Skip to main content
x

देशपांडे, मधुसूदन नरहर

     मधुसूदन नरहर देशपांडे एक विलक्षण व्यक्तिमत्त्व होते. ते एखाद्या स्थानाला भेट देत, तेव्हा त्या स्थानाबरोबर पूर्णपणे एकरूप होत. समाधान होईपर्यंत ते सातत्याने शिल्पांबरोबर संवाद साधत. किंबहुना, काळाच्या ओघात नष्टप्राय होणारे अवशेष आपली संवेदना जणू त्यांच्यासमोर व्यक्त करत. त्यांनी केलेले काम तसे मोजकेच, पण बोलके असे आहे. सातारा जिल्ह्यातील कडेढोण-मायणी (रहिमतपूर) या लहानशा गावात त्यांचा जन्म झाला. ‘आपले कुटुंब हे विश्वभारती आहे’, असे ते म्हणत. विविध प्रांतांबरोबर त्यांच्या कुटुुंबीयांचे नातेसंबंध प्रस्थापित झाले होते. भारतीय पुरातत्त्व विभागात अधीक्षक या पदावर त्यांनी आपल्या कामाची सुरुवात केली. ते महासंचालक, भारतीय पुरातत्त्व विभाग या पदावरून निवृत्त झाले. पुढे नेहरू सेंटर, मुंबई येथे त्यांनी काही काळ प्रमुख म्हणून काम केले.

     डॉ. मधुसूदन नरहर देशपांडे यांना ‘अजातशत्रू’ म्हणून ओळखले गेले. आपल्या विविध क्षेत्रांतील कामांसाठी जगभरातील पुरातत्त्वज्ञांना त्यांचे आकर्षण राहिले. त्यांनी केलेल्या जतनविषयक कामांतून विविध महत्त्वपूर्ण उपलब्धी झाल्या. १९४६ मध्ये केंद्रीय पुरातत्त्व विभागात कामाला सुरुवात करताना त्यांना मार्टिमर व्हिलर यांचे मार्गदर्शन लाभले. प्रारंभीच त्यांना ‘तक्षशिला’ येथील उत्खननाचा अनुभव मिळाला. १९७८ मध्ये त्यांनी डायरेक्टर जनरल या सर्वोच्च पदावरून निवृत्ती स्वीकारली.

     फर्ग्युसन महाविद्यालयातून ‘अर्धमागधी’ या विषयात पदवी घेतल्यानंतर ह.धी. सांकलिया यांच्या मार्गदर्शनाखाली ‘अ कल्चरल हिस्टरी ऑफ जैन बेस्ड ऑन कॅनोनिकल लिटरेचर अ‍ॅण्ड आर्किओलॉजी’ (जैनांचा सांस्कृतिक इतिहास-धार्मिक साहित्य व पुरातत्त्वाधारे) या विषयात पीएच.डी. पदवी घेतली. आयुष्यात निवडक असे साधारण पन्नास शोधनिबंध प्रकाशित झाले असले तरी त्याला आंतरराष्ट्रीय दर्जा होता. नेवासा, विशेषत्वाने बहाळ व टेक वडा उत्खनन हे प्रागैतिहासिक इतिहासाच्या संदर्भात महत्त्वाचे ठरले. दायमाबाद उत्खननात त्यांचेच मार्गदर्शन शंकर साळी यांस लाभले. अजिंठा पेन्टिंग्स, एलोरा शिल्प, तसेच भाजा येथील लेण्यांतील लाकडी फासळ्यांवरील शिलालेखांचे वाचन, तसेच पितळखोरा येथील लेण्यांवरील संशोधन अनेक दृष्टीने महत्त्वाचे ठरले. ‘तेर’ येथील रोमन मृद्भांडी व रोमन संपर्क यासंदर्भात त्यांचे लेखन लक्षणीय आहे.

     पंजाबमधील अंबखेरी येथे त्यांनी हडप्पन संस्कृतीचे अवशेष शोधले, तर तामलुक (Tamluk) येथे गुप्तकाळातील मृद्भांड्यांच्या संदर्भातील काम लक्षणीय होते. त्यांची तीन दिवसांची व्याख्यानमाला, जी नामग्याल इन्स्टिट्यूट ऑफ तिबेटोलॉजी, गंगटोक येथे झाली. त्याचा विषय अजिंठा आणि टॅबे लाहोल स्पिटी (हिमालयन अजंठा) हा होता (१९७३). त्यांच्या निवृत्तीनंतर ‘मधू’ या नावाने गौरवग्रंथ (फेलिसिटेशन व्हॉल्यूम) १९८१ मध्ये निघाला, तो संदर्भग्रंथ म्हणून मानला जातो. त्यांनी निवृत्तीनंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ या ग्रंथाधारे नेहरू सेंटर येथे कलादालनाची निर्मिती केली.

