Skip to main content
x

दामले, कृष्णाजी केशव

केशवसुत

     कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील ‘मालगुंड’ या लहानशा निसर्गरम्य गावात केशवसुतांचा जन्म झाला. त्यांच्या आईचे नाव अन्नपूर्णाबाई. केशवसुतांचे वडील केशव विठ्ठल दामले हे शाळाखात्यात शिक्षक होते. केशवसुतांचा जन्मदिनांक १५मार्च १८६६ आहे की, ७ऑक्टोबर १८६६ याविषयी वाद आहे. दामले कुटुंबीयांनी एकमुखाने सुचविलेली ७ ऑक्टोबर ही तारीख सोयीची मानून ‘केशवसुत जन्मशताब्दी समारोह समिती’ या तारखेपासूनच जन्मशताब्दी समारंभ साजरा केला होता.  केशवसुत आपल्या जन्मगावी फार काळ राहिले नाहीत. दापोली तालुक्यातील वळणे या गावी त्यांचे बरेचसे बालपण गेले. ‘गोष्टी घराकडील’  व ‘एक खेडे’ या कवितांमध्ये या ‘वळणे’ गावाचे सुंदर वर्णन आले आहे. ‘नैर्ऋत्येकडील वारा’ या कवितेत ‘मालगुंड’चा ‘माल्यकूट’ असा उल्लेख त्यांनी केला आहे. खेड, बडोदे, वर्धा, नागपूर, पुणे इत्यादी ठिकाणी टप्प्याटप्प्याने त्यांचे शिक्षण झाले. शालेय जीवनात त्यांना चित्रकलेची विशेष आवड होती असे दिसते. १८८९मध्ये ते मॅट्रिक्युलेशनची परीक्षा उत्तीर्ण झाले. १८९० ते १९०५ या काळात त्यांनी मुंबई, सावंतवाडी, भडगाव, फैजपूर व धारवाड येथे नोकरी केली. त्यांचा यापैकी बराचसा काळ शिक्षकी पेशात गेला. प्लेगच्या साथीच्या भयाने त्यांनी नोकरीची ठिकाणे बदलली.

     नवे गीत गाण्याची महत्त्वाकांक्षा-

     रेव्हरंड ना.वा.टिळक, हरी नारायण आपटे, कवी माधवानुज (डॉ.काशीनाथ हरी मोडक), गोविंद वासुदेव कानिटकर, काशीबाई कानिटकर, काशीनाथ रघुनाथ मित्र, कवी विनायक, नरहर शंकर रहाळकर आणि भा.रा.तांबे यांसारख्यांची मैत्री केशवसुतांना लाभली. या सर्वांचा सहवास आणि त्यांच्याशी झालेल्या काव्यचर्चा या गोष्टी केशवसुतांसाठी उपयुक्त ठरल्या. वर्डस्वर्थ, कीट्स, शेले, एडगर अ‍ॅलन पो आणि रॅल्फ वाल्डोइमर्सन या इंग्रजी कवींच्या कवितांचा प्रभाव केशवसुतांच्या कवितेवर पडला.

     नारायण नरसिंह फडणीस हे खानदेशामधून ‘काव्यरत्नावली’ या नियतकालिकाचे संपादन करीत असत. त्यांनी केशवसुतांच्या कविता ‘केशवसुत’ या कविनामाने प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली. तत्पूर्वी त्या ‘कृ.के.दामले’ या नावाने प्रसिद्ध होत असत. पुढे ‘केशवसुत’ हेच नाव प्रचलित व प्रख्यात झाले.

     केशवसुतांना फार कमी आयुष्य लाभले. वयाच्या अवघ्या चाळिसाव्या वर्षी, हुबळी येथे ७नोव्हेंबर १९०५रोजी केशवसुतांचे निधन झाले. ‘केशवसुत यांची कविता’ हा केशवसुतांच्या कवितांचा संग्रह त्यांच्या मृत्यूनंतर १९१७साली हरी नारायण आपटे यांनी संपादित केला.

