देशपांडे, सुनीता पुरुषोत्तम
सुनीता पुरुषोत्तम देशपांडे यांचा जन्म रत्नागिरीत झाला. वडील सदानंद ठाकूर हे रत्नागिरीतील निष्णात फौजदारी वकील होते. ते मूळचे धामापूरचे. काँग्रेसमध्ये असलेले सुनीताबाईंचे मामेमामा राजा पाटेकर यांनी अण्णासाहेब सहस्रबुद्धे ह्यांच्याशी सुनीताबाईंचा परिचय करून दिला. त्यांनी १९४२ साली भूमिगत रेडिओ सुरू करण्याची जबाबदारी सुनीताबाईंवर सोपवली; पण ते काम कधीच सुरू झाले नाही.
१९४२ सालच्या लढ्याला सशस्त्र क्रांतीचे वळण लागल्यामुळे हत्यारे, दारूगोळा इत्यादी वस्तूंची ने-आण करण्यासाठी पुरुषांपेक्षा स्त्रियांना अधिक उपयुक्त मानले जात होते. सुनीताबाईंकडे टाइम बॉम्ब बनविण्याचे काम आले. बॉम्ब बनविण्याची कृती पुस्तकात देताना त्रुटी राहिल्यामुळे अपेक्षित परिणाम मिळेपर्यंत रात्री दोन-अडीचपर्यंत बाईंनी चिकाटीने प्रयत्न केले. अपेक्षित परिणाम मिळाला; पण तो अनपेक्षित, आणि भलत्याच वेळी! महाविद्यालयामध्ये असताना निघालेल्या मोर्चाचे नेतृत्व करताना बंद छत्रीला तिरंगा लावून तो उंचावत, बाई बंदुका रोखून येणार्या मिलिटरीच्या गाड्यांच्या ताफ्याला सामोऱ्या गेल्या होत्या!
राष्ट्रसेवादलात काम करताना आपला खर्च आपण करायचा, वडिलांकडे काही मागायचे नाही, असा बाणेदारपणा बाईंनी दाखवला. स्वतःच्या आवडीने आणि निर्णयाने कोणतेही कार्यक्षेत्र व्यक्तीला निवडता आले पाहिजे आणि हाती घेतलेले कोणतेही काम तडीस जाईपर्यंत चिकाटी सोडू नये, ही तत्त्वे त्यांनी कायम जपली. कामसू, काटेकोर, काटकसरी स्वभावाच्या सुनीताबाईंना कपडालत्ता आणि दागिने यांचे आकर्षण कधीही वाटले नाही. साध्या, घरगुती गोष्टी निगुतीने, पद्धतशीरपणे केल्यास वेळेची आणि खर्चाची बचत होते. कांदा कापण्यासारख्या कामातही शिस्त आणि सौंदर्य ह्यांचा मेळ घालून त्याची उपयुक्तता वाढते, हे सांगणार्या सुनीताबाईंनी पुलंचे कपडे शिवणे, गाडी चालविणे, गाडीची जुजबी दुरुस्ती करणे ह्याही गोष्टी आपल्या उमेदीच्या काळात केल्या. बंगाली आणि उर्दू भाषांच्या अभ्यासातही त्यांनी बर्यापैकी प्रगती साधली होती.
लग्न हे कृत्रिम बंधन वाटत असतानाही पु.ल. देशपांडे या बिजवराशी सुनीताबाईंनी १९४६ साली प्रेमविवाह केला. आठ-दहा महिन्यांनंतर प्रथमच डोहाळे सुरू झाले असताना कौटुंबिक जबाबदार्या संपेपर्यंत स्वतःवर दुसरी कोणतीही जबाबदारी नको, असा विचारपूर्वक निर्णय दोघांनीही घेतला. जनता विद्यालय, पुणे या मोफत शिक्षण देणार्या मुलींच्या शाळेत सुनीताबाईंनी सेवाभावी वृत्तीने अध्यापनकार्य करायला सुरुवात केली. शिक्षणक्षेत्रात काम करायचे तर शिक्षणशास्त्राचा अभ्यासही हवा, तो त्यांनी सुरू केला. भाऊसाहेब हिरे यांच्या मालेगाव येथील शिक्षणसंस्थेत काम करण्यासाठी त्यांनी पार्ले टिळक विद्यालयातील नोकरी सोडली.