     कैलासबरोबरचा संवाद : वेरूळ लेण्यांतील कैलासच्या निर्मितीचा इतिहास सांगताना देशपांडे प्रत्यक्ष कैलास श्रोत्यांसमोर उभा करीत. यांतील प्रत्येक शिल्पनिर्मितीची त्यांना जाण होती. एकूण भारतीय कला-इतिहासावर त्यांची चांगली पकड होती. दशावतार लेण्यांच्या बाबतीत (लेणे क्र.१५, वेरूळ, जि. औरंगाबाद) ते म्हणतात, ‘‘येथे सातव्या-आठव्या शतकात दोन ताल व तीन ताल, रावण की खाई, दशावतार या विशाल लेण्यांची निर्मिती कैलासच्या आधी झाली. मुळात सहाव्या-सातव्या शतकात बदामी चालुक्यांच्या प्रभावाखाली दशावतार लेणे खोदण्यास सुरुवात केली गेली. आठव्या शतकाच्या प्रारंभी बौद्ध धर्मियांनी या स्थानावर आपला प्रभाव जमवला व लेण्याच्या वरच्या मजल्यावर त्यांनी बुद्ध प्रतिमा खोदण्यास प्रारंभ केला. याची साक्ष येथील बुद्ध प्रतिमा व तत्संबंधी परिवार देवतांच्या मूर्तिशिल्पांवरून मिळते. नंतर राष्ट्रकूट राजा दंतिदुर्ग याने हे लेणे बौद्धानुयायांकडून काढून घेतले. (इ.स. ७३५ ते ७५५).

     लेण्यांच्या प्रांगणात एकाश्म नंदीमंडपाच्या दर्शनी भागावर दंतिदुर्गाचा शिलालेख आहे. येथे त्याने काही काळ वास्तव्य केले होते असे दिसते. मंडपाचे जाळीदार वातायन हे चालुक्य स्थापत्यशैलीचे वैशिष्ट्य व्यक्त करते. किंबहुना, ते ऐहोळीच्या लाडखाण ते पट्दखल-विरूपाक्ष पापनाथ परंपरेतील आहे. द्वितीय विक्रमादित्याच्या काळात लेण्यांच्या उत्खननास सुरुवात झाली होती. नंदी मंडपासमोरील शिवालयाचे व शिवपिंडीचे काम रेंगाळले होते. हे काम शेवटचा चालुक्य राजा द्वितीय कीर्तिवर्मन याच्या कार्यपद्धतीमुळे रेंगाळले असावे. याचा फायदा बौद्ध धर्मियांना झाला. वरील मजल्यावर बुद्ध व बोधिसत्त्व परिवारकांची शिल्पे उत्कीर्ण केली गेली, तर राष्ट्रकूट राजा दंतिदुर्ग याने हे लेणे पुन्हा हिंदु धर्मियांकडे सोपविले. परिणामी, वरील मजल्यावर असलेल्या शिल्पपटात नव्याने मूर्तींचे रूपांतर केले गेले. जुन्या बौद्ध प्रतिमा नव्या शिल्पात थोड्या फरकाने सामावून घेतल्या गेल्या. उदा. शिवतांडव शिल्पातील पार्वती ही मुळातील सव्यललितासनात बसलेली तारेची मूर्ती आहे.

     अंतराळात समोरा-समोर कोरलेले मूळ यक्ष-कुबेर व महामयूरी यांच्या मूर्ती थोड्याफार किंवा अर्धवट प्रयत्नांनी परिवर्तित केल्या गेल्या. येथील यक्ष-कुबेरांचे गणपतीमध्ये परिवर्तन झाले, तर महामयूरीचे मयूरवाहन कार्तिकेयास बहाल करण्यात आले. असे करताना मूळ स्त्री-देवतेचे पुरुष (कार्तिकेय) प्रतिमेत रूपांतर करण्यात आले. अशी सूक्ष्म निरीक्षण देशपांडेच करीत. एकूण राष्ट्रकूट काळात बौद्ध कलेच्या प्रसारास आळा बसला, तर शैव उपासनेला प्राधान्य मिळाले.

