Skip to main content
x

देगलूरकर, धुंडीराज रामचंद्र

देगलूरकर, धुंडामहाराज

     वारकरी संप्रदायातील अग्रणी घराण्यांपैकी देगलूरकर घराणे हे एक आहे. गेली २५० वर्षे हे घराणे वारकरी भक्तिसंप्रदायाचा वसा व वारसा निष्ठेने, समर्पित भावाने जतन-संवर्धन करीत आहे. या घराण्याची भक्तिपताका गुंडामहाराज, महिपती महाराज, धुंडामहाराज, बंडामहाराज, गुंडामहाराज (तृतीय), भानुदास महाराज, एकनाथ महाराज, चंद्रशेखर महाराज, चैतन्य महाराज अशा एकापेक्षा एक विद्वान निरूपणकार भगवद्भक्तांनी फडकत ठेवलेली आहे.

धुंडामहाराज यांचा जन्म ह.भ.प. गुंडामहाराज देगलूरकर यांच्या संत घराण्यात इ.स. १९०४ (वैशाख शु. ३, शके १८२६) मध्ये झाला. त्यांचे जन्मनाव ‘धुंडीराज’ असे ठेवण्यात आले. त्यांच्या वडिलांचे नाव रामचंद्र व आईचे मनूबाई होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण देगलूर येथे झाले. श्री. रघुनाथ कोरडे मास्तर (कायगावकर) यांनी घरी येऊन धुंडामहाराज व त्यांच्या भावंडांना संस्कृत, मराठी व उर्दू शिकवले. तसेच, धुंडीराजाच्या गानशिक्षणासाठी हैद्राबादचे नामवंत गवई पं. विनायकबुवा यांना देगलूरच्या वाड्यात ठेवून घेण्यात आले होते.

पुढे कोरडे मास्तरांची औरंगाबादला बदली झाली तेव्हा मास्तरांसमवेतच धुंडामहाराज यांना माध्यमिक शिक्षणासाठी औरंगाबादला पाठविण्यात आले. धुंडामहाराज लहान असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर काही वर्षांतच आईचेही निधन झाले. माता-पित्यांचे छत्र हरपल्यावर त्यांचे काका, थोर संत ह.भ.प. महिपती महाराज यांनी धुंडामहाराज यांचे पंढरपूर येथे पुत्रवत संगोपन केले. धुंडामहाराजांच्या मातुःश्री मनूबाई यांची इच्छा धुंडामहाराजांनी आधुनिक शिक्षण घेऊन वकील व्हावे अशी होती; पण पंढरपूरच्या मठात महिपती महाराज देगलूरकर यांना भेटण्यास ह.भ.प. विष्णुपंत जोग महाराज आले असता छोट्याशा धुंडीराजची हुशारी पाहून ‘‘याला इंग्रजी शिक्षण न देता वारकरी सांप्रदायिक शिक्षणाचे, संस्कृत, मराठी संतसाहित्याचे धडे द्या,’’ असे सुचवून गेले. यानंतर पालक महिपती महाराज यांनी खुद्द धुंडीराजलाच, ‘‘तुला काय शिकायचे आहे?’’, असे विचारून वारकरी सांप्रदायिक शिक्षणाची पंढरपुरातच सोय केली. पंडितप्राण भगवानशास्त्री धारुरकर, वेदशास्त्रसंपन्न गोपाळशास्त्री गोरे यांच्यासारख्या उच्च कोटीतील विद्वानांकडे धुंडामहाराजांचे संस्कृत तत्त्वग्रंथांचे, शास्त्रांचे गुरुकुल पद्धतीने शिक्षण झाले. अहोरात्र संत-साहित्याचे अध्ययन, चिंतन आणि संस्कृत ग्रंथांचे परिशीलन, तसेच पारंपरिक भजन यांचा ध्यास घेतलेली काही वर्षे गेली आणि वयाच्या विसाव्या वर्षी धुंडामहाराजांनी ज्ञानेश्वरीवर पहिले प्रवचन करून आपल्या ज्ञानेश्वरी सेवेचा श्रीगणेशा केला. आषाढ, शके १८४६ (इ.स. १९२४) मध्ये प्रारंभ झालेला हा ज्ञानेश्वरी सेवेचा वाग्यज्ञ पुढे अखंड, धुंडामहाराजांच्या निर्वाणापर्यंत शके १९१३ (इ.स. १९९२) पर्यंत सलग ६५ वर्षे सुरू होता.

