Skip to main content
x

चोळकर, गोविंद गणेश

         गोविंद गणेश तथा काकासाहेब चोळकर ह्यांचा जन्म मुंबईत एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे शालेय शिक्षण मुंबईतच झाले. त्यानंतर समाजसेवा करावयाची असे ठरवून काकासाहेब नागपूरला आले. तेथे त्यांचे चुलतभाऊ डॉ. मो. रा. उर्फ तात्यासाहेब चोळकर यांच्यामुळे ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात दाखल झाले आणि स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी भाग घेतला. जनसंपर्कामुळे समाजातील अनाथ, निराधार मुलांची दयनीय अवस्था त्यांनी पाहिली. डॉ. भवानी शंकर नियोगी, डॉ. ना. भा. खरे, डॉ. मुंजे, डॉ. हेडगेवार, डॉ. मो. रा. चोळकर, डॉ. ल. रा. परांजपे, दाजीसाहेब बुटी अशा समविचारी सहकाऱ्यांच्या सहकार्याने काकासाहेबांनी २६ ऑगस्ट १९२२ रोजी राजे लक्ष्मणराव भोसले ह्यांच्या नागपूरमधील महाल येथील राजवाड्यात अनाथ विद्यार्थी गृहाची स्थापना केली. पहिल्या दिवशी पाच मुले होती.

पुढील काळात मुलांची संख्या व संस्थेचा व्याप वाढू लागला. जागेची अडचण भासू लागली. तेव्हा नागपूर म्युनिसिपल कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. भवानीशंकर नियोगी व उपाध्यक्ष डॉ. मो. रा. चोळकर ह्यांनी १९२६ मध्ये पूर्व नागपूरमधील लकडगंज विभागातील पाच एकर जागा संस्थेला उपलब्ध करून दिली. १९२८ मध्ये त्यांनीच पुन्हा दीड एकर जागा दिली. त्यामुळे वसतिगृह, स्वयंपाकगृह, विनायकराव देशमुख विद्यालय बांधता आले.

प्रारंभी काकासाहेब एका कंपनीत नोकरी करत होते. पण संस्थेचा व्याप वाढल्याने त्यांनी नोकरी सोडली. आता सर्व वेळ त्यांना संस्थेच्या कामासाठी मिळाला. विद्यार्थी गृहातील विद्यार्थ्यांच्या विकासाच्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरू झाले. त्यांनी विद्यार्थ्यांची दिनचर्या ठरवून दिली. त्यात परिसर स्वच्छता, स्वयंपाक, मुलांना वाढणे, भांडी घासणे, कपडे धुणे, आजारी मुलांची शुश्रूषा, दळण आणणे, रात्रीच्या वेळी रखवाली करणे ह्या गोष्टीही ठरवून दिल्या. व्यायामाला, बलोपासनेलाही त्यांनी महत्त्व दिले. मुलांनी लष्करी शिक्षण घ्यावे असा त्यांचा आग्रह असे.

रात्री झोपण्यापूर्वीची प्रार्थना, रामरक्षा म्हणणे, दासबोधाचे वाचन हे सर्वांसाठी अत्यावश्यक असे. मुलांचे पालक व शिक्षक या दोन्ही भूमिका काकासाहेबांनी उत्तम प्रकारे निभावल्या. नागपूरमधील विविध कार्यक्रमांना ते मुलांना नेत. वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून संस्थेने स्व. बॅरिस्टर गोविंदराव देशमुख स्मृती वाचनालयसुरू केले. सर्व जातीधर्माची मुले एकत्र राहत. त्यातून राष्ट्रीय एकात्मतेचे धडे मिळत.

काकासाहेबांनी अविवाहित राहून आयुष्याचा प्रत्येक क्षण संस्थेसाठी वेचला. ते संस्थेतच राहत. मुलांसाठी केलेले भोजन घेत. कामासाठी सगळीकडे मोटारसायकलने प्रवास करीत.

संस्थेच्या मुलांना संस्थेच्या परिसरात शिक्षण घेता यावे म्हणून मुंबईचे प्रसिद्ध शल्यतज्ज्ञ डॉ. गोपाळराव देशमुख ह्यांनी दिलेल्या तेरा हजार रुपयांच्या देणगीतून १९२८ मध्ये त्यांनी विनायकराव देशमुख विद्यालयची स्थापना केली. आज संस्थेच्या परिसरात तीन विद्यालये, तीन कनिष्ठ महाविद्यालये आहेत. त्यातून परिसरातील पाच हजार मुलांच्या शिक्षणाची सोय झाली आहे. संस्थेचे अनेक नामवंत माजी विद्यार्थी विविध क्षेत्रांतून मोठी कामगिरी बजावत आहेत. काकासाहेबांच्या तालमीत तयार झालेले निष्ठावंत कार्यकर्ते संस्थेसाठी कार्य करीत आहेत.

समाजातील सर्व स्तरांतील पाच ते अठरा वयोगटातील अनाथ मुलांना संस्थेत प्रवेश मिळतो. त्यांचे संगोपन, शिक्षण व पुनर्वसन संस्था करते. या कार्यासाठी महाराष्ट्र शासनाने संस्थेला दलित मित्रपुरस्काराने सन्मानित केले आहे. संस्थेत सर्व जातीधर्मांची अनाथ मुले आहेत. संस्थेच्या स्वत:च्या इमारती, वाचनालये, प्रयोगशाळा, विस्तीर्ण क्रीडांगणे ह्यांनी सुसज्ज आहेत. संस्थेतील अनुभवी, तज्ज्ञ शिक्षकांच्या माध्यमातून मुलांना औपचारिक व अनौपचारिक शिक्षण दिले जाते. व्यावसायिक शिक्षणाचीही सोय येथे आहे. दि. ६ मार्च १९९६ रोजी संस्थेतच प्राथमिक स्वास्थ्य केंद्राची निर्मिती झाली. त्यासाठी समाजातील डॉक्टरांचे सहकार्य मिळत आहे.

- प्राचार्य डॉ. सुधीर बोधनकर

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].