दांडेकर, मालती माधव
मालतीबाई दांडेकर या नावाने बहुतेक सर्व लेखन करणार्या या माहेरच्या अंबू बळवंत निजसुरे, मूळच्या धुळ्याच्या होत. त्यांचा जन्म धुळे येथे झाला. लग्नानंतर त्या बुधगाव येथे स्थायिक झाल्या. तत्कालीन परिस्थितीमुळे फक्त इंग्रजी चौथीपर्यंत शिक्षण घेतलेल्या मालतीबाईंनी वयाच्या एकोणिसाव्या वर्षी (१९३०) लेखनास सुरुवात करून पुढच्या पाच दशकांत विविध प्रकारची विपुल साहित्यनिर्मिती केली. त्यांचे सुमारे वीसच्या आसपास कथासंग्रह असून त्यांनी अनेक कादंबर्याही लिहिलेल्या आहेत. त्यांनी बालवाङ्मयही मोठ्या प्रमाणावर लिहिलेले असून, १९७७ साली जळगाव येथे भरलेल्या ‘बालकुमार साहित्य संमेलना’च्या त्या अध्यक्षाही होत्या. लोकवाङ्मयाचाही त्यांचा व्यासंग असून त्यांनी १९५२ साली ‘लोकसाहित्याचे लेणे’ या नावाने स्त्रियांच्या अनेक प्रसंगांवरील ओव्या व गीते संकलित व संपादित केलेली आहेत.
मालतीबाईंच्या कथांमधून सुरुवातीला मोठ्या प्रमाणावर आदर्शवाद दिसून येतो. नंतरच्या कथांमधून विविध विषय हाताळताना त्यांनी आपल्या कथांची अखेर प्रायः सुखाच्या प्रसंगांनी केलेली दिसते. ‘मातृमंदिर’ (१९४१), ‘तेजस्विनी’ (१९४३), ‘कृष्णरजनी’ (१९४७), ‘दुभंगलेले जग’ (१९६३), ‘वास्तू’ (१९६५), ‘तपश्चर्या’ (१९६९), ‘भिंगरी’ (१९७०), ‘अमरप्रीती’ (१९८०), ‘चक्रवर्ती’ (१९८१) या त्यांच्या काही प्रसिद्ध कादंबर्या.
त्यांच्या कादंबर्या प्रामुख्याने प्रणयप्रधान असल्या, तरी जुन्यानव्याचा समतोल सांभाळणार्या आहेत. त्यांच्या नायिका काळानुरूप बदलणार्या आहेत. त्यांच्या पिढीतील स्त्रियांच्या अनेक प्रश्नांचा मागोवा त्या ताकदीने घेतात. त्यांनी काही नाटकेही लिहिली असून त्यांत ‘ज्योती’ (१९५५), ‘पर्वकाळ ये नवा’ (१९६४), ‘संगीत संस्कार’ (१९६४), ‘मावशी दी ग्रेट’ (१९८२) ही प्रमुख आहेत. ‘ज्योती’ हे केवळ स्त्रियांचे असलेले असे नाटक असून त्यातली नायिका ज्योती ही स्वतंत्र विचारांची, सुशिक्षित, कर्तबगार आहे.‘मावशी दी ग्रेट’ हे संगीत नाटक असून त्यात सोनू मावशी व देवयानी ही दुहेरी भूमिका असून अशा प्रकारचे स्त्रीने लिहिलेले ते पहिले विनोदी नाटक आहे. त्यांनी साकार केलेल्या ‘मराठी कादंबरीतील अष्टनायिका’ (१९६१) हे पुस्तकही महत्त्वपूर्ण असून त्यांची अन्य काही पुस्तकेही वेगळेपणासाठी प्रसिद्ध आहेत.
त्यांनी बालकुमारांसाठी ११५ पुस्तके लिहिली असून ‘बालमनाला स्पर्श करणारी व त्यांच्या जीवनावर सुसंस्कार करणारी स्फूर्तिदायक रचना म्हणजे बालवाङ्मय’ ही त्यांनी केलेली व्याख्या व्यापक आहे.
- मधू नेने