गाडे, वसंत विठ्ठल
वसंत विठ्ठल गाडे यांचा जन्म चंद्रपूर येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण नागपूरला झाले. शाळेत असताना भारत व्यायामशाळेशी त्यांचा संपर्क आला. राष्ट्रीय संस्कार देणारी ही संस्था तरुण वसंतरावांच्या संघटनकौशल्याने एक आघाडीची संस्था बनली. त्यांनी बी. ए. पदवी नंतर प्राप्त केली.
पोस्टल अकाउंट्स खात्यात सात वर्षे नोकरी केली. पण मन तेथे रमत नव्हते. पगाराची बहुतांश रक्कम समाजकार्यात, विशेषत: गरीब मुलांच्या शिक्षणासाठी खर्च होत असे. अविवाहित राहून समाजकार्याला वाहून घेण्याचा त्यांचा निश्चय पक्का होत होता. त्यांनी ‘सेवा समाज’ नावाची संस्था स्थापन करून तिच्यामार्फत श्रमदान, अभ्यासवर्ग, ग्रंथालय अशा नाना उपक्रमांच्या माध्यमातून तरुणांना संघटित करणे सुरू होते. ‘सेवा समाज’ ने अनेकांच्या जीवनाला दिशा दिली.
केवळ स्थानिक कार्यात त्यांचे मन रमले नाही. विनोबाजींच्या नेतृत्वाखाली भूदान आंदोलन त्या काळी देशभर पसरत होते. त्यांच्या क्रांतिकारी सभांनी वसंतरावांना आकर्षित केले. शेवटी १९५६ मध्ये नोकरी सोडून त्यांनी भूदान-यज्ञात उडी घेतली. लोकआधारावर जगण्याचा संकल्प केला आणि नाना संकटांना तोंड देऊन पार पाडला. नागपूर जिल्हा पदयात्रा व अन्य कार्यक्रमांनी ढवळून काढला. नागपूर जिल्हा सर्वोदय मंडळ स्थापन झाल्यावर सात वर्षे (१९५८-६५) त्याच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. १९६५ मध्ये विनोबांची नागपूरला अभूतपूर्व सभा झाली. वसंतरावांच्या संघटनकौशल्याची ती पावती होती. नागपूर जिल्ह्यात सहा हजार एकराहून जास्त भूदान प्राप्त झाले. यात वसंतरावांचा सिंहाचा वाटा होता. नागपूर जिल्ह्यात अनेक खेड्यांचे ग्रामदान करण्यासाठी व ग्रामदानाचा संकल्प केलेल्या गावांत नवनिर्माणाचे काम सुरू करण्यासाठी त्यांनी अविश्रांत धडपड केली.
भूदान-ग्रामदान आंदोलन १९६९ नंतर कुंठित झाले, तेव्हा वसंतरावांनी क्रियाशील जीवनातून बाजूला होऊन अध्ययन चिंतन केले. पुन्हा लोकांमध्ये जाऊन शुभ प्रेरणा जागवण्यासाठी गीताई-प्रचाराचे माध्यम त्यांनी निवडले. २ ऑक्टोबर १९७२ रोजी नागपूरहून गीताई-प्रचार पदयात्रा त्यांनी सुरू केली. चौदा वर्षे चाललेली ही पदयात्रा २८००० कि.मी. ची झाली. संपूर्ण महाराष्ट्राखेरीज महाराष्ट्राच्या सीमा भागातही गेली. ३००० गावात पडाव व ८००० प्रवचने झाली. विनोबाजींच्या ‘गीताई’च्या सुमारे एक लाख व ‘गीता प्रवचने’च्या २५००० प्रतींखेरीज दीड लाखांवर रु. चे सत्साहित्य लोकांमध्ये पोचले. पण त्याहून मुख्य गोष्ट म्हणजे नाना अनुभव आले. जागोजागी सज्जनांशी संपर्क आला. जनमानसाचे दर्शन झाले.
