Skip to main content
x

दसनूरकर, स्नेहलता

     स्नेहलता दसनूरकर यांचा जन्म पुणे येथे झाला. एम. ए., बी. टी. (मराठी साहित्य विशारद) एम. ए. (हिंदी राष्ट्रभाषा कोविद) इतके शिक्षण झाले. स्नेहलताताईंचा विवाह १९३९ साली द. गो. दसनूरकर यांच्याशी झाला. त्यांचा जीवनप्रवास लेखिका-शिक्षिका-प्राध्यापिका-प्राचार्य असा झाला आहे. १९५५ पर्यंत त्यांनी पुना इंग्लिश स्कूल येथे नोकरी केली व १९५६ साली गारगोटी येथील मौनी विद्यापीठात त्या दाखल झाल्या. त्या विद्यापीठातून १९७८ साली प्राचार्य पदावरून त्या निवृत्त झाल्या.

स्नेहलता यांचे पहिले पुस्तक ‘राणी दुर्गावती’ (चरित्र) १९४५ साली प्रकाशित झाले. त्यांचे ५३ कथासंग्रह, ३ कादंबर्‍या, १ लघुचरित्र, ३ ललित लेख अशी एकूण ६० पुस्तके प्रकाशित असून त्यात ग्रामीण जीवन व सामाजिक प्रश्न यांवरील ४९० कथा व ८१ लेखांचा समावेश आहे. त्यांचे लेखन ‘स्त्री’, ‘मनोहर’, ‘माहेर’, ‘मेनका’, ‘वसंत’, ‘वाङ्मयशोभा’, ‘लोकसत्ता’ इत्यादी मासिक-साप्ताहिकांच्या दिवाळी अंकांतून प्रसिद्ध झाले आहे.

स्नेहलता यांच्या काही कथांचे हिंदी, गुजराती, तेलगू भाषांत अनुवाद झाले आहेत. १९५२ साली प्रसाद कथा स्पर्धेत त्यांना पारितोषिक प्राप्त झाले. त्यांच्या ‘व्रजदीप’ या कथेवर ‘शापित’ हा मराठी चित्रपट तयार झाला. त्या चित्रपटाच्या कथेस महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट कथेचा प्रथम पुरस्कार मिळाला. १९९३ साली ‘मानिनी’ मासिकाने ‘स्नेहलता दसनूरकर विशेषांक’ प्रकाशित करून त्यांचा गौरव केला.

स्नेहलता दसनूरकर यांच्या एकूणच साहित्यातून सामाजिक जाणिवांचे दर्शन होते. साहित्यातून त्या सामाजिक बांधीलकीची जपणूक करतात. त्यांच्या कथांच्या नायिका या उदात्त, समाजाला दिशादर्शक, स्त्रीचे मन अधिक उन्नत करणार्‍या आणि कर्तबगार आहेत. समाजहितैषी पात्रनिर्मितीची भरीव व टिकाऊ कामगिरी त्या अखंड करत राहिल्या. त्यांच्या ‘अवंतिका’ या कथेवर आधारित ‘अवंतिका’ ही दूरदर्शन मालिका प्रचंड गाजली, ती त्या कथेतील सशक्त कथाबिजामुळेच.

साहित्य लेखनाबरोबरच स्नेहलता यांनी इयत्ता १० वीच्या उच्च मराठी पाठ्यपुस्तकाच्या संपादनाचे काम केले. पत्रव्यवहार प्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या हिंदी पुस्तकाचे डी.एड.साठी लेखन केले. गारगोटी येथे प्रदीर्घ काळ वास्तव्य आणि अध्यापन करणार्‍या स्नेहलताताईंनी नेत्रोपचार शिबिरे, कुटुंब नियोजन शिबिरे, साक्षरता प्रसार यांच्या माध्यमांतून समाजसेवा केली.

१९७८ साली सेवानिवृत्त झालेल्या स्नेहलता मुंबईत स्थायिक झाल्या. १९७८ ते २००३ या काळात सुमारे ३५ कथासंग्रह प्रकाशित झाले. स्नेहलताताई यांच्या या साहित्य कामगिरीमुळे त्यांना अविरत झरणारी लेखणी म्हटले, तर वावगे ठरणार नाही. ‘दोन भिंती’ (१९६६), ‘रेशमी पदर’ (१९७०), ‘स्नेहकथा’ (१९७४), ‘स्वामिनी’ (१९७४), ‘सुजाता’ (१९७८), ‘मॅटीनी’ (१९७८), ‘प्रतिष्ठा’ (१९८३), ‘भोगशिळा’ (१९८९), ‘अजातशत्रू’ (१९९१), ‘उमर कैद’ (१९९३), ‘अवंतिका’ (१९९३), ‘युगधर्म’ (१९९९) हे त्यांचे गाजलेले कथासंग्रह आहेत.

- रवींद्र गोळे

दसनूरकर, स्नेहलता