Skip to main content
x

देशपांडे, लक्ष्मण गणेश

       क्ष्मण गणेश देशपांडे यांचा जन्म वेल्हे महाल तालुक्यातील आंबेगाव या भोर संस्थानातील गावी झाला. प्राथमिक शिक्षण जन्मगावी व त्यानंतरचे शिक्षण मातुलग्रामी ठाणे, डहाणू येथे बंधूंकडे व बोर्डीच्या निवासी शाळेमध्ये झाले. बोर्डीच्या शाळेमध्येच कोसबाडच्या भिसे गुरुजींचे मार्गदर्शन लाभले व समाजसेवेचा मूलमंत्र मिळाला.

      लक्ष्मण लहानपणापासूनच अत्यंत हुशार व निसर्गप्रेमी होते. बोर्डीच्या शाळेत असताना निरनिराळे पुस्तके मिळवून शास्त्रीय प्रयोग करण्याचा नाद त्यांना लागला. ‘ऑर्थर पी’चे’ ‘बुक ऑफ नॉलेज’ त्यावेळी पाचवी-सहावीतला लक्ष्मण वाचत असताना इतरांनी थट्टा केली. परंतु त्याच पुस्तकाने छोट्या लक्ष्मणच्या मनात शास्त्राची आवड निर्माण केली. यातूनच पुढे छायाचित्रण, रेडिओ, ध्वनीक्षेपक तयार करण्याबरोबरच अनेक विद्युतविषयक प्रयोग त्यांनी केले. शास्त्रीय विषयाची ज्ञानोपासना चालू असताना बलोपासनाही चालू होती. व्यायाम, पोहणे, त्याचबरोबर स्काऊटींग मध्ये तरूण लक्ष्मणाने भाग घेतला. स्काऊटींगच्या आवडीतूनच मुले बरोबर घेऊन सांघिक खेळ खेळणे, पोहणे, सहली काढणे, शिकारीला जाणे, त्याचबरोबर बालवीर चळवळ व शिवाजी पथकातही त्यांनी भाग घेतला. मॅट्रिकनंतर पुण्यातील सर परशुरामभाऊ महाविद्यालयामध्ये व्ही.टी.सी. चे शिक्षण घेतले व सेकंडरी टिचर्स कोर्सची परीक्षा उत्तीर्ण झाले.

      यानंतर १९२९ मध्ये गोपाळ विद्यालय, पुणे येथे व्यायाम शिक्षक म्हणून नोकरीस लागले. फिलीप्स कंपनीमध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळत असतानासुद्धा शिक्षकच व्हायचे असल्याने हा पेशा स्वीकारला. व्यायाम शिक्षणाबरोबरच भूगोल, शास्त्र व इंग्रजी हे आवडीचे विषय देखील ते शिकवत असत. स्काऊटींग, विविध क्रीडा स्पर्धा भरविणे याचबरोबर भूगोल शिकविण्यासाठी अभिनव पद्धतीचा अवलंब केला. विद्यार्थ्यांच्या भारतभर निरीक्षण सहली काढणे. विद्यार्थ्यांकडून भारतातील विविध ठिकाणांचे व किल्ल्यांच्या प्रतिकृतींचे प्रदर्शन भरविणे. हेच किल्ल्यांचे प्रदर्शन गोपाळ विद्यालयाचे वैशिष्ट्य व पुण्याचे आकर्षण बनले होते. तसेच विद्यार्थ्यांकडून जगातील विविध देश आणि देशांतील राज्ये याबद्दल माहिती संकलीत करून वर्गवार प्रबंध स्पर्धा आयोजित केल्या. यातूनच गिरीभ्रमण, छायाचित्रण, पक्षीनिरीक्षण, शिकार, जलतरण आदी छंदाची जोपासना व विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण केली.