१९८६ मध्ये वसंतराव नागपूरला आले तेव्हा ‘गाडे गुरुजी’ झाले होते. पदयात्रेदरम्यान या लोकशिक्षकाला ‘गुरूजी’ हे बिरूद चिकटले होते. पदयात्रेतील अनुभवांनी मुलांवर बालवयापासून संस्कार होण्याची गरज तीव्रतेने जाणवत होती. खेडोपाडी पसरलेल्या शिक्षकांमधील सद्भावनावान व उत्साही व्यक्ती परिचयाच्या झाल्या होत्या. त्यांना जोडून गावोगाव संस्कार केंद्रे उभारण्याचा गुरुजींनी संकल्प केला. नागपूर व यवतमाळ जिल्ह्यांतील गावे पिंजून काढली. सुमारे शंभर संस्कार केंद्रे उभी राहिली. त्यांच्या माध्यमातून गावातील सज्जनशक्तीचे संघटन व विविध विधायक उपक्रम सुरू झाले.
विनोबा जन्मशताब्दी वर्षात (१९९४-९५) एकट्या नागपूर जिल्ह्यात ५५,००० ‘गीताई’ प्रती व गांधीजींच्या एकादश व्रतांवर विनोबांनी लिहिलेल्या ‘अभंगव्रते’ च्या १५००० प्रती गुरुजी व त्यांच्या सहकाऱ्यांनी पोचवल्या. साने गुरुजींच्या जन्मशताब्दी वर्षात ‘श्यामची आई’ च्या १०,००० हून जास्त प्रतींखेरीज त्यांचे अन्य साहित्य व छायाचित्र विदर्भातील शाळे-शाळेत पोचवले. शाळे-शाळेत ‘गीताई’ पोचवण्याचे काम सतत चाललेलेच असते.
शिक्षणाला मूल्य-शिक्षणाची जोड असावी म्हणून शासनाने अभ्यासक्रमात त्याचा समावेश केला. पण ती एक औपचारिकताच राहिली आहे. गुरुजींनी अखेरपर्यंत खर्या अर्थाने शिक्षणात मूल्य-शिक्षण आणण्याचा प्रयत्न केला.
गुरुजींच्या ‘संस्कार परिवार’मार्फत विद्यार्थी-शिक्षक-नागरिकांच्या शिबिरांची एक मालिकाच सुरू असते. यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा सगळा खर्च सहभागी उचलतात. गुरुजींनी कुठल्याही सरकारी वा गैरसरकारी संस्थेकडून, किंवा उद्योगपतींकडूनही पैसा घेतला नाही. लोकसंग्रहाचे काम लोकाधारितच असावे, असा त्यांचा आग्रह होता. त्यांचे स्वत:चे जीवन तर लोकाधारितच राहात आले आहे. त्यांच्याबद्दल श्रद्धा, आस्था असलेले लोक त्यांना वर्षाकाठी ३६५ रु. देत असत. त्यातून त्यांचा व्यक्तिगत खर्च चाले. आज बहुसंख्य सार्वजनिक कामे सरकार किंवा देशी-विदेशी फंडिंग एजन्सीच्या आधाराने चाललेली दिसत असताना गुरुजींचे लोकाधारित काम नजरेत विशेष ठसते.
पुसदला ‘गीताई सेवा केंद्र’ स्थापन झाले होते, परंतु कार्यकर्त्यांच्या अभावी काम उभे राहत नव्हते. गुरुजींवर आग्रहपूर्वक केंद्राची जबाबदारी सोपवण्यात आली. गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली या केंद्राने झपाट्याने प्रगती केली.
‘जीवन-विचार’ ह्या गुरुजींच्या पुस्तकाच्या आजवर पाच आवृत्त्या प्रकाशित झाल्या असून त्याखेरीज ‘उपनिषद: एक प्रातिभ दर्शन’ हे उपनिषदांचा आशय सोप्या भाषेत सांगणारे पुस्तकही प्रकाशित झाले आहे.
सततच्या कष्टाच्या जीवनामुळे आरोग्याची स्थिती कमालीची खालावली आणि वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले.