Skip to main content
x

देशमुख, विजया श्रीधर

संध्या

     अभिनेत्री संध्या यांचे संपूर्ण नाव होते ‘विजया श्रीधर देशमुख’. श्रीधर देशमुख हे रंगभूमीवरील कलाकार होते. देशी नाटक समाज या गुजराती नाटक कंपनीत ते काम करत. भांगवाडी थिएटरमध्ये त्या कंपनीची नाटके होत असत. विजया आणि त्यांची मोठी बहीण वत्सला. या दोघी लहानपणापासून त्या कंपनीच्या गुजराती नाटकातून भूमिका करत. नाटकातून अभिनय करता करता विजया अर्थात संध्या यांनी गुजराती चित्रपटातून काम करण्यास सुरुवात केली. या सुमारास शांतारामबापू मौज दिवाळी अंकात आलेल्या ‘श्रीमंताकडचे बोलावणे’ या चि.य. मराठे यांच्या कथेवर चित्रपट काढण्याच्या तयारीत होते. त्यासाठी त्यांनी विजया देशमुख या नव्या नटीची निवड केली, तो चित्रपट होता ‘अमर भूपाळी’. या चित्रपटासाठी विजया यांचे ‘संध्या’ असे चित्रनाव ठेवण्यात आले. ‘अमर भूपाळी’ चित्रपटातील त्यांची भूमिका ही तमासगिरिणीची होती व नाव होते गुणवती. चित्रपटात त्यांना बरीच नृत्ये करावयाची होती व त्यासाठी संध्याबाईंनी अपार कष्ट घेऊन नृत्याचे धडे गिरवले आणि आपली भूमिका पार पाडली. चित्रपट खूपच चालला आणि नायिका संध्या यांचे नाव झाले. होनाजी बाळांवरचा हा चित्रपट पुढे बंगाली भाषेत झाला.

       संध्याबाईंचा पुढचा चित्रपट होता ‘परछाई’. हा फक्त हिंदी भाषेत होता आणि त्यात त्यांच्या वाट्यास खलनायिकेची भूमिका आली होती. चित्रपटात नायक आणि नायिका म्हणून खुद्द शांतारामबापू आणि जयश्रीबाई होत्या. या चित्रपटामुळे संध्या हे नाव तमाम हिंदी भाषिक प्रांतातून प्रसिद्ध झाले. पुढचा चित्रपट होता ‘तीन बत्ती चार रास्ता’. हा चित्रपट भाषिक प्रांतवादावर आधारित होता. त्यानंतर शांतारामबापूंनी नृत्याला प्राधान्य असणारा रंगीत चित्रपट काढण्याचे ठरवले. हा चित्रपट होता ‘झनक झनक पायल बाजे’. नायिका म्हणून संध्या हे नाव जाहीर झाले. त्या प्रसंगी सुप्रसिद्ध दिग्दर्शक मेहबूब खान शांतारामबापूंना म्हणाले, ‘देखो, आप ये फिल्म कलरमें बना रहे हो, तो बडी नामवाली हिरॉईन - जैसे वैजयंतीमाला, पद्मिनी को लिजिये।” पण शांतारामबापू बधले नाहीत आणि संध्याबाईंनी चित्रपटात काम करून इतिहास घडवला. पुढे ‘दो आँखे बारह हाथ’, ‘नवरंग’ या चित्रपटांनी राजकमलचा कोष धनराशींनी भरून टाकला. ‘दो आँखे बारह हाथ’ने बर्लिनच्या चित्रपट महोत्सवात पारितोषिक पटकविण्याचा मान मिळवला. हॉलिवूडचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक सेसील बी. डिमेल यांनी त्यांच्यातर्फे एक पारितोषिक दिले. त्यानंतर संध्याबाईंनी ‘स्त्री’, ‘सेहरा’, ‘लडकी सह्याद्री की’, ‘जल बिन मछली नृत्य बिन बिजली’ यांसारखे चित्रपट शांतारामबापूंसाठी केले.

     १९७२ सालात त्याचा मराठी चित्रपट ‘पिंजरा’ पडद्यावर झळकला आणि त्या चित्रपटाने सर्व विक्रम मोडले. संध्याबाईंचा शेवटचा चित्रपट आहे ‘चंदनाची चोळी अंग अंग जाळी’ आणि वर्ष होते १९७५. संध्याबाईंनी राजकमलखेरीज दुसऱ्या कुठल्याही चित्रपट संस्थेत काम केले नाही. राजकमल आणि व्ही. शांताराम यांच्याशी संध्या यांची निष्ठा होती, हे सर्वज्ञात आहे. महाराष्ट्र शासनाने त्यांना राज कपूर जीवनगौरव पुरस्काराने गौरविले.

      सध्या राजकमल कलामंदिरमध्ये त्या निवृत्त जीवन जगत आहेत. ‘अमर भूपाळी’नंतर तब्बल पंधरा वर्षांनी संध्या यांनी ‘इये मराठीचिया नगरी’ या व्ही. शांताराम दिग्दर्शित चित्रपटात भूमिका केली.

- द.भा. सामंत

देशमुख, विजया श्रीधर