Skip to main content
x

गांधी, सोहराब रुस्तम

             सोहराब रुस्तम गांधी यांचा जन्म पुण्यातील सधन पारशी कुटुंबात  झाला. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पुण्यातच झाले. नंतर पुण्याच्या कृषी महाविद्यालयातून त्यांनी बी.एजी. ही कृषिशास्त्रातील पदवी प्राप्त केली. त्यानंतर कृषी खात्याच्या सेवेत प्रवेश करून त्यांनी खडकी येथील गणेशखिंड फूल संशोधन केंद्र येथे कृषी अधिकारी या पदावर काम करण्यास सुरुवात केली. संशोधन सेवेच्या काळातच त्यांनी अंजिराच्या उत्पादन व गुणवत्तावाढीच्या दृष्टीने संशोधन करून अंजिराच्या फांदीवर डोळ्याच्या खाली खाचा पाडणे (नॉचिंग इन फिग) ही विशेष फलोद्यान पद्धत विकसित केली. याच संशोधनावर आधारित प्रबंध मुंबई विद्यापीठास सादर करून १९२२मध्ये त्यांनी एम.एजी. (कृषी) ही पदवी प्राप्त केली.

             प्रा. गांधी यांचा बहुतांश सेवाकाल गणेशखिंड फळ संशोधन केंद्र येथेच कृषी अधिकारी किंवा केंद्राचे प्रमुख म्हणून उद्यान अधीक्षक या पदांवरच गेला. या प्रदीर्घ काळात त्यांना द्राक्ष, आंबा, चिकू, पपई, अंजीर, केळी यांसारख्या महत्त्वाच्या फळपिकांवर संशोधन करण्याची संधी मिळाली. अननस, अ‍ॅव्हॅकॉडो या अपारंपरिक पिकांवरही त्यांनी काम केले. अ‍ॅव्हॅकॉडो (लोण्याचे फळ) सारखे अतिशय पौष्टिक फळ त्यांनी श्रीलंकेमधून भारतात आणून गणेशखिंड केंद्रात प्रथमच लावले. येथे काम करत असतानाच १९३९-१९४०मध्ये त्यांनी श्रीलंका सरकारमध्ये प्रतिनियुक्तीवर काम करून श्रीलंकेच्या फलोद्यान विकासासाठी हातभार लावला. त्यांची १९४३नंतर साहाय्यक उद्यानविद्यावेत्ता या पदावर उद्यानविद्यावेत्ता यांच्या कार्यालयात नेमणूक झाली. डॉ. चीमा यांच्या निवृत्तीनंतर जानेवारी १९४७मध्ये प्रा. गांधी यांची नेमणूक राज्याचे विषय विशेषज्ञ उद्यानविद्यावेत्ता म्हणून झाली. वयामुळे १६ ऑक्टोबर १९५० रोजी निवृत्त झाल्यानंतरही पुनर्नियुक्तीने प्रा. गांधी त्या पदावर कार्यरत होते. प्रा. गांधी व डॉ. चीमा यांचे सेवास्थळ (गणेशखिंड) व सेवाकाल जवळजवळ समान असल्यामुळे डॉ. चीमा यांनी हाती घेतलेल्या बहुतेक सर्वच संशोधन प्रकल्पांमध्ये प्रा. गांधी यांचा सहभाग होता. त्यांनी फळांच्या शीतगृहातील साठवणुकीसंबंधी १९२७मध्ये केलेले प्राथमिक संशोधन पुढील संशोधकांस मार्गदर्शक असेच ठरले. त्यांनी १९२७मध्ये मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केटमध्ये शीतकप्पे उभारून आंबा, केळी, चिकू, पपर्ई या फळांच्या साठवणुकीसंबंधी संशोधन बाजारपेठेच्या स्तरावर केले. याच प्राथमिक संशोधनावर १९३२-१९३४मध्ये गणेशखिंड फळ संशोधन केंद्रावर केंब्रिजच्या शीत तापमान संशोधन केंद्राच्या तांत्रिक सहकार्याने शीतगृहाची उभारणी करून आंबा, संत्रा, मोसंबी, केळी, चिकू, पपई, लिची, सफरचंद, नासपती, स्ट्रॉबेरी, अंजीर, अननस, सीताफळ यांसारखी फळे; बटाटा, कांदा, वाटाणा, कोबी, फूलकोबी, गाजर, बीटरुट, श्रावणघेवडा, टोमॅटो इ. भाजीपाल्यासंबंधीच्या साठवणूक तापमान व इतर बाबींचे प्रमाणीकरण केले. भारतात हे संशोधन आजही पायाभूत म्हणून गणले जाते. याच संशोधनाच्या आधारावर पुढील फळनिर्यातीचा पाया रचला गेला. प्रा. गांधी यांचे फळपिकांच्या अभिवृद्धीसंबंधी केलेले संशोधनही नोंद घेण्यासारखे आहे. भेट कलम या अांब्याच्या प्रचलित अभिवृद्धीच्या पद्धतीमुळे उपलब्ध  मातृवृक्षांपासून मर्यादित प्रमाणात कलमांची निर्मिती होत असे. उपलब्ध मातृवृक्षापासून जास्तीत जास्त प्रमाणात कलमनिर्मितीसाठी डोळा कलम पद्धत (फोरकर्ट बडिंग) ही आंब्यासाठी अभिवृद्धीची नवीन पद्धत त्यांनी शोधून काढली व विकसित केली. या पद्धतीबरोबरच जुन्या आंब्याच्या झाडांचे पुनर्जीवन करण्यासाठीही कलमाची पद्धत (क्राऊन ग्राफ्टिंग) त्यांनी विकसित केली.