     मुंबई परिसरामध्ये सहाव्या शतकात घारापुरी, जोगेश्वरी, मंडपेश्वर या ठिकाणी शैव शैलगृहांची निर्मिती झाली. कान्हेरी येथे मात्र बाराव्या शतकापर्यंत तांत्रिक वज्रायानी केंद्र सुरू होते. बौद्ध धर्म टिकून होता. कोंडिवटे येथे पण बौद्ध धर्म टिकून होता. मुळातील हीनयान विहार आता महाकाल नावाने ओळखला जाऊ लागला, यांसारखे त्यांचे निरीक्षण विलक्षण आहे.

     महाराष्ट्रामध्ये राष्ट्रकूट काळात शैव लेणी खोदण्यास प्रारंभ झाला. पाताळेश्वर लेणी (पुणे), हरिश्चंद्र गडावरील लेणी व ढोके (टाकळी ढोकेश्वर, जि. अहमदनगर) येथे लयन निर्मिती झाली. थोड्या आधीच्या काळात लाकुलिश शिवाला प्राधान्य असलेली कलचुरींची शिवमंदिरे उभारली गेली.

     गणपती : ॐ पासून साकारलेला गणेश वैदिक काळापासून असल्याची मान्यता असली, तरी प्रत्यक्ष शिल्पाच्या स्वरूपात महाराष्ट्रात सहाव्या शतकाच्या सुमारास गणपती व कार्तिकेय शिल्पे दिसू लागतात. कल्याणजवळील लोणाड येथे पाचव्या शतकात कोरलेली पहिली स्वतंत्र गणेशाची मूर्ती दिसते, ती दोन हातांची आहे. नंतर सप्तमातृकांबरोबर वेरूळमध्ये गणेश दिसू लागतो. कैलास लेण्यांत मात्र आठव्या शतकात गर्भगृहात सभोवताली असलेल्या सप्तपरिवार देवतेच्या मंदिरात गणपतीला स्वतंत्रपणे स्थान दिल्याचे दिसते. येथून याच्या स्वतंत्र पंथाची सुरुवात झाली असावी. म्हणजे सहाव्या शतकात यक्ष-कुबेराची जागा घेऊ लागलेला गणेश राष्ट्रकूट काळात प्रथमच शैव उपासनेत नंतर देवता परिवारातील एक घटक व पुढे स्वतंत्र देवता याप्रमाणे महाराष्ट्रात गणेश पूजेला प्रारंभ झाला.

     शिलाहार राजा अपराजिताने शके ९१९ च्या भांदक दानपत्रापासून ‘‘ॐ नमो विनायकाय’’ अशी दानपत्राची सुरुवात होऊ लागली. त्यानंतर विस्तृत शिवस्तुतिकारक श्लोक येऊ लागले. अरिरकेसरीच्या शके ९३९, ठाणा ताम्रपटात गणपतीच्या स्तुतीसाठी एका स्वतंत्र श्लोकाची सुरुवात झाली : ‘‘सिद्धां जयश्चाभ्युदयश्चं लभते सर्वकार्येषु पूजया गणनायक:। विघ्नं निघ्नन्सव: पायाद् पायाद् गणनायक:॥ ’’ आणि हीच परंपरा जवळ-जवळ सर्व लेखांत दिसते. यावरून असे म्हणता येते, की दहाव्या शतकाच्या अखेरीपासून गणपतीच्या पूजेला महाराष्ट्रात अग्रस्थान मिळू लागले. पन्हाळेकाझी येथील शिलाहार काळात परिवर्तित केलेल्या लेण्यांच्या प्रवेशद्वारांवरील ललाटबिंबांवर गणेशमूर्ती आली. यांसारखे सूक्ष्म निरीक्षण ते सहजपणे नोंदवीत असत.

