Skip to main content
x

गोखले, मुकुंद वासुदेव

             जाहिरातकला आणि संगणकीय मुद्राक्षर संकलन क्षेत्रातील तज्ज्ञ मुकुंद वासुदेव गोखले यांचा जन्म नागपूर येथे झाला. नागपूर येथे शालेय शिक्षण आणि गव्हर्न्मेंन्ट पॉलिटेक्निक संस्थेतून डिप्लोमा इन आर्ट केल्यानंतर ते मुंबईत आले आणि १९७० साली त्यांनी जी.डी. अप्लाईड आर्ट पूर्ण केले. ज्या करिअर आर्ट संस्थेमध्ये ते शिकत होते, तिथे त्यांनी तीन वर्षे अधिव्याख्याता म्हणून काम केले. नंतर १९७३ ते १९७८ या काळात सर जे.जे.इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट येथे ते अधिव्याख्याता होते.

             जे.जे.च्या सेवेत असताना १९७५ साली, भारत सरकारच्या औद्योगिक गुणवत्ता विकास योजनेतून गोखले यांना तीन महिने विशेष शिष्यवृत्ती मिळाली. त्याकरिता मुंबईतील प्रसिद्ध गुजराती टाइप फाउण्ड्रीत गोपालकृष्ण मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली ठशांचे ओतकाम (टाइपांचे कास्टिंग), मातृकांची जोडणी (मॅट्रिसांचे फिटिंग) मुद्राक्षरसंचासाठी (फाँट) सुयोग्य अक्षरांकन अशा अंगाने त्यांनी विशेष संशोधनात्मक अभ्यास व निरीक्षणे केली. नजीकच्या भविष्यात घडू पाहणाऱ्या घटनांचा वेध घेत, जाहिरातकलेतून उपयोजितकलेच्या मातृकासंच संकल्पन (फॉण्ट डिझायनिंग) ह्या नव्या विस्तारित जगात त्यांचा प्रवेश घडला. त्यांनी लिहिलेल्या ‘देवनागरी लिपीची आरेखन परिभाषा’ या संशोधनपर लेखामुळे लिपिकार लक्ष्मण श्रीधर वाकणकर यांच्याशी त्यांची ओळख झाली व पुढे १९७९ पासून त्यांच्या जीवनाची दिशाच बदलून गेली.

             अक्षर-रचना, मूलभूत संशोधन व संगणकीय अक्षर-रचना निर्मिती, ह्या नव्या क्षेत्राला मुकुंद गोखले यांनी स्वत:ला वाहून घेतले. पुण्यात १६ जानेवारी १९७९ रोजी लिपीकार ल. श्री. वाकणकर, एक्स्पर्टो इंडस्ट्रिअल एन्ग्रेव्हर्स कंपनीचे कार्यकारी संचालक वसंत भट व प्रा. मुकुंद गोखले यांनी ‘इन्स्टिट्यूट ऑफ टायपोग्रफिकल रिसर्च’ म्हणजेच प्रसिद्ध ‘आय.टी.आर.’ ह्या संस्थेची स्थापना केली.

             नव्या युगाच्या संगणकीय मुद्रणतंत्रज्ञान प्रणालीत भारतीय लिप्या रूपांतरित करणे शक्य झाल्याने संगणकीय मुद्राजुळणी सुलभ झाली. आय.टी.आर.ने लिपीकार वाकणकरप्रणीत, संगणकात अक्षरांचे ध्वन्यात्मक अंत:प्रेषण व बहि:प्रेषण करण्याशी संबंधित संशोधनाचे उपयोजन केले व त्यात व्यावसायिक यश मिळविले. उपयोजित कलेचा हा नवा विभाग महाराष्ट्रात यशस्वीपणे विकसित करण्याचे मोलाचे कार्य वाकणकर, र.कृ. जोशी यांच्यानंतर मुकुंद गोखले यांनी मोठ्या प्रमाणात केले.

             जुन्या हस्तलिखित पोथ्यांचा सूक्ष्म अभ्यास करून गोखले यांनी अक्षरवळणे व त्यांचे प्रमाणबद्ध अक्षर- रचनांचे आरेखन केले. भाषेच्या व्याकरण व सांस्कृतिक आकृतिबंधाला कायम ठेवत त्यांनी सुलेखनकला व तंत्रज्ञान यांची सांगड घातली. ध्वनी व अक्षरचित्रे या दोन माध्यमांना भाषाभ्यासाने जोडत, भारतातील सर्व भाषांच्या लिप्यांचे संगणकीय अक्षर-रचनांचे संकल्पन व उपयोजन, असा गोखले यांचा गेल्या तीन दशकांपेक्षा जास्त वर्षांचा असा कामाचा व्याप आहे.

             या कामाच्या ओघात त्यांनी देवनागरी, बंगाली, तामीळ, मल्याळम अशा भारतीय भाषांबरोबरच सिंहली, थाई, लाओशिअन, बर्मिज, तिबेटन, लिंबू, लेपचा, मणिपुरी, मोडी, इंग्रजी यांसाठी मातृकासंच संकल्पनाचे (फॉण्ट डिझायनिंग) मोलाचे काम केले. ताई अहोम व ताई खामटी या अरुणाचल प्रदेशातील आदिवासी लोकांच्या ‘ताई लिटरेचर सोसायटी’साठी प्रथमच गोखले यांनी अक्षरांच्या वारंवारितेचा अभ्यास करून अक्षरांकन, मॅट्रिसेस, शिशाच्या ठशांचे उत्पादन केले. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांसाठी पुस्तकनिर्मिती शक्य झाली व ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या रोमनीकरणाच्या (रोमनायझेशन) रेट्याला थोपविण्यास मदत होऊन तेथील मुलांना त्यांच्या मातृभाषेतून शिकण्याची सोय झाली. गोंडी भाषेच्या लिपीसाठी मुद्रणसुलभ अशी संगणक प्रणाली गोखले यांनी तयार केली आहे. उपयोजित चित्रकलेच्या गरजा लक्षात घेऊन ‘स्वदेश’ ही सुप्रसिद्ध संगणकीय मुद्र्राजुळणी प्रणाली गोखले यांनी विकसित केली.

