Skip to main content
x

बेलोरकर, सुधाकर राजेश्वर

           सुधाकर राजेश्वर बेलोरकर यांचा जन्म यवतमाळमधील घाटंजी तालुक्यातील बेलोरा येथे झाला. त्यांच्याकडे शेकडो एकर जमीन खंडोनिशी आणि गाईवासरे व बकऱ्या यांचे मोठे कळप आहेत. त्यांची बेलोरा गावच्या सरपंचपदी २० वेळा बिनविरोध निवड झाली आहे. शेती हाच त्यांचा व्यवसाय आहे. त्यांचे पारंपरिक पिकाच्या व्यतिरिक्त द्राक्ष, पेरू, लिंबू, संत्रा व ऊस या विविध पिकांचे मोठमोठे मळे आहेत. शेतीवर वेगवेगळी पिके घेण्याचा ते नेहमी प्रयत्न करत असतात. त्यांनी १९६८मध्ये जपानी पद्धतीने धानाची लागवड केली आणि धानाचे एकरी ३२ क्विंटल उत्पन्न मिळवले. तेव्हापासून ते नेहमी खरीप हंगामामध्ये भाताचे पीक घेतात. त्यांनी म.फु.कृ.वि.कडील भाताच्या सूर्या, सत्त्या व सुहासिनी या जातींची लागवड केली. त्यांनी शेतात ११ एकरांत उसाचे चांगले उत्पादन मिळवले आहे. ते उसापासून गूळ तयार करतात. त्यांनी गव्हामध्ये हिरा, शेरा व सोनोलिका गहू आणि कल्याण सोना गहू यांचे पीक घेतले आहे. त्यांनी संकरित एच ४ कपाशीचे पेरणी करून एकरी ८ ते १० क्विंटल कपाशीचे उत्पन्न काढले. त्यांनी एच ४ कपाशीबरोबरच एम.सी.यू.५ या जातीच्या कपाशीची लागवडदेखील केली आहे. त्यांनी १९७३-७४च्या हंगामात कापसाच्या एच ४ जातीवर वेगवेगळे प्रयोग करून जमिनीच्या मगदुराप्रमाणे ३ x २ फूट, ३ x ३ फूट, ३ x ४ फूट अंतराने कपाशी लावून भरपूर उत्पन्न काढले आहे. गव्हाचे दुबार पीक घेताना त्यांनी मोती गहू पेरून एकरी १८ क्विंटल उत्पन्न मिळवले. त्यांनी शेतीचा आर्थिक विकास करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बीजोत्पादनाचा कार्यक्रम घेऊन संकरित ज्वारी आणि एच ४ कापूस याचे उत्तम प्रकारे बीज उत्पादन केले. त्यांनी शेतीमध्ये पाण्याचे उत्तम प्रकारे व्यवस्थापन केले व पाइपलाइन टाकून बीजोत्पादनामध्ये यश मिळवले.

           बेलोरकर यांना कृषी खात्याने १९८८मध्ये कृषिभूषण पुरस्कार दिला आहे. तसेच त्यांना वसंतराव नाईक स्मृती पुरस्काराने गौरवले. ते १२ वर्षे घाटंजी पंचायत समितीचे सदस्य होते. शंकर शेतकरी सहकारी साखर कारखाना, प्रियदर्शनी सहकारी सूतगिरणी, यवतमाळ, जिल्हा सिंचन समितीचे सदस्य, गंगा फर्टिलायझर कंपनीचे संचालक व संत इस्तारी महाराज पाणी व्यवस्थापन सोसायटीचे अध्यक्ष तसेच वसंत जिनिंग सहकारी संस्थेचे संचालक म्हणूनही त्यांनी जबाबदारी घेतली. त्यांनी बेलोरा ग्रामपंचायतीमध्ये सर्व शेतकऱ्यांच्या शेतामध्ये बोरीच्या नवीन जातीची कलमे बांधून बोर उत्पादनाचा मोठा कार्यक्रम हाती घेतला.

           बेलोरकर यांना गावठी बोर व रायवळ आंबा या झाडांचे सुधारित जातीत रूपांतर करून जिल्ह्यात सर्वांत जास्त संख्येने यशस्वी कार्यक्रम केल्याबद्दल घाटंजी तालुक्यामार्फत १९९०मध्ये पुरस्कार मिळाला. त्यांना कापूस महापणन संघातर्फे एच ४ कापसाच्या पीक स्पर्धेमध्ये विदर्भ विभागामधून प्रती हेक्टर ४३ क्विंटल ४७ किलो कापूस उत्पादन केल्याबद्दल मे १९९३मध्ये गौरवले.

           बेलोरकरांना त्यांच्या पत्नी विजयाताई यांनी जीवनभर उत्तम साथ दिलेली आहे. बेलोरकर होमिओपॅथिक डॉक्टर आहेत. ते बेलोरा गावामध्ये निःशुल्क औषधोपचार करतात. त्यांना महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांच्या जन्मदिनानिमित्त किसान सन्मान दिवसाच्या कार्यक्रमात उत्कृष्ट शेतकरी म्हणून सन्मानचिन्ह देऊन गौरवले आहे. बेलोरकर यांना स्वखर्चाने बेलोरा गावातील नदीवर मातीचा बंधारा टाकून ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ याचा यशस्वी प्रयोग केला. विदर्भामध्ये कोल्हापुरी बंधारा टाकून त्यांनी उत्तम प्रकारे पाणी व्यवस्थापन केले. बेलोरकर यांचे एक चिरंजीव डॉक्टर असून ते मोसंबीच्या १६०० झाडांची लागवड करून फलोत्पादनामध्येही भाग घेत आहेत. त्यांच्या एक सुनबाई काजू प्रक्रिया करण्याचा उद्योग करत आहेत व दुसऱ्या सुनबाईंनी सुगंधी वनस्पतीपासून तेल निर्माण करण्याच्या कारखान्याची स्थापना केली आहे.

 - प्रा. पद्माकर दत्तात्रेय वांगीकर

बेलोरकर, सुधाकर राजेश्वर