Skip to main content
x

डोंगरे, गजानन शंकर

     शिक्षण क्षेत्रातील कर्मयोगी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गजानन शंकर डोंगरे यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मनमाडला झाले. पुण्याच्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयातून त्यांनी बी. ए. पदवी मिळविली. १९५० ते १९६२ पर्यंत लासलगावच्या महावीर महाविद्यालयामध्ये शिक्षक, उपमुख्याध्यापक व मुख्याध्यापक अशा विविध पदांवर त्यांनी काम केले. १९५६ मध्ये ते बी टी. झाले. या परीक्षेत त्यांना पहिला वर्ग मिळाला. त्यानंतर त्यांनी एम.ए. व एम.एड. या पदव्या गुणवत्तेसह प्राप्त केल्या.

      १९६२ ते १९६४ ही दोन वर्षे त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या श्रीरामपूर येथील महाविद्यालयात टी. डी. विभागात जिद्दीने काम केले. दोन्ही वर्षी त्यांच्या विभागाचा निकाल शंभर टक्के लागला म्हणून संस्थेने कर्जतला टी. डी. कोर्स सुरू केला व त्याची जबाबदारी डोंगरे यांच्यावर सोपविली होती.

      १९६५ मध्ये नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेने नाशिकला बी.एड. महाविद्यालय-कॉलेज ऑफ एज्युकेशन सुरू केले. डोंगरे यांनी महाविद्यालयाच्या स्थापनेपासून चार वर्षे एक यशस्वी प्राध्यापक म्हणून महाविद्यालयामध्ये नाव मिळविले. शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य ग. वि. अकोलकर निवृत्त झाल्यावर डोंगरे या महाविद्यालयाचे प्राचार्य झाले आणि पुढील दोन तपे ही जबाबदारी त्यांनी समर्थपणे पेलली. योग्य विचारांनी बांधलेले धोरण, ते कृतीत आणण्यासाठी लागणारा निर्भीडपणा यांच्या बळावर प्रा. डोंगरे यांनी महाविद्यालयात विविध उपक्रम सुरूकेले. बी.एड.व एम.एड. अभ्यासक्रमाच्या प्रशिक्षणार्थींनी केवळ अभ्यासक्रम पूर्ण करण्यापेक्षा त्यांना काही शैक्षणिक अनुभव मिळावेत, विविध प्रकल्पांची ओळख त्यांना व्हावी, शिक्षकी पेशा व अन्य व्यवसाय ह्यात फरक आहे हे त्यांनी जाणून घ्यावे म्हणून ते सतत सजग राहिले. ओझर, देवळाली कॅम्प येथील अमराठी भाषिकांसाठी इंग्रजी माध्यमाची तुकडी त्यांनी सुरू केली आणि टीकाही सहन केली. पण या टीकेला वार्षिक परीक्षेच्या निकालानेच उत्तर दिले. अपवाद वगळता या तुकडीतले विद्यार्थीच प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले.

       चर्चात्मक पद्धतीचा प्रयोग हा त्यांचा आणखी एक वेगळा उपक्रम होता. विद्यार्थ्यांनी स्वत: विषयाची तयारी करावयाची, वर्गात चर्चा करावयाची व प्राध्यापकांनी मार्गदर्शन करावयाचे असा हा प्रयोग होता. दिल्लीच्या मध्यवर्ती शिक्षण संस्थेने या प्रयोगाची पाहणी करून गौरव केला व त्यासाठी अनुदान दिले. निर्भीडपणा हा डोंगरे यांचा स्थायीभाव होता. विद्यापीठातील सभांमध्ये, सार्वजनिक सभांत किंवा संस्थेच्या सभेत स्वत:च्या बुद्धीला पटणारे विचार ते निर्भीडपणे मांडत.

      ‘शिक्षणाचे तात्त्विक व सामाजिक स्वरूप’ व ‘शालेय संघटन व प्रशासन’ ही त्यांची काही पुस्तके. ‘माध्यमिक शिक्षण: काल, आज आणि उद्या’ हे पुस्तक त्यांनी शिक्षणमहर्षी जे. पी. नाईक यांच्या आग्रहावरून लिहिले. या पुस्तकाला ‘गुरुवर्य प्राचार्य ग.वि. अकोलकर’ पुरस्कार लाभला.

- प्रा. सुहासिनी पटेल

डोंगरे, गजानन शंकर