Skip to main content
x

गांधी लीला माणिकचंद

     वयाच्या आठव्या वर्षापासून लीला गांधी यांनी गोविंद निकम यांच्याकडे कथ्थक नृत्याचं शिक्षण घेतलं. १९५१ साली दिग्दर्शक दिनकर द. पाटील यांनी त्यांच्या ‘राम राम पाव्हणं’ या गाजलेल्या मराठी चित्रपटावरून ‘घरबार’ नावाचा हिंदी चित्रपट काढला. त्यात गोप आणि पारो यांच्या एका नृत्यात लीला यांची मदत घेतली होती.

     गुरू गोविंद निकम यांच्याबरोबर लीला गांधी एकदा मा. भगवान यांच्याकडे गेल्या होत्या. तिथे मा. भगवान यांचे डान्स मास्तर रॉबर्ट हजर होते. त्यांची व निकम यांची चांगली मैत्री होती. मा. भगवान यांना लीलाच्या नृत्याबद्दल समजलं आणि त्यांनी तिला त्यांच्या ‘रंगीला’ (१९५३), ‘हल्लागुल्ला’ (१९५४) व ‘भला आदमी’ (१९५८) या चित्रपटांत नृत्य करायची संधी दिली.

     ‘बगदाद की राते’ या चित्रपटासाठी रॉबर्ट मास्तरांनी एका नृत्यासाठी लीला यांना बोलवलं. श्याम या खलनायकासमोर नायक महिपाल याला बांधलेलं असते तिथे खलनायकासमोर तिला नृत्य करायचं होतं. नृत्य छान झालं, पण हा चित्रपट आलाच नाही. त्यानंतरच्या ‘बस कंडक्टर’ या चित्रपटात तर त्यांनी हेलनबरोबर नृत्य केलं होतं. हेलन यांचा भांगडा व लीला यांची लावणी अशी ती जुगलबंदी होती.

     लीलाबाईंचा नृत्याचा एक कार्यक्रम प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक राजा ठाकूर यांनी पाहिला आणि त्यांना ‘रेशमाच्या गाठी’ या कार्यक्रमात नृत्य करण्यासाठी बोलवलं. सुरुवातीला वसंत पवार व महंमद ही जोडी या नृत्याचं दिग्दर्शन करणार होती, पण पवारांनी लीलाबाईंचं नृत्यनैपुण्य पाहून राजाभाऊंना सांगितलं - ‘हिचं नृत्य हिलाच बसवू द्या!’ ‘इष्काच्या रंगात वीज भरे अंगात’ या गाण्यावर त्यांनी सुंदर नृत्य केलं. ही त्यांची मराठी चित्रपटातली सुरुवात होती. ‘प्रीतिसंगम’मधील (१९५७) हिंदी अभिनेता आगा याच्याबरोबरचा त्यांचा ‘झगडा’ खूप गाजला, ‘सांगत्ये ऐका’पासून (१९५९) त्यांनी अनेक चित्रपटांचं नृत्यदिग्दर्शन केलं, तर ‘केला इशारा जाता जाता’ (१९६५) या चित्रपटाच्या त्या सहनायिका होत्या.

    चित्रपटांबरोबरच त्यांचा नाट्यप्रवासही चालू होता. ७५ चित्रपटात व २५ नाटकांत त्यांनी काम केलं. ‘महाकवी कालिदास’ या संस्कृत नाटकातही त्यांनी काम केलं होतं. ‘कथा अकलेच्या कांद्याची’मधील त्यांची नृत्यं पाहून संगीतकार वसंत देसाई यांनी दिग्दर्शक हृषीकेश मुखर्जी यांना सांगून ‘आशीर्वाद’ या हिंदी चित्रपटातील ‘सवाल जवाब’साठी त्यांना बोलवलं. यातील लीलाबाईंचं नृत्य गाजलं.

    चित्रपट-नाटकातील निवृत्तीनंतर लीलाबाईंनी कॉसमॉस बँकेच्या संचालिका म्हणून, त्याचप्रमाणे अ.भा.नाट्य परिषदेच्या अध्यक्षा म्हणूनही काम केलं. शासनाच्या ‘रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण’ मंडळाच्याही त्या सदस्या होत्या. महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारात त्यांना ‘कार्तिकी’ (१९७५) व ‘पैज’ (१९८१) या चित्रपटातील भूमिकांसाठी पुरस्कार मिळाला होता. लीलाबाई सुमारे २५ पुरस्कारांनी सन्मानित झाल्या आहेत. त्यात ‘राज्य सांस्कृतिक पुरस्कार’, ‘पठ्ठे बापूराव पुरस्कार’, 'अनंत माने स्मृती पुरस्कार', अकादमीचा ‘फाळके पुरस्कार’, ‘व्ही. शांताराम पुरस्कार’ असे मानाचे पुरस्कार आहेत.

    सध्या त्या पुणे इथे निवृत्तीचं जीवन जगत आहेत.

  - मधू पोतदार

गांधी लीला माणिकचंद