दक्षिणकर, नारायण पुरुषोत्तम
नारायण पुरुषोत्तम दक्षिणकर यांचा जन्म यवतमाळ येथे झाला. त्यांचे वडील पशु-संवर्धन अधिकारी होते. नारायण दक्षिणकर यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण नागपूर येथे झाले. त्यांनी नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयातून गुणवत्ता शिष्यवृत्तीसह पशुवैद्यकीय पदवी (१९८०) प्राप्त केल्यानंतर त्याच महाविद्यालयातून पशुचिकित्सा विषयात पदव्युत्तर पदवी (१९८२) प्राप्त केली. या पदव्युत्तर शिक्षणासाठी त्यांना भा.कृ.अ.प.ची कनिष्ठ संशोधन शिष्यवृत्ती मिळाली. पुढील सेवाकाळात यथावकाश त्यांनी त्याच विषयात डॉ. पं.दे.कृ.वि.ची पीएच.डी. (१९९१) पदवी प्राप्त केली.
डॉ. पं.दे.कृ.वि.त १९८३ साली साहाय्यक प्राध्यापक म्हणून अखिल भारतीय कुक्कुट संशोधन प्रकल्पात दक्षिणकर दाखल झाले.
आर्थिकदृष्ट्या कमकुवत समाजाचे सबळीकरण करण्याच्या विचाराने झपाटलेल्या डॉ. दक्षिणकर यांना अकोला जिल्ह्यातील अकोट येथील आदिवासी विकास संशोधन प्रकल्पांतर्गत आदिवासी भागात कोंबड्यांचे मोठ्या प्रमाणात मृत्यू होत असलेले आढळले. पारंपरिक समजुतीनुसार आदिवासी कोंबड्यांचे लसीकरण करून घेत नसत, पण काही विचारी आदिवासींना हाताशी धरून डॉ. दक्षिणकर यांनी काही कोंबड्यांना लसीकरण केले. पुढील काही दिवसांतच कोंबड्यांमध्ये साथीचा रोग आला असता केवळ लसीकरण झालेल्या कोंबड्याचं त्यातून बचावल्या. तेव्हा लसीकरणाचे महत्त्व आदिवासींना पटले आणि मग कधीच त्या भागात कोंबड्यांचे साथीच्या रोगाने मृत्यू झाले नाहीत. याच दरम्यान विद्यापीठात ‘शेतकऱ्यांच्या सेवेत विद्यापीठ’ ही योजना कार्यान्वित झाली होती व त्यानुसार विद्यापीठातील प्रत्येक विद्याशाखा शेतकऱ्यांसाठी काय करू शकते, यावर रोजच्या वर्तमानपत्रात लेख द्यावा लागे. पशुवैद्यकीय विद्याशाखेतर्फे हे काम डॉ. दक्षिणकर यांच्याकडे देण्यात आले. यामुळे आपण प्रभावीपणे लिहू शकतो, याची जाणीव होऊन पशुवैद्यक/पशुसंगोपनशास्त्र सोप्या मराठीतून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या संकल्पनेचे बीज त्यांच्या मनात रुजले, जे पुढे ४८ मराठी पुस्तकांच्या रूपाने महाराष्ट्रभर फोफावले. महाराष्ट्र राज्य ग्रंथनिर्मिती मंडळ यांच्यामार्फत पशुविज्ञानविषयक पुस्तक प्रसिद्ध होण्याचा मानही डॉ.दक्षिणकरांना लहान वयातच मिळाला.
