इंदापूरकर, लक्ष्मण नरहर
लक्ष्मण नरहर इंदापूरकर यांचा जन्म इंदापूर येथे झाला. लक्ष्मणराव चार वर्षांचे असताना त्यांची आई वारली आणि पत्नीवियोगाने वडील विरक्त झाले. अशा परिस्थितीत त्यांच्या मामांनी त्यांचा सांभाळ केला.
लक्ष्मणरावांनी ‘तात्या पंतोजी’च्या शाळेत मोडी लेखन, वाचन व हिशेब यात प्राविण्य मिळविले. घरगुती व्यवसाय व प्रपंच चालविण्याइतके शिक्षण झाल्यानंतर मामांनी त्यांना शेतीचे काम पाहण्यास सांगितले व अंगमेहनतीचे कामही त्यांनी चोख रितीने बजाविले. ते पाहून मामांचे त्यांच्यावर आपल्या मुलाप्रमाणे प्रेम बसले.
त्यावेळी इंदापूरमध्ये रे. नारायणराव शेषाद्री स्कॉट मिशनची शाळा चालवत. त्यात ते प्रौढ मुलांना इंग्रजी शिकवित आणि हुशार मुलगा दिसला की त्याला पुढील शिक्षणासाठी पुण्यातील मिशन शाळेमध्ये पाठविण्याचा पालकांकडे आग्रह करीत. मामांनी त्यांच्या सांगण्यावरून लक्ष्मणरावांना पुणे येथे पाठविले. पुढे चार वर्षातच ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर मिशन शाळेत त्यांनी वर्षभर तिसऱ्या इयत्तेला इंग्रजी शिकविण्याचे काम केले.
मिशन शाळेमध्ये विद्यार्थीदशेत असताना तेथील हेडमास्तर रे. गार्डनर यांची त्यांच्यावर, त्यांचा इंग्रजी विषय चांगला असल्यामुळे, मर्जी बसली व त्यामुळे त्यांनी यांना २० रुपयांची शिष्यवृत्ती देऊन मुंबई येथे विल्सन महाविद्यालयामध्ये पाठविले. तेथे एक वर्ष झाले तोच गार्डनरसाहेब स्वदेशी गेले व त्याबरोबरच त्यांची शिष्यवृत्तीही बंद झाली. त्यामुळे लक्ष्मणरावांना परत पुण्यास यावे लागले. पुढे हैद्राबाद संस्थानात एका तालुकादाराच्या मुलास शिकविण्याकरिता गेले. परंतु तेथील हवामान न मानवल्यामुळे ते परत पुण्यास येऊन काशिनाथपंत नातू यांचे शाळेत मुख्याध्यापकांचे काम करू लागले. याच सुमारास वामनराव भावे हे मिशन शाळेत अध्यापक होते. ते तेथून निघाल्यानंतर त्यांनी स्वतंत्र शाळा काढण्याचे ठरविले. याचवेळी मिशन शाळेच्या चालकांचा व तेथील विद्यार्थ्यांचा धार्मिक शिक्षणच्या बाबतीत बेबनाव झाल्यामुळे मिशन शाळेतील सुमारे ३०० हिंदू विद्यार्थ्यांनी नवीन निघणार्या शाळेत येण्याचे वचन दिले होते. तसेच नातूंची शाळाही मोडकळीस आली होती. याचवेळी वामनराव भावे, लक्ष्मणराव इंदापूरकर व आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या गाठी पडून त्यांनी राष्ट्रीय शिक्षण देणारी स्वतंत्र शाळा सुरू करण्याचे ठरविले.
कोणत्याही प्रकारची साधनसामग्री नसता अगर ती तत्काल मिळण्याचा संभव नसतानाही या तिघांनी आपल्या आत्मिक सामर्थ्याच्या जोरावर विद्यामंदिर स्थापन करण्याचे ठरविले. २४ सप्टेंबर १८७४ साली ‘पुणे नेटिव्ह इन्स्टिट्यूशनची’ स्थापना केली. ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’ व ‘नूतन मराठी विद्यालय’ या संस्था स्थापन होण्यापूर्वीच ज्या आद्य संस्थेने महाराष्ट्रातील विद्येचे माहेरघर म्हणून नावाजलेल्या पुण्यनगरीत काळाला अनुरूप अशा आंग्ल भाषेच्या ज्ञानाचा प्रसार करण्याच्या कार्यास सुरुवात करून त्याचा फायदा सामान्य जनतेला करून देण्याचे श्रेय या संस्थापकांना द्यावयास पाहिजे.
वामनराव भावे हे शाळेचे मुख्याध्यापक, पण शाळेचे खरे प्रशासक लक्ष्मणरावच होते. वामनरावांचे मुख्य काम होते सरकारी अधिकार्यांच्या भेटी घेणे, शाळेसाठी सरकारी परवानगी आणणे, देणगीदारांना शाळा दाखविणे व त्यांच्याकडून देणग्या मिळविण्यासाठी प्रयत्न करणे आणि लक्ष्मणरावांचे काम होते शाळेची अंतर्गत व्यवस्था पाहणे, शिक्षकांचे ज्ञानदान व विद्यार्थ्यांचे अध्ययन याकडे लक्ष देणे, शाळेत शिस्त लावणे व शाळेतील सर्व कार्यक्रमांचे सूत्रबद्ध संचालन करणे. कोणत्याही संस्थेचा मूलाधार हा प्रभावी नेता व निःस्वार्थी अनुयायी यांच्या सहकार्यावर अवलंबून असतो. वामनराव व लक्ष्मणराव यांच्या सहकार्यात हा अपूर्व संगम आपणांस आढळून येतो. लक्ष्मणरावांनी शाळेत व्यवस्थापक, मुख्याध्यापक, शिक्षक व संस्थेचे चालक या नात्याने सेवा केली. त्यांची इंग्रजी शिकविण्याचे कामी इतकी कीर्ती होती की ते जरी नुसते मॅट्रिक्युलेशनचीच परीक्षा उत्तीर्ण होते तरी मुंबई विद्यापीठाने त्यांना संस्थेने काढलेल्या ‘महाराष्ट्र महाविद्यालय’ मध्ये इंग्रजीचे मुख्य अध्यापक या नात्याने काम करण्यास खास परवानगी दिली होती. शाळा हेच सर्वस्व असल्याने त्यांनी आपले जीवनच शाळेला वाहून टाकले होते.