Skip to main content
x

गायकवाड, सुरेश जनार्दन

         सुरेश जनार्दन गायकवाड यांचा जन्म नागपूर येथे झाला.  त्यांचे वडील मॅट्रिक झालेले होते आणि त्यांचा होमिओपॅथिक औषधीचा व्यवसाय होता. सुरेश गायकवाड यांचे शिक्षण नागपूर येथेच मिशनरी शाळेत झाले. त्यांनी मॅट्रिकसाठी कृषी विषय घेतला होता. मॅट्रिक झाल्यानंतर त्यांनी नागपूर येथील कृषी महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि १९६७मध्ये  बी.एस्सी. (कृषी) पदवी मिळवली. ते १९६९मध्ये प्रथम श्रेणीत तृतीय क्रमांक मिळवून वनस्पति-रोगशास्त्र या विषयात एम.एस्सी. झाले. नंतर त्यांनी नागपूरच्या कृषी महाविद्यालयामध्ये साहाय्यक प्राध्यापक या पदावर नोकरीला सुरुवात केली. त्यांनी १९८२मध्ये नवी दिल्ली येथील ‘अखिल भारतीय कृषी अनुसंधान संस्था’ येथे कवकशास्त्र व वनस्पति-रोगशास्त्रात पीएच.डी. पदवी मिळवली. त्यानंतर त्यांना सहयोगी प्राध्यापक पदावर डॉ. पं.दे.कृ.वि.त पदोन्नती मिळाली. नागपूरच्या कृषी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून १९८५मध्ये त्यांची बदली झाली. त्यांनी २५ विद्यार्थ्यांना एम.एस्सी.च्या पदवीसाठी मार्गदर्शन केले.

          डॉ. गायकवाड यांचा सौरशक्तीद्वारे जमिनीचे निर्जंतुकीकरण, बायोकंट्रोल व अळंबी उत्पादन या विषयांवर सतत भर होता. ते शेतकऱ्यांनादेखील या तीन विषयांमध्ये प्रशिक्षण देत होते. तसेच त्यांनी १९९२मध्ये नागपूर येथील कृषी महाविद्यालयाच्या वनस्पति-रोगशास्त्र विभागामध्ये जैविकशास्त्र आणि जीवाणूशास्त्र यांच्या प्रयोगशाळा स्थापन केल्या. तसेच अळंबी उत्पादन केंद्राचीही स्थापना केली. डॉ. गायकवाड यांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमधून ४५ लेख प्रकाशित झालेले आहेत. तसेच त्यांची नागपूर आकाशवाणी व दूरदर्शन केंद्रावर भाषणेही झालेली आहेत. त्यांनी शेतकऱ्यांना (बायोफर्टिलायजर) जैविक खते तयार करण्याचे, तसेच अळंबी उत्पादन करण्याचेही प्रशिक्षण दिलेले आहे. याबद्दल त्यांना २००३मध्ये ‘वसंतराव नाईक स्मृती संशोधन केंद्र, पुसद’चा पुरस्कार मिळाला.

          त्यांनी सौरशक्तीचा वापर करून रोग नियंत्रण करणे आणि जैविकरीत्या रोगनियंत्रण व किडींवर नियंत्रण मिळवणे हे काम मोठ्या प्रमाणावर केले आहे. त्यांनी नागपूर कृषी महाविद्यालयामध्ये स्थानांतरण झाल्यानंतर सूक्ष्म जीवशास्त्र (मायक्रोबायोलॉजी) व जैवतंत्रज्ञान (बायोटेक्नॉलॉजी) यांच्या दोन प्रयोगशाळा स्थापन केल्या. तसेच जैविक खते (बायोफर्टिलायजर) व बायोएजंट मोठ्या प्रमाणावर तयार करण्याचा प्रयत्नही केला. बायोएजंटचा वापर करून जमिनीद्वारे पसरणाऱ्या बुरशीवर नियंत्रण मिळवण्यातही त्यांना यश आले. सॉइल सोलरायजेशन करून रोपवाटिकेमधील रोगावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्नही त्यांनी केला. त्यांनी काही शेतकऱ्यांना व उद्योजकांना जैविक खते (बायोफर्टिलायझर), बायोएजंट, व्हर्मी कंपोस्ट, बायोपेस्टिसाइड यांचे उत्पादन घेण्यासाठी प्रोत्साहित केले. या उत्पादनांमुळे मिळणारा आर्थिक फायदाही त्यांनी सर्वांना दाखवून दिला.

          डॉ. गायकवाड यांची इंडियन विकृतिशास्त्र विभागाचे विभागीय अध्यक्ष म्हणून १९९९-२०००मध्ये निवड झाली. त्यांनी काही काळ नागपूरच्या कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणूनही काम केले. तसेच रामटेक येथे मिठा पान उत्पादित करण्याचे नवीन तंत्र शोधून काढले. त्यांनी ‘नॅशनल रीसर्च डेव्हलपमेंट कार्पोरेशन, नवी दिल्ली’ या संस्थेत सदस्य म्हणून काम केले.               

 - डॉ. चंद्रकांत श्यामराव संगीतराव

गायकवाड, सुरेश जनार्दन