पशुविज्ञान विषयाला प्रात्यक्षिकांची व संशोधन अहवालांची जोड आवश्यक आहे, याची जाणीव ठेवून डॉ.दक्षिणकर यांनी पशु-रोगचिकित्सा हा विषय पदवीपूर्व विद्यार्थ्यांना शिकवला. पशुचिकित्सालयात येणार्या जनावरांची छायाचित्रे काढून व त्यापासून स्लाइड्स बनवून त्या विद्यार्थ्यांसमोर सादर करण्याच्या पद्धतीने एखाद्या रोगाचे निरूपण अत्यंत प्रभावीपणे करता येते, हे त्यांनी दाखवून दिले. त्यांच्या अध्यापन पद्धतीमुळे त्यांना विदर्भरत्न पुरस्कार (१९८७), विद्यापीठाचा डॉ.डी.के. बल्लाळ उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार (१९९८), नॅशनल एक्सलन्सी अॅवॉर्ड (१९९२), बेस्ट अॅकॅडेमीशिअन अॅवॉर्ड (२००२) डिस्टिंगविश्ड टीचर अॅवॉर्ड (२००२), अण्णाभाऊ साठे मेमोरिअल टीचर अॅवॉर्ड (२००३) इत्यादी पुरस्कारांनी सन्मानित केले गेले. विविध प्रकारच्या जंतबाधा, खनिज मिश्रणांचा अभाव, चाऱ्यातील विशिष्ट अन्नघटकांच्या कमतरता, संगोपनातील त्रुटी या सर्वांचे विश्लेषण करून या सर्व घटकांवर उपाय आणि उपचार सुचवणाऱ्या पशुपालन पद्धती याचा अहवाल विद्यापीठाला सादर करून पुढे तो अंमलबजावणीसाठी शासनाच्या पशु-संवर्धन विभागाकडे सोपवण्यात आला. पशू उत्पादकता वाढवण्यासाठी स्थानिक पशुवैद्यकीय अधिकारी या अहवालातील शिफारशींचा उपयोग करतात.
होमिओपॅथी या उपचार पद्धतीत अनेक गुणकारी औषधे उपलब्ध असून, ती स्वस्त असल्याने मानवी औषधोपचारात सर्रास वापरली जातात. तेव्हा जनावरांच्या रोगात ही औषधे वापरात आणण्याच्या दृष्टीने डॉ. दक्षिणकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी विस्तृत संशोधन करून विदर्भातील सर्व जिल्हा पशू रुग्णालयांतून त्यासंबंधी चाचण्या घेऊन उपचार महाग असणाऱ्या आजारावर प्रभावी आणि स्वस्त होमिओपॅथी औषधांची उपयुक्तता सिद्ध केली. स्तनदाह, मायांग बाहेर येणे, पायखुरी, अंगावरील चामखीळ अशा अनेक रोगांवर ही औषधे भारतभर वापरली जातात. पशुरोग उपचार स्वस्त आणि परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देणाऱ्या डॉ. दक्षिणकरांचे योगदान लाभदायी ठरले.
केंद्र शासनाच्या एन.एटी. पीक योजनेत जनावरातील जंतबाधा आणि निरनिराळ्या कारणांमुळे होणारे अतिसार यावर वनौषधींचा वापर हे दोन महत्त्वाकांक्षी प्रकल्प डॉ. दक्षिणकर यांनी नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयात पूर्णत्वास नेले. तरोहा, सीसम पाने, बेल, जास्वंदीची फुले या सर्वांमध्ये अतिसार निर्मूलनाचे गुण असून, यांचा प्रभावीपणे वापर करता येतो, हे निष्कर्ष पशु-रोगउपचार स्वस्त करण्याच्या दृष्टीने निश्चितच उपयुक्त आहेत. पर्यावरण वाचवण्याच्या दृष्टीने डॉ. दक्षिणकर यांनी पूर्ण केलेला हा संशोधन प्रकल्प विदर्भवासीयांना वरदान ठरला आहे. नागपूर विभागातील औष्णिक विद्युत प्रकल्पाच्या परिसरात राहणाऱ्या जनावरांच्या आरोग्यावर येथे निर्माण होणाऱ्या राखेमुळे दुष्परिणाम होत असावा, या जिज्ञासेपोटी केलेल्या अभ्यासात तेथील जनावरांच्या दुधात मर्क्युरी (पारा) या जड धातूचे अवशेष आढळले ते मानवी आरोग्यास घातक आहेत, हा अहवाल प्रसिद्ध होताच ताडोबा राष्ट्रीय उद्यानाजवळ होऊ घातलेल्या औष्णिक प्रकल्पाचा शासनाला पुनर्विचार करावा लागला. ‘मध्य भारतातील वन्यप्राणी उद्यानातील प्राण्यांचे आरोग्य’ यासंबंधीचा एक संशोधन प्रकल्प (२०००) डॉ.दक्षिणकर यांनी पूर्ण करून त्याचा अहवाल वनविभागाकडे कार्यवाहीसाठी सुपूर्द केला. वन्यप्राण्यांत आढळणारे बहुतेक आजार हे अशा राष्ट्रीय उद्यानाभोवती भटकणाऱ्या प्राण्यांमुळे होतात आणि या उद्यानातील शाकाहारी प्राण्यांना होणारे आजार हे मुख्यत्वे उद्यानात वाढणाऱ्या गवतातील विशिष्ट खनिजांच्या कमतरतेमुळे होतात, हे निष्कर्ष वनविभागाची कार्यपद्धती सुधारण्यासाठी उपयुक्त ठरले.
नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयाला संलग्न असलेले पशुवैद्यकीय रुग्णालय आधुनिक व वैद्यकीय रुग्णालयाच्या तोडीचे असावे, या ध्यासाने डॉ.दक्षिणकरांनी भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या व्याजरहित कर्जाच्या साहाय्याने र्उसीजी यंत्र, एन्डोस्कोपी सी.एफ.एफ.टॅपिंग क्ष-किरण, अल्ट्रासाऊंड यांसारखी आधुनिक वैद्यकशास्त्रातील रोगनिदान उपकरणे या रुग्णालयाला उपलब्ध करून दिली. हे रुग्णालय मध्य भारतातील ‘रेफरल क्लिनिक’ आणि ‘अॅडव्हान्स्ड डायग्नोस्टिक सेंटर’ म्हणून मान्यता पावले. महाराष्ट्रातूनच नव्हे; तर मध्य प्रदेशातूनही गायी-म्हशी, घोडे आणि उतर प्राणी आधुनिक उपचारांसाठी येथे आणले जातात. शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यात काम करणाऱ्या पशुवैद्यकासाठी हे आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध व्हावे, यासाठी पाच दिवसांचा शैक्षणिक कार्यक्रमही डॉ.दक्षिणकर राबवतात. आधुनिक वैद्यकशास्त्राच्या साहाय्याने सर्व सामान्यांच्या पशुधनालाही योग्य उपचार मिळावेत, यासाठी त्यांनी केलेली ही धडपड प्रेरणादायी आहे. पशुआरोग्यासाठी संशोधनातून आधुनिकतेचा वापर करण्याच्या या प्रयत्नांना दाद म्हणजेच त्यांना प्राप्त झालेली डॉ. डी.सी. ब्लड गोल्ड मेडल (१९८८), एस.के. गोल्ड मेडल (२०००), वसंतराव नाईक स्मृतीप्रतिष्ठान पुसद आणि मुंबई पारितोषिके (२०००, २००२), भारतीय पशुचिकित्सक संघटना आणि भारतीय पशुविज्ञान संशोधन संघटनांच्या मानद फेलोशिप्स (२००२, २००७), डॉ. डी.एन. दत्ता गोल्ड मेडल (२००४), डॉ. पी. एन. नारायणराव पारितोषिक (२०१०) अशी अनेक पारितोषिके होत.
पशुपालनासाठी निरनिराळ्या स्तरांवर ४००हून अधिक प्रशिक्षण शिबिरे, पशुपालनावर ४८ मराठी पुस्तके, विविध नियतकालिकांतून १००हून अधिक लेख, ‘दै. लोकसत्ता’ मधून ३४ लेखांची मालिका, दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या माध्यमातून असंख्य कार्यक्रम या साऱ्यांतून आपल्या समाजप्रबोधनाच्या जागरूकतेची साक्ष डॉ.दक्षिणकर देतात. मराठी साहित्यातील सर्जनशील शास्त्रीय लिखाणासाठी राज्य शासनाचे उत्कृष्ट साहित्य पुरस्कार, पशुप्रथमोपचार (२०००), समग्र पशुसंवर्धन (२००१), व्यावसायिक शेळीपालन (२००२), पशुपोषण (२००४), व्यावसायिक म्हैसपालन (२००५), पशुप्रजनन (२००६), इमूची व्यापारी शेती (२०१०) या सर्व पुस्तकांना ‘बळीराजा’ मासिकाचे पुरस्कार आणि विदर्भ साहित्य संघाचे शास्त्रीय लेखन पुरस्कार प्राप्त झाले आहेत. डॉ.दक्षिणकर इतर सामाजिक जबाबदाऱ्याही तितक्याच आत्मीयतेने पार पाडतात. रोटरी क्लबचे सदस्य म्हणून दरवर्षी एका मुलीच्या शिक्षण-पालनपोषणाचा खर्च ते उचलतात. अध्यापन, संशोधन आणि विस्तार शिक्षण या जबाबदाऱ्यांसह ग्रामीण युवकांची सर्जनशक्ती जागृत करण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले आहेत.