      केशवसुतांना जे आयुष्य लाभले, ते सुस्थिर होते असे म्हणता येणार नाही. शिक्षणासाठी भटकंती, पोटापाण्यासाठी भटकंती आणि पुढे निवासस्थानापासून दूरवरच्या प्रदेशात प्लेगने झालेला मृत्यू. हे सर्व पाहिल्यावर असे लक्षात येते की, संपूर्ण आयुष्यात सतत त्यांची ओढाताणच होत राहिली.

      असे असूनही त्यांनी मनाशी सदैव ‘नवे गीत गाण्या’ची महत्त्वाकांक्षा जपली. आपल्या दुर्मुखलेल्या मुखामधून भावी काळात ‘सदा सरस’ असा ‘वाङ्निष्यन्द’ बाहेर पडणार आहे हे त्यांनी आपल्या शालेय जीवनातच ओळखले होते.

      आधुनिक मराठी कवितेचे जनक-

      एकोणिसावे शतक आणि विसावे शतक यांचा संधिकाल (इ.स.१८९० ते १९१० हा काळ) महाराष्ट्राच्या दृष्टीने फार महत्त्वाचा कालखंड होता. इंग्रजी राजवट सुस्थिर झाली होती. ह्या राजवटीच्या विरोधात जनमत तयार होऊ लागले होते. लोकमान्य टिळकांनी स्वराज्याचा मंत्र दिला होता आणि लोक या मंत्राने भारले जात होते. असे असले, तरी इंग्रजी राजवटीचे जे काही सुपरिणाम झाले; ते लोकांना जाणवत होते. सामाजिक सुधारणांविषयीचे विचारमंथन सुरू झाले होते. राजकीय स्वातंत्र्य आधी की सामाजिक सुधारणा आधी, याविषयीचे वाद हिरिरीने लढवले जात होते आणि तरीही या दोन्ही आघाड्यांवर महाराष्ट्राची प्रगती आश्चर्यकारक वाटेल अशीच होती. १८९५ साली आगरकरांचे अकाली निधन झाले हे खरे, पण त्यांचे विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचले होते. त्यांनी आखून दिलेल्या मार्गाने महाराष्ट्र पुढे जात राहिला.

      इंग्रजी वाङ्मयाच्या अभ्यासाचा प्रभाव कळत-नकळत मराठी साहित्यावर पडत होता. आधी येऊन गेलेल्या भाषांतरयुगामुळे इंग्रजी साहित्य हे शिक्षित समाजाला परिचित झाले होते. निबंधमाला, केसरी, सुधारक या नियतकालिकांनी महाराष्ट्राला वाचनाची गोडी लावली होती. नाटके आणि वाङ्मयीन नियतकालिके यांच्यामधून महाराष्ट्राचा अभिजनवर्ग घडत होता. मराठी वाङ्मयामध्ये आधुनिकता येण्याच्या दृष्टीने हा अत्यंत पोषक असा कालखंड होता.

      केशवसुतांची कविता जन्मली आणि बहरली ती नेमकी याच कालखंडात. केशवसुतांच्या कवितेचा आशय आणि घाट या दोन्हींमध्ये अपूर्वता होती. स्वतःचा संप्रदाय निर्माण करण्याची ताकद त्यांच्या कवितेत होती. विसावे शतक संपले आणि एकविसावे शतक सुरू झाले, तरी केशवसुतांच्या कवितेचा प्रभाव संपला नाही. केशवसुत ‘आधुनिक मराठी कवितेचे जनक’ ठरले.

      समता, स्वातंत्र्य आणि विश्वबंधुत्व यांचा उद्घोष केशवसुतांनी कवितेमधून केला. बदलत्या काळाचे आणि समाजसुधारणेचे भान त्यांना होते. आपल्या शब्दांना शस्त्र बनावे लागेल, याची जाण त्यांना होती. जे युद्ध केशवसुतांना लढावयाचे होते, ते मुलायम शब्दांनी लढणे शक्य नव्हते. तेथे ओबडधोबड शब्दच कामी येणार होते. नवे शब्दही घडवावे लागणार होते. ते घडविण्याचे सामर्थ्य केशवसुतांकडे होते. ‘शब्दांनो, मागुते या’ असे आवाहन करण्याचे सामर्थ्य केशवसुतांजवळ होते.

