Skip to main content
x

बारलिंगे, सुरेंद्र शिवदास

     सुरेंद्र बारलिंगे यांचा जन्म आणि बालपण नागपूर येथे गेले. त्यांचे वडील वकील होते, तसेच ते अनेक विषयांचे विद्वानही होते. गांधीजींच्या आवाहनानुसार त्यांनी वकिली व्यवसायाचा त्याग केला. सुरेंद्र बारलिंगे यांना शाळेत न घालता एका खाजगी शाळेत शिक्षण दिले गेले. १९३४ साली मॅट्रिक झाल्यानंतर त्यांनी मॉरिस कॉलेजमधून बी.ए.ची पदवी घेतली. त्याच काळात ते सामाजिक चळवळीत सक्रिय होते.

     १९४२ साली ते एम.ए.ची परीक्षा तत्त्वज्ञान विषय विषय घेऊन प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. त्यानंतर, ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फिलॉसॉफी’ या अमळनेरच्या संस्थेत ते ‘फेलो’ म्हणून रुजू झाले. १९४२ ते १९४५ या काळात ‘भारत छोडो’ चळवळीत त्यांचा सहभाग होता. पुढे छत्तीसगड कॉलेज, हैद्राबाद व नांदेड येथील महाविद्यालयात १९५० ते १९५८ या काळात त्यांनी अध्यापन केले. नांदेड येथील महाविद्यालयाचे ते पहिले प्राचार्य होते.

     १९५७ साली त्यांनी तत्त्वज्ञानात पीएच.डी. मिळवली. १९५८ साली त्यांनी ऑक्सफर्डला प्रयाण केले. १९६२ साली युगोस्लाव्हियातील झागरेब विद्यापीठात त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केले. काही काळ दिल्ली विद्यापीठात काम करून १९६८ साली ते ऑस्ट्रेलियात गेले. नंतर त्यांनी पुणे विद्यापीठात तत्त्वज्ञान विभागाचे प्रमुखपद (१९७० ते १९८०) सांभाळले. दरम्यान, १९७६ साली सिमला येथील भारतीय उच्च अध्ययन संस्थेत ‘फेलो’ म्हणून त्यांची नेमणूक झाली. १९८१ ते १९८७ या काळात ते ‘महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळा’चे अध्यक्ष होते. डॉ. बारलिंगे यांच्या नावावर तेरा मराठी, सहा हिंदी, आठ इंग्रजी पुस्तके आहेत. ‘क्रांतिपूजा’, ‘सौंदर्याचे व्याकरण’, ‘तर्करेखा’ या तत्त्वज्ञानविषयक पुस्तकांव्यतिरिक्त, ‘मी पण माझे’ ही कादंबरी; ‘माझे घर माझा देश’, ‘गोष्टीचं गाठोडं’ हे कथासंग्रह; ‘पुन्हा भेटू या’, ‘आभाळाच्या सावल्या’ हे ललितलेखसंग्रह, ही त्यांची काही पुस्तके होत.

     ‘मी पण माझे’ ही लैंगिक विषयावरील कादंबरी आहे. विषय खूप स्फोटक असूनही कादंबरीला तात्त्विक, वैचारिक पार्श्वभूमी न लाभल्यामुळे ती अपेक्षेइतकी प्रभावी होत नाही, असे समीक्षकांचे मत आहे.

     तत्त्वज्ञानविषयक लेखनातून बारलिंगे यांची विचारपद्धती अगदी तर्कशुद्ध आहे हे लक्षात येते. कुठल्याही गोष्टीचे विश्लेषण ते मार्मिकपणे करत. त्यांनी ‘इंडियन फिलॉसॉफिकल क्वार्टरली’ (परामर्श) आणि ‘थिंकर्स अकॅडमी जर्नल’ (ताज) ही नियतकालिके सुरू केली. तत्त्वज्ञान या विषयाचे त्यांचे अनेक निबंध वेगवेगळ्या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झालेले आहेत.

     - अशोक बेंडखळे

बारलिंगे, सुरेंद्र शिवदास