आपटे, अंतूबुवा
अंतूबुवा आपटे हे महाराष्ट्राच्या दक्षिण भागातल्या रामदुर्ग संस्थानाचे रहिवासी होते. एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात रामदुर्गातील एका प्रतिष्ठित घराण्यात जन्मलेल्या अंतूबुवांचे बाळबोध पद्धतीने शालेय शिक्षण सुरू असताना त्यांची संगीताची आवड वाढली. एक दिवस त्यांना समजले की मिरजेत एक गवई आले आहेत आणि ते कुणालाही शिकवतात. मग घरात कोणालाही न सांगता अंतूबुवा मिरजेला गेले. तिथे ते उ. झाइन-उल्-अबदीन खाँसाहेब यांना भेटले. उस्तादांनी आपल्याला संगीत शिकवावे अशी अंतूबुवांनी त्यांना विनंती केली, तेव्हा त्यांनी घरात काम करून शिकावे लागेल अशी अट घातली. अंतूबुवांनी ती अट मान्य केली. त्यांनी ५-६ वर्षे कसून मेहनत केली. गुरूंनी शिकवलेले सर्व घोटून आपल्या गळ्यावर चढविले. गुरू आणि आपले सहाध्यायी महादेव गोखले यांच्यासह अंतूबुवांनी अनेक संस्थानांत व कुरुंदवाड येथील गणेशोत्सवांत हजेरी लावली.
अशा प्रकारे भरपूर अनुभवाची शिदोरी मिळवून अंतूबुवा रामदुर्ग येथे परतले. रामदुर्ग संस्थानिकांनी त्यांना आपले दरबार गायक म्हणून नेमले. उस्तादांकडून चिजांचा मोठा संग्रह अंतूबुवांना प्राप्त झाला होता, शिवाय त्यांची गाण्याची शैलीही उत्तम होती. त्यामुळे महाराष्ट्रात त्यांची ख्याती दूरवर पसरली. त्यांच्या शिष्यांमध्ये प्रामुख्याने बळवंतराव केतकरांचे नाव उल्लेखनीय आहे. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस आपटे यांचे निधन झाले. बाळकृष्णबुवा इचलकरंजीकरांच्या पूर्वीच्या काळात महाराष्ट्रात पक्की गायकी, रागसंगीत गाणार्या कलाकारांत आपटे यांचे नाव महत्त्वपूर्ण आहे.