सुनीताबाई आणि पुल ह्या दोघांनाही कवितांची आवड होती. त्यांना अनेक कविता पाठ होत्या. ह्या आवडीतून त्यांनी मर्ढेकर, आरती प्रभू आणि बोरकर यांच्या कवितांचे केलेले जाहीर कार्यक्रम खूप गाजले. कार्यक्रमाच्या रंगमंचाची व्यवस्था, तिकिटाचे दर यांविषयी सुनीताबाई फार आग्रही असत. ‘बटाट्याची चाळ’च्या तिकिटांचे दर १५ ते २० रुपये चालू शकले असते पण त्यांनी ते २ ते ७ रुपये असेच ठेवले. पुरेशा सोयी नसलेल्या ठिकाणी कलाकारांना किंवा प्रेक्षकांना त्रास होणार असेल, तर मोठी बिदागी मिळत असूनही त्यांनी प्रयोगाचे आमंत्रण स्वीकारले नाही.
प्रयोग चांगले चालत असूनही ते ५० प्रयोगांनंतर बंद करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. हा निर्णय इतरांना कठोर आणि चुकीचा वाटला, तरी प्रयोग बंद झाल्यामुळेच पुलंकडून ‘वार्यावरची वरात’ हे प्रहसन लिहून झाले. मग पुन्हा ‘बटाट्याची चाळ’चे प्रयोग सुरू केले गेले. ५० प्रयोगांनंतर ते पुन्हा बंद केले गेले. ‘असा मी असामी’, ‘वटवट’ ह्यांचे लेखन पुलंनी ह्या ‘बंद’च्या काळात केले. पुढे, वाढत्या वयामुळे पुलंची स्मरणशक्ती, त्यांचा अभिनय व श्वास यांवर विपरीत परिणाम होऊ लागल्याचे लक्षात येताच बाईंनी सर्व प्रयोग थांबवले. कलेबाबत तडजोड अमान्य केल्यामुळे त्यांना रोषाचे आणि दोषाचेही धनी व्हावे लागले.
सत्पात्री दान पडावे म्हणून ‘ट्रस्ट’ची स्थापना करणे, ‘अनामिका’ ही नाटक कंपनी सुरू करणे, लेख पुनर्मुद्रित करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे, लेखकाच्या परवानगीशिवाय त्यात फेरफार करू नयेत म्हणून लढा देणे, अशा गोष्टी सुनीताबाईंनी केल्या. ‘सुंदर मी होणार’मध्ये दीदीराजे, ‘राजेमास्तर’मधली म्हातारी मोलकरीण, ‘वटवट’मधील मालवणी म्हातारी या सुनीताबाईंच्या गाजलेल्या भूमिका होत. ‘आहे मनोहर तरी’ हे त्यांचे प्रांजळ आणि परखड आत्मचरित्र बरेच गाजले. पुलंच्या व्यक्तिमत्त्वाची वेगळी बाजू त्यात वाचकांना जाणवली.
‘पिंगळावेळ’च्या निमित्ताने सुनीताबाईंचा जी.ए. कुलकर्णी यांच्याशी पत्रव्यवहार सुरू झाला आणि १९७७ ते १९८४ ह्या आठ वर्षांच्या काळात जीएंनी सुनीताबाईंना लिहिलेल्या निवडक पत्रांचा तीनशेहून अधिक पृष्ठांचा संपादित ग्रंथ १९९५ साली प्रसिद्ध झाला. सुनीताबाईंनी जीएंना लिहिलेली पत्रे बाईंच्या संमतीने ‘मौज’ प्रकाशने ‘प्रिय जी.ए.’ ह्या पुस्तकाद्वारे ११ डिसेंबर, २००३ रोजी प्रकाशित केली. ह्या दोन्ही पत्रसंग्रहांतून जीएंच्या वाङ्मयविचारांची आणि जीवनचिंतनाची श्रीमंती कळते, तसेच सुनीताबाईंच्या स्वतंत्र, समृद्ध, समर्थ आणि स्नेहशील व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडते. वसंतराव देशपांडे, मल्लिकार्जुन मन्सूर, कुमार गंधर्व, माधव आचवल यांची शब्दचित्रे त्यांनी ‘सोयरे सकळ की सफळ’ (१९९८) या पुस्तकात रेखाटली आहेत. कविता, संगीत यांविषयी त्यांना विलक्षण आकर्षण होते. त्याचबरोबर, चिंतनशीलतेमुळे त्यांचे लेखन दर्जेदार झाले आहे.