      क्रांतिकारक कवी-

      केशवसुतांच्या काही कविता वैयक्तिक स्वरूपाच्या; आईवडील, जन्मभूमी यांच्यावरील प्रेम अभिव्यक्त करणार्‍या आहेत (गोष्टी घराकडील, नैर्ऋत्येकडील वारा इत्यादी). काही कविता काव्यविषयक विचार प्रकट करणार्‍या आहेत (शब्दांनो, मागुते या, आम्ही कोण). काही प्रीतिविषयक कविता आहेत (थकलेल्या भटकणार्‍याचे गाणे, प्रीती इत्यादी). काही निसर्गपर कविताही आहेत. (एक खेडे, अढळ सौंदर्य इत्यादी). सामाजिक कविता तर आहेतच- किंबहुना केशवसुतांची सर्वाधिक प्रसिद्धी त्यांच्या या समाजसुधारणा विषयक कवितांसाठी आहे (अंत्यजांच्या मुलाचा पहिला प्रश्न, तुतारी, स्फूर्ती, नवा शिपाई इत्यादी.) काही तत्त्वचिंतनात्मक कविताही आहेत. ‘हरपले श्रेय’ आणि ‘तुझे नाम मुखी’ या केशवसुतांच्या अखेरच्या दोन्ही कविता तत्त्वचिंतनात्मक आहेत. केशवसुत हे उत्तम शिक्षक होते, याची साक्ष त्यांच्या ‘विद्यार्थ्याप्रत’ आणि ‘उत्तेजनाचे दोन शब्द’ या कविता देतात.

     नव्या मनूतिल नव्या दमाचा शूर शिपाई आहे

     कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे

      ब्राह्मण नाही, हिंदुहि नाही, न मी एक पंथाचा

     तेच पतित की जे आखडती प्रदेश साकल्याचा

      खादाड असे माझी भूक

      चतकोराने मला न सुख

      कूपातिल मी नच मंडूक

      मळ्यास  माझ्या कुंपण पडणे अगदी न मला साहे

      कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे

      या प्रातिनिधिक काव्यपंक्ती केशवसुत प्रवृत्तीचे दर्शन घडविणार्‍या आहेत. केशवसुतांच्या पूर्वीची मराठी कविता मुख्यतः पारलौकिकाशी निगडित होती. केशवसुतांची कविता व त्यांच्यानंतरची एकूण कविता ऐहिकाशी आणि मानवी मनाशी जोडली गेली. मराठी कवितेतील ही क्रांती मूलभूत स्वरूपाची होती. केशवसुतांना ‘क्रांतिकारक कवी’ म्हणायचे, ते त्यासाठीच.

     “कविता म्हणजे आकाशीची वीज आहे. ती धरू पाहणारे शेकडा नव्याण्णव आपणास होरपळून मात्र घेतात. मी अशा नव्याण्णवांपैकीच एक आहे.” अशी लोकविलक्षण काव्यधारणा असलेले केशवसुत आपल्या साहित्य कर्तृत्वामुळे अवघ्या मराठी विश्वाचे आप्त ठरले, पुढीलांचे मार्गदर्शक ठरले.

      कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक-अध्यक्ष श्री.मधू मंगेश कर्णिक यांच्या कल्पक आणि सक्रिय नेतृत्वाच्या प्रेरणेमुळे या संस्थेने केशवसुतांचे भव्य स्मारक मालगुंड येथे उभारले आहे. ८ मे१९९४ रोजी कविवर्य कुसुमाग्रजांच्या हस्ते केशवसुत स्मारकाचे समारंभपूर्वक उद्घाटन झाले.

      स्मारक संकुलामध्ये केशवसुतांच्या जन्मघराचे जतन करण्यात आलेले आहे. या जन्मघराची दुरुस्ती करतानाही या घराचा कोकणी बाज प्रयत्नपूर्वक जपलेला आहे. हे स्मारक अल्पकाळातच महाराष्ट्राचे काव्यतीर्थ, मराठी कवितेची राजधानी ठरले, ही केशवसुतांच्या कवितेची पुण्याई आहे, असेही म्हणता येईल.

      - डॉ. विद्याधर करंदीकर

दामले, कृष्णाजी केशव