Skip to main content
x

चंदावरकर, नारायण गणेश

     नारायण गणेश चंदावरकर यांचा जन्म होनावर येथे, आजोळी झाला. मिशनरी शाळेत शिक्षण घेत असताना त्यांना बायबलचाही अभ्यास करावा लागला. त्यांचे मामा श्यामराव विठ्ठल व्यवसायासाठी मुंबईस आले. त्यांच्या नावाने निघालेली सहकारी बँक प्रसिद्धच आहे. श्यामराव नारायणला शिक्षणासाठी १८६९ साली मुंबईस घेऊन आले. मॅट्रिक झाल्यावर त्यांनी १८७२ मध्ये त्यांना एल्फिन्स्टन महाविद्यालयात दाखल केले.

     बॅ. दादासाहेब खापर्डे हे त्यांचे सहाध्यायी व वसतिगृहातील खोलीबंधू होते. इंग्रजी विषय चंदावरकरांच्या आवडीचा होता. प्रोफेसर वडर्सवर्थ यांच्या इंग्रजी अध्यापनाचा त्यांना लाभ झाला. इतिहास, तत्त्वज्ञान व अर्थशास्त्र हे विषय अभ्यासून ते बी.ए.ला प्रथम वर्गात उत्तीर्ण झाले (१८७६). त्यांना महाविद्यालयात ‘फेलो’ म्हणून नेमण्यात आले. दोन वर्षांनी न्या. तेलंग यांच्या शिफारशीवरून ‘इंदुप्रकाश’ या द्वैभाषिक साप्ताहिकाच्या इंग्रजी विभागाचे ते संपादक झाले. त्यांनी अत्यंत आत्मीयतेने काम करत दहा वर्षांत त्या साप्ताहिकाची लोकप्रियता, तसेच त्याचा खप वाढविला. या काळात मथुरा सिरूर या युवतीशी त्यांचा विवाह झाला. ‘इंदुप्रकाश’ साप्ताहिकातून ते स्त्रियांना उच्च शिक्षण देण्याचा पुरस्कार करीत होते. स्त्रिया व मागासवर्गाला राजकीय हक्क पाहिजेत असे मत ते मांडीत. सार्वजनिक जीवनातील अनेक महत्त्वाच्या गोष्टींशी न्या. रानडे यांच्याप्रमाणेच न्या. चंदावरकरांचा संबंध होता. शासकीय बंधने पाळूनही लोकहित साधता येते, याचा एक आदर्श त्यांनी निर्माण केला. अस्पृश्यता निवारण कार्यात त्यांना रस होता. कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांनी स्थापन केलेल्या डिप्रेस्ड क्लास मिशनचे चंदावरकर अनेक वर्षे अध्यक्ष होते. या मिशनतर्फे ज्या परिषदा भरविल्या गेल्या, त्यांत चंदावरकरांचा वाटा असे.

     ‘‘नीच मानलेल्या लोकांना वर आणण्याचा प्रयत्न करण्याने आम्ही स्वत:ला वर आणीत आहोत. हे पवित्र कार्य करीत असताना या लोकांचा आम्ही उद्धार करणार हा घमेंडीचा विचार आमच्या अंत:करणात न शिरो आणि आम्हां सर्वांना या घोर अन्यायामुळे जी अधोगती मिळाली आहे, ती टळून सर्वांचा सारखाच उद्धार होणार आहे, असा साधा आणि सात्त्विक भाव आम्हांमध्ये निरंतर जागृत राहो,’’ अशी चंदावरकर यांची दलितोद्धाराबाबतची भूमिका होती. रानडे, तेलंग व चंदावरकर हे तिघेही मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात शिकले.

     सामाजिक, धार्मिक, राजकीय आणि आर्थिक चळवळी व प्रश्‍नांमध्ये तिघांचा सहभाग असे. रानडे अर्थात अग्रेसरच होते. तिघांनीही मुंबईच्या उच्च न्यायालयाचे न्यायाधीशपद भूषविले. त्या काळात कोणत्याही भारतीयाला मिळू न शकणारे ते सर्वोच्च अधिकारपद होते. या तिघांचाही ‘इंदुप्रकाश’च्या संपादनाशी कमी-अधिक काळ संबंध होता. शिक्षण हा तिघांच्याही चिंतनाचा विषय होता. तिघेही प्रार्थना समाजाचे मुखपत्र, ‘सुबोधपत्रिके’शी संबंधित होते.

     न्या. रानडे व चंदावरकरांनी प्रार्थना समाजाच्या उपासनाही चालवल्या व धर्मपर व्याख्याने दिली. न्या. तेलंग मुंबई विद्यापीठाचे एक वर्ष कुलगुरू, तर न्या. चंदावरकर तीन वर्षे कुलगुरू होते. १८८५ मध्ये काँग्रेसची स्थापना करण्यात न्यायमूर्ती रानडे यांचा वाटा होता. चंदावरकर काँग्रेसचे आजीव सभासद होते. १८९६ पासूनच चंदावरकर प्रार्थना समाजाचे अध्यक्ष होते. मुंबईस जी विधान परिषद स्थापन झाली, तिचे ते बिनसरकारी अध्यक्ष झाले. त्यांनी रॉयल एशियाटिक सोसायटीचे (मुंबई शाखा) अध्यक्षपद भूषविले.

    कायदेपंडित म्हणून ते नावाजलेले होते. तरी, सामाजिक जागृती, पत्रकारिता, अस्पृश्यता निवारण वगैरे क्षेत्रांतील त्यांचा सक्रिय सहभाग अत्यंत मोलाचा होता.

वि.ग. जोशी

चंदावरकर, नारायण गणेश