याचे विडंबन म्हणून त्यांनी रचल्या. ‘मी ताक पितो’ ही कविता (१९५४-१९५५) ‘विवेक’ साप्ताहिकाच्या विजयादशमी विशेषांकात प्रसिद्ध झाली होती. ‘काव्यकेतकी’ (१९३२), ‘अनुपमा’ (१९४९) हे त्यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले. ‘छंद लीलावती’ हे छंदरचनेचे महत्त्व सांगणारे पुस्तक त्यांनी लिहिले आणि त्या पुस्तकाला विद्याधर गोखल्यांची प्रस्तावना आहे.

     तल्लख स्मरणशक्ती, निसर्ग, समाज ह्यांचे सूक्ष्म निरीक्षण तसेच उपजत विनोदबुद्धी ही त्यांची वैशिष्ट्ये होती. ते चपखल व प्रज्ञादर्शी कोटीबाजही होते.

     नाशिकला जॅक्सन गार्डनच्या बाजूला असलेल्या कान्हेरेवाडीत त्यांचे घर होते, तेथेच ते राहत. देवदत्त नारायण टिळक आणि बालकवींची समग्र कविता संपादित करणारे प्राचार्य भा.ल.पाटणकर (श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांचे जावई आणि सौंदर्य मीमांसक प्रा.रा.भा.पाटणकरांचे वडील) ह्यांची घरेही जवळच होती. हा साहित्य सहवास होता. नाशिकला असले की ते नेहमी देवदत्तांकडे जात असत, आणि मुंबईला असले की आचार्य अत्र्यांकडे जात असत. टिळक आणि अत्रे हे सोपानदेव ह्यांचे आधार होते. भरपूर उंची लाभलेले आणि बळकट शरीरयष्टी लाभलेले सोपानदेव प्रकृतीने निरोगी होते. पण १९७४च्या आगेमागे ते खूप आजारी पडले. कॅन्सरचे निदान झाले. आठवड्यापुरतेच आयुष्य उरले आहे, असे डॉक्टर म्हणू लागले. पण त्यातून ते सावरले. कॅन्सर जणू पळालाच. नंतर त्यांना आणखी आठ वर्षांचे आयुष्य लाभले. हा एक चमत्कार होता.

     ते आयुष्यभर खर्‍या अर्थाने कविता-गाणे जगले.

     - डॉ. चंद्रकांत वर्तक

चौधरी, सोपानदेव नथुजी