Skip to main content
x

गोखले, गणेश रामचंद्र

गोखले, बाबूराव

       गणेश रामचंद्र ऊर्फ बाबूराव गोखले यांचा जन्म कुरुंदवाडला झाला. त्यांचे वडील कुरुंदवाडला पं. पलुस्करांच्या शेजारी राहत असत. नात्याने पं. विष्णू दिगंबर हे बाबूरावांचे मामा होते. बाबूरावांच्या मातोश्री द्वारकाबाई या पं. पलुस्करांच्या कनिष्ठ भगिनी होत्या.  बाबूरावांचे प्रारंभिक शिक्षण संपता संपता त्यांचे वडील १९०२ साली वारले. कुरुंंदवाड संस्थानाचे अधिपती अण्णासाहेब पटवर्धनांनी त्यांना सर्वतोपरी साहाय्य केले.

       पुढे वयाच्या बाराव्या वर्षी बाबूराव लाहोरच्या गांधर्व महाविद्यालयात दाखल झाले. त्यांना गायनाचे व हार्मोनिअमवादनाचे  शिक्षण जसे मिळाले, तसेच व्हायोलिनवादनाचे शिक्षण त्यांनी  पं. सुंदरम अय्यर यांच्याकडून घेतले. तबला व मृदंग ही वाद्ये त्यांना पं. गुरुदेवजी पटवर्धन यांनी शिकवली. बाबूरावांनी गुरुदेवजींची उत्तम प्रकारे सेवा करून त्यांच्याकडून खूप विद्या मिळवली आणि ते कुशल मृदंगवादक झाले. १९०८ सालानंतर गुरुदेवजींबरोबर ते संगीताच्या कार्यक्रमांमध्ये भाग घेऊ लागले.

       १९२६ साली लाहोर सोडून ते मुंबईला आले आणि प्रथम सँडहर्स्ट रोडवर ‘महाराष्ट्र संगीत विद्यालया’ची स्थापना करून ते गायन-वादनाचे शिक्षण अल्पदरात देऊ लागले. १९३८ साली गिरगावात हे विद्यालय भरभराटीस आले. १९४२ पासून मात्र हे विद्यालय गावदेवी भागात होते. त्यांच्या पत्नीही तेथे स्त्रियांचे वर्ग घेत असत. श्री.ना.दा.ठा. महिला महाविद्यालयात विभाग प्रमुख (संगीत) म्हणून त्यांनी कार्य केले.

         बाबूरावांच्या शिष्यांमध्ये गजानन कर्नाड, प्रभाकर परब, गोपाळराव फडके, शंकरराव मोडक आणि शिवकुमार शुक्ल ही नावे उल्लेखनीय आहेत. पखवाजात तयार झालेले त्यांचे शिष्य म्हणजे जनार्दन अभ्यंकर हे होत.

डॉ. सुधा पटवर्धन

गोखले, गणेश रामचंद्र