Skip to main content
x

देव, मंजिरी श्रीराम

मंजिरी श्रीराम देव यांचा जन्म कोल्हापूर येथे झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव मृणालिनी गोपाळराव मराठे होते. त्या काळच्या कर्मठ सामाजिक वातावरणातदेखील त्यांच्या आई इंदूताई यांनी त्यांना ‘कथक’ नृत्य शिकण्यास प्रोत्साहित केले. कथक नृत्याबरोबर त्यांचे शालेय शिक्षण व अभिनय कारकीर्दही कोल्हापुरात रुजली व फुलली.

वयाच्या अठराव्या वर्षी, श्रीराम देव यांच्याबरोबर नाटकातून भूमिका करतानाच त्यांच्याशी सूर जुळले व मृणालिनी मराठे या मंजिरी देव झाल्या. लग्नानंतर  प्रापंचिक जबाबदार्‍या सांभाळत एस.एस.सी.नंतर अर्धवट राहिलेले आपले शिक्षण पुढे सुरू करून त्या एम.ए. (मराठी) झाल्या.

लग्नामुळे त्यांचे नृत्यशिक्षण अर्धवट राहिले होते. पतीच्या प्रोत्साहनाने गुरुवर्या आशाताई जोगळेकर यांच्याकडे त्यांनी विशारद व अलंकार या कथकमधील पदव्या प्राप्त केल्या. पुढे कथक नृत्यातील अध्वर्यू पं. नटराज गोपीकृष्ण यांच्याकडून कथकचे उच्च शिक्षणही घेतले. गेली ३७ वर्षे त्या ठाण्यात कथकचा प्रचार व प्रसार करीत आहेत. या प्रदीर्घ कालावधीत त्यांनी शिष्यांच्या पिढ्या घडवल्या.

अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताचा प्रसार व  प्रचार आणि या पिढीवर संस्कार व्हावा म्हणून त्यांनी आपल्या गुरूंच्या नावाने ठाण्यात संगीत महोत्सव सुरू केला. गणेश कल्चरल अकादमी या त्यांनी स्थापन केलेल्या संस्थेमार्फत आयोजित होणारा ‘पं. नटराज गोपीकृष्ण संगीत महोत्सव’ गेली सतरा वर्षे ठाण्यात मोठ्या दिमाखाने साजरा होत आहे व देशातील अत्यंत प्रतिष्ठित संगीत महोत्सवांमध्ये आज याची गणना होत आहे. तसेच या संस्थेतर्फे सादर होणार्‍या  ‘अमृतवासंतिक’, ‘आषाढरंग’ या प्रकारच्या इतर कार्यक्रमांतून निव्वळ कलाकारच नव्हे, तर रसिक प्रेक्षकही घडला गेला आहे.

कथकचे प्रकांड पंडित डॉ. पुरू दाधिच यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी कथक नृत्यामधील ‘कथक नृत्य में प्रयुक्त होने वाले कवित्त-छंदों का विश्लेषणात्मक अध्ययन’ या विषयामध्ये पीएच.डी.ची पदवी मिळवली. त्यांच्या या कार्याची अनेक संस्थांनी दखल घेऊन त्यांना ‘उत्कृष्ट वाङ्मय’ पुरस्कार (महाराष्ट्र शासन), ‘ठाणे गौरव’ पुरस्कार, ‘ठाणे नगर-रत्न’ पुरस्कार, ‘मधुरिता सारंग स्मृती’ पुरस्कार,  ‘पंडिता’ पुरस्कार (लोकमत, पुणे) या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. त्यांनी कथक नृत्यावर इंग्रजी ,मराठी आणि हिंदी भाषेत अनेक पुस्तके लिहीली आहेत.

मुकुंदराज  देव

देव, मंजिरी श्रीराम