Skip to main content
x

दडकर, रमेश कुमार

  रमेश कुमार दडकर यांचा जन्म मुंबईतील माटुंगा येथे झाला. त्यांचे शिक्षण मुंबईतच झाले.दादरच्या राजा शिवाजी विद्यालयात (किंग जॉर्ज इंग्लीश स्कूल) दहावीपर्यंत शिक्षण झाल्यावर त्यांनी रामनारायण रुइया महाविद्यालयात प्रवेश घेतला. ते दि. ११ डिसेंबर १९६२ रोजी भारतीय भूसेनेत दाखल झाले.
    १९७१ मध्ये पाकिस्तान युद्धाच्या वेळी ते मराठा लाइट इन्फन्ट्री पथकात मेजर या पदावर होते. त्यांच्या पथकाला पूर्व क्षेत्रात तैनात केले होते. हे पथक शत्रूच्या दिशेने वाटचाल करत होते. त्यांच्या वाटचालीत बाधा यावी म्हणून शत्रूने वाटेत भूसुरुंग पेरून ठेवले होते. त्यांच्या स्फोटात एक कनिष्ठ कमिशन्ड ऑफिसर जखमी झाला. समोरून शत्रूचा गोळीबार सुरूच होता. अशा परिस्थितीत निधडेपणाने दडकर यांनी आपल्या सोबत स्ट्रेचरवाहकांना घेऊन या अधिकाऱ्याच्या मदतीसाठी धाव घेतली.
    त्या अधिकाऱ्याला स्ट्रेचरवर टाकून तळाकडे आणत असताना शत्रूच्या गोळीबारात एक स्ट्रेचरवाहक गंभीर जखमी झाला. तशाही परिस्थितीत त्यांची सोबत करत मोठ्या धैर्याने दडकर यांनी त्या अधिकाऱ्याला तळाकडे आणण्याचा प्रवास सुरूच ठेवला. परंतु दुर्दैवाने शत्रूच्या मशीनगनने दडकर यांचा अचूक वेध घेतला व त्यात दडकरांना वीरमरण आले. या कार्यात दडकर यांनी जे धैर्य आणि निर्धाराचे प्रकटीकरण केले, त्यासाठी  त्यांचा मरणोत्तर ‘वीरचक्र’ देऊन गौरव करण्यात आला.
-संपादित

दडकर, रमेश कुमार