Skip to main content
x

गवाणकर, वीणा चंद्रकांत

वीणा गवाणकर यांचा जन्म लोणी, काळभोर, येथे झाला. चौल, मनमाड, इंदापूर, खेड (राजगुरुनगर) येथील शाळांमध्ये वीणाताईंचे शिक्षण झाले. पुढे फर्गसन महाविद्यालयामधून वीणाताईंनी आपले पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. पुणे विद्यापीठातून ग्रंथपाल म्हणून पदवी प्राप्त केली व १९६४मध्ये त्या मिलिंद महाविद्यालय, औरंगाबाद येथे ग्रंथपाल म्हणून रुजू झाल्या. लहानपणापासून असलेली वाचनाची आवड, शिक्षकांकडून मिळालेले प्रोत्साहन आणि आता ग्रंथपाल म्हणून नोकरी, यामुळे विविध वाङ्मय प्रकारांतील पुस्तकांबरोबरच विविध भाषा आणि जगभरातील पुस्तके यांचा परिचय होत गेला. पुस्तके व वाचन यांच्या आवडीमुळे मुंबईतील पदपथावरील पुस्तकांत त्यांना ‘कार्व्हर’वरील पुस्तक सापडले. त्याला पूरक संदर्भग्रंथ त्यांना एशियाटिक सोसायटी आणि प्राचार्य पु.द.कोडोलीकर यांच्याकडून मिळाले आणि जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हरचे चरित्र मराठीत प्रकाशित झाले. या पुस्तकाने इतिहास घडवला. त्याच्या २९ आवृत्त्या निघालेल्या आहेत.

वीणाताईंनी मराठी साहित्यात चरित्र लेखनाची मोलाची भर घातलेली आहे. जन्माने गुलाम असलेल्या अनाथ कृष्णवर्णीय अमेरिकन कृषिशास्त्रज्ञाच्या धडपडीची, मानवी जीवनाचे मोल वाढवणार्‍या त्याच्या प्रयत्नांचा वेध घेणारी चरित्र कहाणी ‘एक होता कार्व्हर’ (१९८१) यामधून घडवली आहे. मानवी जीवनाची सेवा करण्यासाठी, भारतातील ग्रामीण आरोग्याचा स्तर उंचावण्यासाठी आपले ज्ञान वापरणार्‍या कर्तव्यनिष्ठ अमेरिकन महिला डॉक्टरची जीवनकथा ‘डॉ. आयडा स्कडर’ मधून (१९८४) चित्रित केलेली आहे. ‘सर्पतज्ज्ञ डॉ. रेमंड डिटमार्स ’(१९८७) यामधून साप पाळण्याच्या छंदापासून जागतिक कीर्तीचा सर्पतज्ज्ञ होण्यापर्यंतचा एक मुलखावेगळा प्रवास खास किशोर वाचकांसाठी वीणाताईंनी रेखाटलेला आहे. ‘पक्षितज्ज्ञ डॉ. सलीम अली’ (१९९०) हे चरित्र भारतीय पक्षी विज्ञानाला जागतिक स्तरावर मान्यता प्राप्त करून देणार्‍या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या पक्षितज्ज्ञाच्या जीवनकार्याचा वेध घेणारे आहे. ‘डॉ. खानखोजे : नाही चिरा नाही पणती’ (१९९७) या चरित्रग्रंथात महान क्रांतिकारक आणि श्रेष्ठ कृषितज्ज्ञ, स्वातंत्र्यसंग्रामात परागंदा व्हावे लागलेल्या भारतीय सुपुत्राचा अस्सल पुराव्यांच्या आधारे घेतलेला शोध आहे.

नोबेल पुरस्कारासाठी ‘लीझ माइटनर’ यांचे नाव पंधरा वेळा सुचवले गेले. हिटलरच्या जर्मनीला प्रयत्न करूनही जिचे पायाभूत संशोधन दडपता आले नाही, अशा एका ऑस्ट्रिअन अणुशास्त्रज्ञ स्त्रीची कहाणी ‘लीझ मायटनर’ (२००३) या चरित्रात आहे. ‘भगीरथाचे  वारस : विलासराव साळुंखे’ (२००५) हे चरित्र म्हणजे ‘पाणी ही एक राष्ट्रीय संपत्ती आहे. ती वैयक्तिक असूच शकत नाही. भूमिहीनांचाही तिच्यावर हक्क आहे.’ असे ठणकावून सांगणार्‍या आणि जलव्यवस्थापनाचा व जलनियोजनाचा नवा विचार मांडून त्याच्या प्रसारासाठी आयुष्यभर कटिबद्ध राहिलेल्या एका मनस्वी अभियंत्याच्या प्रयत्नांना अक्षरबद्ध केलेली साक्ष आहे.

याखेरीज ‘ली आयकोला’, ‘विन्नी मंडेला’, ‘एमेलिन पॅखहर्स्ट’, ‘जोन ऑफ आर्क’, असे ३० चरित्रपर लेख वीणाताईंनी विविध दिवाळी अंकांतून लिहिले आहेत. एखाद्या व्यक्तित्वाच्या सखोल अभ्यासाने, सार्‍या कंगोर्‍यांसह प्रत्येक चरित्र वीणाताई आपल्यासमोर साक्षात सादर करतात. डॉ. आयडा स्कडरची जीवनकहाणी तपासण्यासाठी त्या केरळ येथे काही दिवस जाऊन राहिल्या. डॉ. खानखोजेंच्या कार्याचे दुवे शोधण्यासाठी त्या दिल्ली आणि कोलकाता येथे जाऊन आल्या.

चरित्र लेखनाबरोबरच वीणाताईंनी ‘लोकसत्ता’च्या रविवार पुरवणीतील ‘किशोरकुंज’चे (१९८९-१९९१) संपादन केले. ‘एक होता कार्व्हर’ (१९८५); पक्षीतज्ज्ञ डॉ. सलिम अली-(१९९०); डॉ. खानखोजे, नाही चिरा नाही पणती’ (१९९७) ह्या त्यांच्या पुस्तकांना उत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीबद्दल महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार मिळाले आहेत.

२०१७ साली पर्यावरण साहित्य परिषदेच्या अध्यक्षा होण्याचा सन्मान त्यांना लाभला आहे. 

- डॉ. सिसिलिया कार्व्हालो

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].