धुंडामहाराजांचे जीवन म्हणजे पाच तपे, सहा दशकांपैकी अधिक प्रदीर्घ ६०-६५ वर्षांचा जन प्रबोधनाचा धर्म-कीर्तन सोहळा आहे. वर्षातील ४ महिने चतुर्मासानिमित्त पंढरपूरमध्ये राहणे व उर्वरित ८ महिने उभ्या महाराष्ट्रातीलच नव्हे, तर आंध्र-कर्नाटकमधील हजारो खेड्यांमध्ये विविध नाम-सोहळ्यांत कीर्तन आणि प्रवचन करणे हेच त्यांचे अंगीकृत प्रबोधन कार्य होते. वृद्धापकाळी ते हृदयविकाराच्या आजाराने अस्वस्थ होते तेव्हा डॉक्टर म्हणाले, ‘‘थोडा काळ प्रवचन करणे बंद करा, आराम घ्या.’’ यावर धुंडामहाराज म्हणाले, ‘‘ज्ञानेश्वरीवर बोलायचेच नाही, तर मग मी जगायचे कशाला? ज्ञानेश्वरी सेवा करीत-करीतच माझ्या जीवनाची सांगता होऊ दे.’’ आणि ईश्वरीकृपेने त्यांना अखेरपर्यंत प्रवचन-सेवा करता आली.

धुंडामहाराजांचे कीर्तन हा भक्ती-ज्ञानाचा संगम आहे’, अशी महाराष्ट्रातीलच विद्वानांनी नव्हे, तर काशीच्या द्रविड  शास्त्रींनीही प्रशस्ती केलेली आहे. धुंडामहाराज जसे उत्तम प्रवचनकार, कीर्तनकार होते, तसेच ते उत्तम लेखकही होते. त्यांची ग्रंथसंपदा त्यांच्या प्रज्ञा-प्रतिभेची धवल पताकाच आहे. ‘संत ज्ञानदेव हरिपाठ विवरण’, ‘संत एकनाथ हरिपाठ विवरण’, ‘नारद भक्तिसूत्र विवरण’, ‘संत वचनामृत’, ‘ज्ञानदेवांचे पसायदान’ हे ग्रंथ वारकर्‍यांमध्ये, अभ्यासकांमध्ये विशेष वाचकप्रिय ठरलेले व संदर्भ ग्रंथांचे स्थान लाभलेले ग्रंथ आहेत. धुंडामहाराजांची विद्वत्ता, व्यासंग, प्रभावी वक्तृत्व, विचारगर्भ चिंतनात्मक लेखन आणि भक्तिरस परिपूर्ण कीर्तन यांमुळे त्यांच्याकडे ‘पेशवे’ पुरस्कार, पुणे विद्यापीठाचा ‘ज्ञानदेव’ पुरस्कार, असे अनेक पुरस्कार चालून आले. त्याचप्रमाणे अ.भा. कीर्तनकार संमेलन, नाशिकचे अध्यक्षपद, गोव्यातील कीर्तन परिषदेचे अध्यक्षपद, विश्व हिंदू परिषदेच्या आळंदी येथील हिंदू संमेलनाचे अध्यक्षपद, अशा अनेक संमेलनांची अध्यक्षपदेही त्यांनी भूषविलेली आहेत.

धुंडामहाराजांनी संत एकनाथांसारखा गृहस्थाश्रम धन्य केला. त्यांची चारही मुले उच्चविद्याविभूषित असून त्यांपैकी ह.भ.प. भानुदास महाराज यांनी धुंडामहाराज यांचा उत्तराधिकारी म्हणून वारकरी सांप्रदायिक वारसा पुढे चालविला आहे. सध्या भानुदास महाराजांचे सुपुत्र ह.भ.प. चैतन्य महाराज हे धुंडामहाराजांप्रमाणे, वारकरी संप्रदायात देगलूरकर घराण्याच्या नाम-भक्तीचा, ज्ञानेश्वरी प्रवचन सेवेचा नावलौकिक वाढवीत आहेत. पंढरपूर येथेच पौष वद्य पंचमी, शके १९१३ रोजी धुंडामहाराज यांचे निधन झाले आणि ती वार्ता ऐकून त्याच दिवशी पत्नी कृष्णाबाई यांचीही प्राणज्योत मालवली. दोघांची एकत्रित निर्वाण यात्रा काढण्यात आली होती.

- विद्याधर ताठे

देगलूरकर, धुंडीराज रामचंद्र