             गोखले यांनी व्यवसायानिमित्त अनेक देशांना भेटी दिल्या व जगातील नामवंत कंपन्यांबरोबर आय.टी.आर.चे सहकार्य करार झाले. गोखले यांच्या देखरेखीखाली केलेली ‘योगेश’, ‘नटराज’, ‘श्रीधर’ यांसारखी देवनागरीची संगणकीय अक्षरवळणे (कोम्प्युटराइज्ड टाइपफेसेस) उपयोजित कला व्यवसाय, मुद्रण व प्रकाशन उद्योग क्षेत्रांत लोकप्रिय झाली.

             विशिष्ट अक्षरवळणे (टाइपफेसेस) एखाद्या व्यक्तीच्या लेख अथवा पुस्तकासाठी फक्त एकदाच वापरून त्यांना आदरांजली वाहण्याची अभिनव कल्पना गोखले यांनी प्रत्यक्षात आणली. मानसन्मान प्रकाशनाच्या रवींद्र पोवळे लिखित ‘डॉन ब्रॅडमन’ पुस्तकासाठी ‘सुनंदा’ या अक्षरवळणाने ब्रॅडमन यांना, तर अ.द.मराठे व दत्ता मारुलकर यांच्या ‘गीतरामायण—मागोवा शब्दसुरांचा’ या पुस्तकात ‘भारत’ या अक्षरवळणाने त्यांनी ग.दि. माडगूळकर यांना आदरांजली वाहिली आहे. र.कृ. जोशी यांच्या निधनानंतर भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून गोखले यांनी ‘अवंतिका’ हे अक्षरवळण ‘रुची’ मासिकाच्या र.कृ. जोशी विशेष अंकातील गोखले यांच्या लेखापुरतेच वापरले.

             लिपीकार वाकणकर, वसंत भट व मुकुंद गोखले यांनी १९८३ साली पुणे, १९८४ मध्ये दिल्ली व १९८५ साली कलकत्ता (कोलकाता) येथे आंतरराष्ट्रीय दर्जाची सुलेखन, अक्षरांकन आणि मुद्राक्षरकला —  भारतीय लिप्यांची ‘कॅलिग्रफी, लेटरिंग अ‍ॅण्ड टायपोग्रफी ऑफ इंडिक स्क्रिप्ट्स’वर ‘कॅल्टिस’ या नावाने तीन चर्चासत्रे आयोजित केली. त्या निमित्ताने सुलेखन ते अक्षर-रचना निर्मितीसंबंधी अभ्यासपूर्ण संशोधनपर लेख संग्रहरूपाने प्रकाशित केले. हे दस्तऐवज आज भारताच्या संदर्भात एकमेव असे संदर्भ ग्रंथ मानले जातात. वाकणकर यांनी ‘अक्षर रचना’ यासारखे दर्जेदार मासिक १९८५ ते १९९७ या काळात प्रकाशित करून ह्या विषयासंबंधी जनजागृती,  अभ्यासपूर्ण चिंतन व प्रबोधन घडवून आणले. ‘इव्हॉल्युशन ऑफ स्क्रिप्ट अ‍ॅण्ड टायपोग्रफी’मध्ये युरोप व भारतात लिपी व मुद्राक्षरांचा समांतर प्रवास कसा होत गेला, त्याचा आगळ्या पद्धतीने तुलनात्मक आढावा गोखले यांनी प्रथमच दीपक घारे व रंजन जोशी यांच्या सहकार्याने पुस्तकरूपात मांडला. २००९ मध्ये गोखले यांचे ‘देवनागरी लिपी - चिन्हांची शास्त्रीय ओळख आणि आरेखन परिभाषा’ हे संशोधनपर पुस्तक प्रकाशित झाले.

             आज मुकुंद गोखले, युरोपातील ३२ भाषा, वैदिक संस्कृत, भारतीय संगीत, ऐतिहासिक मोडी कागदपत्रे यांचे मुद्रण त्यांतल्या विशिष्ट चिन्हांसह सुलभतेने करता यावे यासाठी संगणकीय अक्षर-रचनेच्या संशोधनात व्यस्त आहेत. याचे मूर्त रूप ‘वैदिक स्वरचिन्हे’ या रवींद्र अंबादास मुळे यांच्या ग्रंथात दिसते. गोखले यांनी यासाठी आवश्यक असलेली सर्व चिन्हे संगणकावर उपलब्ध करून दिली.

             एका जाहिरातकला चित्रकाराने उपयोजित अक्षर-रचना व नव्या संगणकीय तंत्रज्ञानाचे अवधान राखून, संशोधनात्मक बैठक अधोरेखित करत, सर्जक सौंदर्यदृष्टी कायम ठेवून केलेला हा प्रवास आहे.

- दीपक घारे

गोखले, मुकुंद वासुदेव