हळदणकर, श्रीकृष्ण सावळाराम
श्रीकृष्ण सावळाराम हळदणकर यांचा जन्म मुंबई येथे झाला. ते ‘बबनराव’ या नावाने परिचित आहेत. त्यांचे वडील सावळाराम हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार होते. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई होते. बबनरावांचे शालेय शिक्षण ‘शारदा विद्या मंदिर’मध्ये झाले. मुंबई विद्यापीठातून त्यांनी रसायनशास्त्र या विषयाची बी.एस्सी.(टेक.) ही पदवी घेतली. रसायन उद्योगात संशोधन व विकास अधिकारी म्हणून त्यांनी १९८५ पर्यंत काम केले.
त्यांनी १९५० ते १९५५ या काळात गानतपस्विनी मोगूबाई कुर्डीकर यांच्याकडे भरीव तालीम घेतली. दीर्घ दमसास, अस्ताई-अंतर्याची चपखल मांडणी या गोष्टी बबनरावांमध्ये रुजल्या. पुढे आग्रा घराण्याचे श्रेष्ठ उस्ताद खादिम हुसेन खाँसाहेब यांच्याकडे १९६० ते १९७५ या काळात त्यांनी नियमितपणे तालीम घेतली व खाँसाहेबांच्या अखेरपर्यंत (१९९३) बबनराव त्यांचे मार्गदर्शन घेत होते. अनवट राग, वैविध्यपूर्ण बंदिशी, गायकीची अठरा अंगे, ढंगदार बोलबनाव, तसेच ख्याल, धमार, ठुमरी अशा विविध शैलींची तालीम त्यांना खाँसाहेबांकडून मिळाली.
नोम् तोम् चे नादसौंदर्य, लडिवाळ बोलबनाव, लयकारी व तिहायांवरील प्रभुत्व, आम रागांची अनोखी मांडणी व अनवट रागांमधील सहज संचार ही त्यांच्या गायकीची वैशिष्ट्ये आहेत. ‘रसपिया’ या नावाने त्यांनी अनेक ढंगदार व आकर्षक बंदिशी बांधल्या आहेत. बबनरावांनी ‘कौसी जोग’ व ‘चांदनी मल्हार’ हे राग निर्मिले.
आग्रा व जयपूर गायकीच्या सौंदर्यतत्त्वांची चर्चा करणार्या ‘जुळू पाहणारे दोन तंबोरे’ या त्यांच्या पुस्तकास महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार १९९७ मध्ये प्राप्त झाला. ‘मिलनोत्सुक दो तानपूरे’ या नावाने हिंदीमध्ये या पुस्तकाचा अनुवाद झाला आहे. ‘रागाज अॅज संग इन आग्रा घराना’ (२००१), Aesthetics of Jaypur and Agra Tradition ‘रसपिया बंदिशें’ या पुस्तकांतून कॅसेटच्या संचासह बबनरावांच्या काही वैशिष्ट्यपूर्ण बंदिशी प्रकाशित झाल्या आहेत. ‘घराण्यांची वाटचाल’ हे अन्य घराण्यांची चर्चा करणारे पुस्तक त्यांनी संपादित केले आहे. एच.एम.व्ही.तर्फे बबनरावांच्या ध्वनिमुद्रिका प्रकाशित झाल्या असून आकाशवाणीचे ते ‘अ’ श्रेणीचे कलाकार आहेत. भारतभर, तसेच युरोप-अमेरिका येथेही त्यांच्या मैफली झाल्या आहेत.
गोवा कला अकादमी येथे १९८२ मध्ये संचालक पदावर काम करीत असताना देशभरातील विद्वानांना पाचारण करून ५४ रागांची स्वरूपे निश्चित करणारा ‘रागों का प्रमाणीकरण’ हा प्रकल्प त्यांनी यशस्वीपणे पार पाडला. संगीत क्षेत्रातील उत्तम लेखनासाठीचा ‘काका हाथरसी’ पुरस्कार (२००३); भारत गायन समाज, पुणे यांच्याकडून ‘माणिक वर्मा’ पुरस्कार (२००३); प्रभा अत्रे फाउण्डेशन पुरस्कार (२००४) व संगीत क्षेत्रातील कामगिरीसाठी महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार (२००७) असे पुरस्कार त्यांना लाभले आहेत. त्यांचा शिष्यपरिवार फार मोठा आहे. बबनरावांच्या पत्नी उषाताई यांची समर्थ साथ या सर्व वाटचालीमध्ये आहे.