      गोपाळ विद्यालय ही शाळा भाड्याच्या जागेत जुन्या वाड्यात भरत असे. जागाखरेदीसाठी कर्ज व त्यावरील व्याजाने संस्थेचे कर्ज वाढले. वर्ग बांधणे जमले नाही उलट जप्तीचे फर्मान आले. अशा वेळी ल. ग. देशपांडे सरांनी पुढाकार घेऊन संस्था वाचवली. स्वतः कर्ज काढून तसेच माजी विद्यार्थी, मित्र व हितचिंतकांची मदत घेऊन शाळेसाठी चार मजली वास्तूनिर्मिती केली. ‘सुलभ शिक्षण मंडळाची’ स्थापना करून श्री गोपाळ प्राथमिक शाळा व श्री गोपाळ माध्यमिक शाळांचे पुनरूज्जीवन केले. हळूहळू शारदाश्रम हे मुलांसाठी वसतीगृह, वाचनालय, प्रयोगशाळा, प्रशस्त हॉल व चार मजली इमारतीच्या खाली पोहण्याचा तलाव अशी वास्तूरचना केली. पोहण्याचा तलाव असणारी ही त्यावेळची पहिलीच शाळा असावी.

      विद्यार्थ्यांना केवळ शालेय अभ्यासक्रम शिकवून समाधान मानणे देशपांडे गुरुजींना कधीच मान्य नव्हते. ‘जीवन शिक्षण’ देऊन त्यांना आदर्श नागरिक करण्याचे दृष्टीने त्यांचे प्रयत्न असत. ‘कृतिद्वारा शिक्षण’ हे त्यांच्या दृष्टीने तत्त्वज्ञानच नव्हते. ते स्वतः विद्यार्थी बनून शिकतही असत. शाळेत हातमाग, शिवणकाम, टायपिंग, खडू, प्लॅस्टरच्या वस्तू, पुठ्ठाकाम, सूतकताई आदी शिक्षणाची व्यवस्था करून त्यांनी मुलांना हाताने निर्मितीला प्रोत्साहन दिले. उत्साही धडपडणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी क्लब सुरू केला. 

       देशपांडे गुरुजी अभिनव छंद जोपासणारे छंदोपासक होते. गुरुजींना लहानपणापासूनच छायाचित्रणाचा छंद होता. प्रवास करताना आपण जे पाहिले त्याची स्मृती जवळ असावी व ते इतरांनाही दाखवावे असे त्यांना वाटत असे. त्यातूनच त्यांनी देश-विदेशातील १० हजारांहून जास्त चित्रफिती तयार केल्या व त्याद्वारे भारत व जगात अनेक ठिकाणी व्याख्याने  देऊन राष्ट्रीय एकात्मतेस हातभार लावला. बाबा आमटे यांच्या कार्याने  गुरुजी अत्यंत भारावून गेले होते. त्यांनी बाबांच्या कार्यासंबंधी चित्रफित तयार करून देश-विदेशात दाखविल्या. त्यांनी निर्माण केलेल्या शिक्षणोपयोगी दृक साहित्याचा समाजाला उपयोग व्हावा म्हणून ‘ल. ग. देशपांडे प्रतिष्ठान’ ची स्थापना त्यांनी केली. तसेच माशांच्या जीवनाचा अभ्यास करून अनेक प्रकारचे मासे मिळविले व त्याचे १९४२ साली प्रदर्शन भरविले यातूनच महानगरपालिकेच्या संभाजी उद्यानातील मत्स्यालयाचा जन्म झाला. तसेच स्वातंत्र्यलढ्यात भाग घेणाऱ्या भूमिगत कार्यकर्त्यासाठी त्यांनी संदेशवाहक तयार केले व अनेक भूमिगत रेडिओ केंद्र चालवली. त्याचबरोबर कळसूत्री बाहुल्यांचा अभ्यास करून त्यावर पुस्तक लिहिले, त्यांना बरोबर ‘दै. सकाळ’ चा पुरस्कार मिळाला. त्याचबरोबर श्‍वान प्रदर्शन, मुष्टियुद्ध, जादूचे प्रयोग, सुटे भाग घेऊन मोटार व मोटारसायकल तयार करणे असे अनेक छंदही त्यांनी जोपासले. प्रत्येक छंद जोपासताना त्या संबंधातील वाचन केले आणि अत्यंत शास्त्रोक्त गोष्टींचा सखोल अभ्यास केला. जे शिकले ते शिकवले तर त्याचा समाजाला उपयोग होईल असा त्यांचा ध्यास असे. ते खऱ्या अर्थाने ‘जीवन-शिक्षणाचे’ शिक्षक होते.

- विवेक कुलकर्णी

देशपांडे, लक्ष्मण गणेश