             आंब्याच्या जुन्या व ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या झाडांचे दीर्घकाळ जतन करण्याच्या दृष्टीने जुन्या झाडाच्या खोडाभोवती नवीन रोपे लावून त्यांचे शेंडे कलम पद्धतीने जुन्या झाडांना जोडून जुन्या झाडांना नवीन रोपांच्या जोरकस मुळांची जोड देऊन जुनी झाडे दीर्घकाळ जगवण्याच्या संबंधीची कलम पद्धतही (बट्रेस ग्राफ्टिंग) त्यांनी विकसित केली होती व या संशोधनावरील निबंध त्यांनी इंडियन सायन्स काँग्रेेसच्या ३७व्या बैठकीत वाचला होता. याशिवाय संत्रा व मोसंबीच्या झाडांच्या मुळांचा अभ्यास, पपईच्या फळधारणेसंबंधीचा अभ्यास, द्राक्ष पिकाच्या छाटणी व कलम देण्यासंबंधी व रोगांसंबंधीचा अभ्यास करून या मूलभूत बाबींवरही त्यांनी संशोधन केलेले आहे. द्राक्ष पिकावर भारतात प्रथमच आढळलेल्या रोगांसंबंधी सविस्तर संशोधन निबंध त्यांनी १९२८मध्ये कोलकाता येथे झालेल्या इंडियन सायन्स काँग्रेसच्या बैठकीत वाचला होता.

             त्यांनी संशोधकांना व विद्यार्थ्यांना उपयोगी पडेल असे उद्यानपिकावरील बरेच लिखाण केलेले आहे. दिल्ली  येथील अखिल भारतीय कृषी अनुसंधान या संस्थेने प्रकाशित केलेल्या ‘फ्रूट कल्चर इन इंडिया’ या पुस्तकामध्ये फळपिकांत संजीवकांचा वापर, फळांची काढणी व विक्री तसेच आंबा, केळी, पेरू, लिंबवर्गीय फळे, पपई, चिकू, द्राक्ष, अ‍ॅव्हॅकॉडो इत्यादी फळपिकांच्या लागवड पद्धती आदी माहिती देणारी १० प्रकरणे त्यांनी लिहिली आहेत.

- प्रा. भालचंद्र गणेश केसकर

गांधी, सोहराब रुस्तम