     पितळखोरा (जि. औरंगाबाद) येथील लेण्यांच्या जतनविषयक कामात शराव घेतलेल्या यक्षाची मूर्ती मिळाली, जिच्या हाताच्या मनगटावरील बाजूस ब्राह्मी लेख आहे, तर येथे मिळालेल्या हत्तीच्या रांगेचा अभ्यास करताना पुढे विकसित झालेल्या मंदिराच्या अधिष्ठानावरील गजथराचा प्रारंभ येथे पाहायला मिळतो असे त्यांनी नोंदवले. शेवटी त्यांनी ठाणाळा बौद्धलेणी - पन्हाळे काजी, वज्रयान केंद्र शैव, गाणपत्य व नाथ संप्रदायांवर नवा प्रकाश ही व्याख्यानमाला, ‘हुतात्मा विष्णू गणेश पिंपळे स्मारक व्याख्यानमाला’ म्हणून विदर्भ संशोधन मंडळ, नागपूर येथे दिली (१९८१). पुढे याचा इंग्रजी ग्रंथही प्रकाशित झाला. कोकणातील लयनस्थापत्यावर नव्याने प्रकाश टाकणारे हे संशोधन त्यांची विलक्षण प्रतिभा, सर्व धर्मसंप्रदायांच्या कामांची व विकासाची असलेली जाण, तत्कालीन साहित्याचे आकलन या व अशा अनेक बाबी स्पष्ट करणारे व सामान्य अभ्यासकाला थक्क करणारे आहे. ठाणाळे (नाडसूर) ता. सुधागड, जि. रायगड पालीपासून २३ कि.मी. बुद्धलयन लेणी, एक चैत्यगृह, एक स्मारक स्तूपसमूह (Memorial Stup Complex) आणि २१ विहार लेणी आहेत. या लयन समूहातील काही लेणी भाजेपेक्षा जुनी असावीत असे त्यांनी मत नोंदवले. किमान पाच वेळा येथे परिवर्तन, खोदकाम  व रंगलेपन (चित्रे) केले गेले. चौलचे, बंदर म्हणून महत्त्व संपले, तसे पाचव्या शतकानंतर ही लेणी ओस पडली. लेणे क्र. तीन हे स्मारक स्तूपगृह आहे. विशेष म्हणजे, या लेण्यांचा नंतर अन्य कोणी उपयोग केला नाही. या लेण्यांचा अभ्यास करताना, लेण्यांची साफसफाई करताना त्यांनी घेतलेल्या दक्षतेमुळे तत्कालीन अवशेष उपलब्ध होऊ शकले. म्हणजे पुढे उपयोगात न आल्यामुळे काही वस्तू तशाच धूळ व मातीत गाडल्या गेल्याचे दिसून आले आहे. याला पुरातत्त्वीय भाषेत Cultural Debris म्हणतात. ते साफ करून मूळ वापरातील भूमी तपासण्याची संधी त्यांना मिळाली ती त्यांच्याच कार्यपद्धतीमुळे. येथे वासुदेव बळवंत फडके काही काळ राहिले होते.

     पन्हाळे-काजी : कोकणातील एक तांत्रिक वज्रयान केंद्र (ता. दापोली, जि. रत्नागिरी) येथे एकूण २९ लेणी सापडल्या. इ.स. दुसर्‍या शतकापासून लयन निर्मितीस प्रारंभ झाला, ते तेराव्या-चौदाव्या शतकापर्यंत सुरू होते. हीनायन, वज्रयान हिंदू नाथपंथीय याप्रमाणे येथील परीवर्तने पाहावयास मिळतात, ती केवळ देशपांडे यांच्या तरल बुद्धिमत्तेमुळेच स्पष्ट झाली, असे मानावे लागते. पन्हाळे-काजी येथील वज्रयान पंथीयांचा संपर्क कान्हेरी , तसेच पूर्व भारतातील बिहार येथील वज्रयान संप्रदायाशी होता. पुढे हेच वज्रयानपंथी केंद्र नाथ संप्रदायाकडे वळले असावे. यासारखी मते देशपांडे सप्रमाण नोंदवतात. लेणीसमूहातील एकूण २९ लेण्यांपैकी १४ लेणी इ.स. तिसर्‍या ते पाचव्या शतकापर्यंत पूर्ण झाली होती, तर क्र.१,३,१२ व १३ या बाराव्या शतकात हिंदू लेणी म्हणून कोरली गेली. तेराव्या शतकात लेणी क्र. २४, २६ व २९ विकसित झाली. लेणे क्र. १९ ची रचना करताना पुढे मोकळे प्रांगण ठेवून, त्यानंतर मंडप व प्रदक्षिणा पथयुक्त सांधार गर्भगृह खोदले. येथेच करोटक वितान व बाजूने समतल वितान ठेवले गेले, शिवाय प्रवेशालगत कठडा आहे. क्र. २९ चे लेणे खोदताना पुढे प्रांगण, उत्तर बाजूला एकाश्म खडकातील खोदकाम, तर दक्षिण बाजूला भिंत बांधली आहे. येथे ८५ पट असून अशा चौकोनी स्तबकात आदिनाथ आणि गिरीजा, तसेच मच्छिंद्रनाथ, त्रिपुरसुंदरी व गोरक्षनाथ दाखवले आहेत. पन्हाळे-काजीचे वैशिष्ट्य म्हणजे लेणी क्र. १० मधील महाचण्डरोषणाची मूर्ती तांत्रिक वज्रयान पंथाच्या दृष्टीनेही महत्त्वाची मानली जाते.

