Skip to main content
x

देवधर, सीताराम गणेश

     सीताराम गणेश देवधर ह्यांचा जन्म सातार्‍यात झाला. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने सीतारामपंतांनी वार लावून, छोटी मोठी कामे करीत, नादारी, शिष्यवृत्ती मिळवून शिक्षण पूर्ण केले. सातार्‍याच्या नगरपालिकेच्या शाळेत त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतले. सातारा विद्यालयामधून ते मॅट्रिक झाले. पुण्याच्या डेक्कन महाविद्यालयामधून संस्कृत विषय घेऊन ते बी.ए. झाले.

     पुण्यात महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच त्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या ‘न्यू इंग्लिश स्कूल’, रमणबाग येथे काही काळ शिक्षक म्हणून नोकरी केली. त्यानंतर अहमदनगरच्या ‘मिशन हायस्कूल’मध्ये शिक्षक म्हणून ते काम करीत होते. संस्कृत हा त्यांचा हातखंडा विषय होता. भाषांतर व व्याकरणावर त्यांचा भर असे.

      १८९० मध्ये ही नोकरी सोडून ते पुण्यात आले. पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक म्हणून ते काम करू लागले. १८९४ मध्ये ते डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आजीवन सदस्य झाले. १८९९ मध्ये अधीक्षक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. १८९९ मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीने सातार्‍याच्या दत्तोपंत जोशी ह्यांचे खाजगी विद्यालय ताब्यात घेतले. हे विद्यालय विद्यार्थी विद्यार्थ्यांसाठी चालवत होते. या शाळेत विद्यार्थीच विनावेतन शिक्षक म्हणून काम करत. अशा प्रकारची ही महाराष्ट्रातील पहिली शाळा होती. डेक्कन एज्युकेशन सोसायटीने ह्या शाळेचे प्रमुख म्हणून देवधरांना साताऱ्यास पाठविले. त्यांच्या प्रयत्नांमुळे शाळेची विद्यार्थी संख्या सदतीसवरून एकशे ऐंशीपर्यंत गेली. १९०५ मध्ये ती तीनशे पाचपर्यंत गेली. सरकारी विद्यालयावर ह्याचा परिणाम होऊ नये म्हणून शिक्षणखाते या शाळेस मान्यता देत नव्हते. पण शेवटी खात्यास परवानगी द्यावी लागली.

      देवधर स्वत: शाळा सुटल्यावर वरच्या वर्गांचे जादा तास घेत. संस्कृत व इंग्रजी उत्तम शिकवित. शैक्षणिक विषयांवर विचार करण्यासाठी ते रविवारी शिक्षकांचा वर्ग घेत. न्यू इंग्लिश स्कूलचे देवधर चोवीस वर्षे मुख्याध्यापक होते. १ मार्च १९२० रोजी देवधर सेवानिवृत्त होणार होते. पण त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल सोसायटीने त्यांना दोन वर्षांची मुदतवाढ दिली गेली. १९२१ मध्ये शाळेची विद्यार्थी संख्या ७३५ झाली.

      देवधर उत्तम प्रशासक होते. प्रारंभी दिवाणांच्या पागेत भरणारे न्यू इंग्लिश स्कूल नंतर फरासखान्यात भरू लागले. संस्थेच्या मदतीने देणग्या जमा करून देवधर सरांनी शाळेची नवीन इमारत बांधली. या शाळेला आजही लोक ‘देवधरांची शाळा’ व ‘दगडी शाळा’ म्हणूनच ओळखतात. या शाळेचा विस्तार खूप मोठा झाला आहे. पाच एकरांचे मोठे क्रीडांगण शाळेला मिळाले आहे. या शाळेच्या शिक्षकांनी ‘गुरुवर्य देवधर शिक्षण मंडळ’ स्थापून १९६३ मध्ये मंडळातर्फे ‘नवीन मराठी शाळा व बालक मंदिर’ सुरू केले आहे. ही शाळा सातारा जिल्ह्यातील प्रथम क्रमांकाची प्राथमिक शाळा आहे.

       देवधरांचे विचार अतिशय पुरोगामी होते. बालविवाह, केशवपन, हुंडापद्धत, सतीची चाल  ह्यांना त्यांचा विरोध होता. विधवाविवाहाचे ते पुरस्कर्ते होते. त्यांच्या पहिल्या पत्नीच्या निधनानंतर त्यांनी कुमारिकेशी विवाह न करता एका प्रौढ विधवा शिक्षिकेशी  विवाह केला होता. स्त्रीशिक्षणाचे पुरस्कर्ते असल्याने त्यांनी त्यांच्या पहिल्या पत्नीला व मुलीला शिक्षणासाठी मुलांच्या शाळेत घातले होते. स्वत:च्या शाळेत अस्पृश्य मुलांना व मुलींना त्यांनी प्रवेश दिला होता. आगरकरांच्या ‘सुधारक’ पत्राचे काही काळ ते संपादक होते.

      देवधर उत्तम लेखक होते. ‘माझा जीवनवृत्तान्त’ हे त्यांचे आत्मचरित्र आहे. ‘संगीत सुविचार विजय’  हे नाटकही त्यांनी लिहिले होते. नाटकात काम करण्याची त्यांना आवड होती. ‘वेणीसंहार’, ‘शाकुंतल’ ह्या संस्कृत नाटकांतून त्यांनी काम केले होते. स्त्रीपात्रांच्या भूमिकाही ते करीत. ते उत्तम वक्ते होते.

      एक उत्तम शिक्षक, संघटनकुशल प्रशासक, लेखक व नाटककार, नाट्यकलावंत, कृतिशील समाजसुधारक अशा विविध भूमिकांतून समाजकारण, शिक्षण ह्या क्षेत्रात मोठे योगदान देणारे सीतारामपंत देवधर हे द्रष्टे शिक्षणतज्ज्ञ होते. इंग्लिश स्कूलमध्ये त्यांचा पुतळा उभा करण्यात आला आहे. तसेच डॉ. प्रा. यशवंत पाटणे यांनी ‘स्वयंशिल्पी’या नावाचे त्यांचे चरित्र लिहिले आहे.

     - आ. ब. कंग्राळकर

देवधर, सीताराम गणेश