     महाचण्डरोषण : यालाच ‘चंडरोषण’ किंवा ‘अचल’ असेही म्हणतात. हत्ती व सिंह असलेल्या सप्तरथ अधिष्ठानावर हा स्थिर आहे. चंडरोषणाच्या अन्यही प्रतिमा या परिसरात मिळाल्या आहेत. चण्डरोषण दिसायला भयंकर, हातात खड्ग व तर्जनी पाश घेतलेला, डावा गुडघा जमिनीवर टेकलेला, वीरासनात दिसतो. पुढे पंधराव्या-सोळाव्या शतकात नेपाळमध्ये कापडी थकावर व तिबेटमध्ये अठराव्या शतकात या मूर्ती पाहावयास मिळतात. याची पूजा, उपासना अत्यंत गुप्तपणे करावी असा संकेत आहे.

     तांत्रिक उपासनेचा प्रणेता, मैत्रेय मानला जातो. बुद्धाच्या नंतर एक हजार वर्षांनी महायान पंथात या तंत्रयानाचे आरोहण झाले. साधारणपणे सहाव्या शतकात औरंगाबाद, वेरूळ यांही ठिकाणी वज्रायान पंथ दिसायला लागतो. तो अवलोकितेश्वराच्या स्वरूपात. ओरिसा, तसेच बंगाल आणि खाली आंध्र-कर्नाटकातसुद्धा या पंथाचे लोण पसरले होते. या पंथात उपासना करताना, विशेषत: चंडरोषणाचे ध्यान करताना मुकुटावर अक्षोभ्याची प्रतिमा आहे अशी कल्पना केली जाते. पन्हाळे-काजी येथे अक्षोभ्याच्या जवळपास पाच प्रतिमा मिळाल्या. अक्षोभ्य देवता परिवार पंचध्यानी बुद्धांच्या कल्पनेशी निगडित आहे. हा पंचध्यानी बुद्ध आदिदेव असून त्याचा मूळ वज्रयान पंथ अनेकेश्वरवादी झाला. यासारखे तपशील नोंदवताना पुढे या पंथाची जागा नाथ पंथीयांनी कशी घेतली हे ते सांगतात.

     शिलाहार काळात विकसित झालेल्या लेण्यामध्ये या बाबी प्रामुख्याने अधोरेखित केल्या गेल्या. वज्रयानामध्ये सुमारे आठव्या-नवव्या शतकापासून ८४ सिद्धांचे युग सुरू झाले असे म्हटले जाते, आणि ही ८४ सिद्धांची परंपरा नाथपंथामध्येही काही फरकाने सामावली  आहे. तांत्रिक वज्रयान पंथात ८४ सिद्धांची नावे मिळतात. नेपाळ व तिबेट येथे या सिद्धांची पूजा अद्यापही प्रचलित आहे. अर्थात, या परंपरेचा समन्वय स्पष्टपणे दाखवणे तितकेसे सोपे नाही ही बाब ते नोंदवतात. असे करताना लेण्यात असलेल्या मूर्तिशिल्पांची निश्चिती करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. यासाठी ते या पंथाचे संपूर्ण तत्त्वज्ञान, ज्ञानेश्वरी व तत्कालीन अन्य उल्लेख यांचे दाखले देतात.  एकूण, पन्हाळे-काजी येथील लेण्यांतील मूर्तिशिल्पांचे स्पष्टीकरण व नामनिश्चिती करण्याचा त्यांनी केलेला प्रयत्न हा एक अविस्मरणीय असा ठसा आहे. यामुळे महाराष्ट्राच्या, विशेषत: कोकणाच्या सांस्कृतिक इतिहासाचे वेगळे दालन त्यांनी अभ्यासकांपुढे उभे केले.

     म.न. देशपांडे यांचे प्रत्यक्ष लेखन वाचणे, अभ्यासणे आणि त्यांचे व्याख्यान ऐकणे हा संशोधकांना निखळ आनंद देणारा भाग होता. नुसत्या शब्दांनी, कुठल्याही अन्य साधनाशिवाय ते संपूर्ण कैलास उभा करत व श्रोत्यांना वेगळ्या भावविश्वात घेऊन जात. असे करताना एकूण मध्य आशियाई व भारतीय कला - इतिहासाचा परस्पर संबंध व संपर्क ते सहजपणे स्पष्ट करतात.

डॉ. अरुणचंद्र पाठक

देशपांडे, मधुसूदन नरहर