बीडकर, रामानंद बळवंतराव
रामानंद बीडकर महाराज यांचा जन्म पुण्यातील सरदार घराण्यात, माघ शुद्ध अष्टमीला, शके १७६० मध्ये झाला. त्यांचे वडील बळवंतराव हे पुण्याजवळील नांदुर्की किल्ल्यावर अधिकारी होते. त्यांचे पूर्वज अकबर बादशहाच्या दरबारात दिवाण होते. अक्कलकोट स्वामींच्या शिष्यपरंपरेतील एक थोर संत म्हणून रामानंद बीडकर महाराज यांचे नाव घेतले जाते. श्री रावसाहेब तथा बाबा सहस्रबुद्धे यांचे गुरू म्हणूनही बीडकर महाराजांना अनेक जण ओळखतात. बळवंतराव यांना प्रथम पत्नीपासून अपत्यप्राप्ती न झाल्याने त्यांचे दुसरे लग्न बार्शी तालुक्यातील व्यंकटराव कुलकर्णी यांची कन्या गंगूबाई हिच्याशी करण्यात आले. गंगूबाईंना दोन मुले व चार मुली झाल्या. यांपैकी ‘शेंडेफळ’ म्हणजे रामानंद. छोट्या रामानंदाला लहानपणापासूनच ईश्वराचे वेड होते. पुण्यातून पंढरीकडे जाणार्या वारकर्यांच्या पालखी सोहळ्यात ते आपल्या मित्रांना जमवून भाग घेत. असेच एकदा ते थेट पंढरपूरलाच गेले. त्यांना विठ्ठलाचे साक्षात्कारी दर्शन झाले. शालेय शिक्षणाचा योग मात्र त्यांच्या नशिबी नव्हता. पुण्यात शिक्षण झाले नाही म्हणून ते धुळ्याला गेले; पण तेथेही यश मिळाले नाही. धुळ्याहून ते नाशिक जवळील सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला गेले. तेथेही त्यांना देवीचे प्रत्यक्ष दर्शन झाले व तांबुलाचा प्रसाद म्हणून लाभ झाला.
सरदार घराणे, घरची श्रीमंती यांमुळे प्रारंभापासूनच अत्यंत विलासी, चैनी जीवन जगण्याची त्यांना सवय जडलेली होती. वडिलांचे निधन व मोठे बंधू घर सोडून गेल्याने रामानंदावर सर्व संसाराची जबाबदारी पडली. नगर जिल्ह्यातील देवीचे केडगावच्या रंगूबाई हिच्याशी रामानंदांचे लग्न झाले. वडिलोपार्जित संपत्ती संपल्याने रामानंद आर्थिक अडचणीत आले व सुगंधी वस्तूच्या व्यापारात त्यांनी लक्ष घातले.
ग्वाल्हेर, जयपूर, बडोदा, सातारा अशा राजघराण्यांशी त्यांचे व्यापारी संबंध आले व या व्यापारातून त्यांनी खूप पैसा मिळविला; परंतु सवयीप्रमाणे विलासी वृत्तीने तो सर्व उडविला. रत्नाची त्यांस उत्तम पारख असल्यामुळे त्या जोरावर त्यांनी सराफीचा व्यवसायही केला. एका साधूकडून त्यांनी किमयेची विद्याही मिळविली. सारी सुखे, सारे उपभोग घेऊन अखेर त्यांचे मन परमार्थाकडे ओढ घेऊ लागले. आपली इष्ट देवता मारुतीची कठोर उपासना केल्यानंतर मारुतीच्या दृष्टान्तानुसार त्यांना अक्कलकोटला जाण्याचा संकेत मिळाला. दृष्टान्तानुसार रामानंद अक्कलकोटला येऊन स्वामींना भेटले आणि पहिल्या भेटीतच त्यांना स्वामींची गुरुकृपा लाभली. तिसर्या भेटीत स्वामींनी रामानंदांना एक थप्पड लगावली आणि त्यासरशी रामानंदांची समाधी लागली. त्यानंतर स्वामींनी रामानंदांना नर्मदा परिक्रमा करण्याची आज्ञा केली, तसेच आता पुन्हा अक्कलकोटला येण्याची गरज नाही असे बजावले. गुरु आज्ञेनुसार रामानंदांनी निष्ठेने नर्मदा परिक्रमा केली. त्यांना नर्मदेचे साक्षात दर्शन घडून त्यांचा अंतर्बाह्य पालट झाला. रामानंद महाराजांनी पुढे अनेक शिष्यांना अनुग्रह दिला. पुढे पुण्यात मेहेंदळे मारुतीजवळ शनिवार पेठेतच महाराजांनी अखेरपर्यंत वास्तव्य केले.
नर्मदा परिक्रमेहून पुण्यात आल्यानंतर त्यांनी पत्नीला घेऊन काशी, प्रयाग, गया अशी त्रिस्थळी यात्रा केली. त्यानंतर पुण्यात येऊन पुनश्च औदुंबर, नृसिंहवाडी, कोल्हापूर, ज्योतिबा, पंढरपूर, आळंदी, देहू, चिंचवड अशी प्रदीर्घ तीर्थयात्रा केली. प्रत्येक ठिकाणी त्या-त्या देवदेवतांचा त्यांना साक्षात्कार प्राप्त झाला. त्यांच्यासारखा परमार्थ क्षेत्रात दुसरा दाता नाही असे रामानंद बीडकरांचे सार्थ वर्णन करतात. त्यांचा शिष्य परिवार मोठा होता. श्री रावसाहेब तथा बाबा सहस्रबुद्धे आणि दिगंबर महाराज हे त्यांचे अग्रणी शिष्य होते. त्याशिवाय वासुअण्णा भागवत, अण्णासाहेब गुप्ते, मुकुंदराव मोघे, श्रीधरपंत लिमये, लक्ष्मणराव बापट हेही रामानंदांच्या अधिकारी शिष्यवर्गातील प्रमुख शिष्य होते.
सिद्धावस्थेला पोहोचल्यावर सुमारे २५ वर्षे पुण्यात रामानंद महाराजांचे वास्तव्य होते; पण ते कटाक्षाने प्रसिद्धीपासून दूर राहिले. त्यांच्या उपदेशात गुरुनिष्ठेवर विशेष भर असे. निष्ठेमुळेच गुरुकृपेचा लाभ होतो व त्या योगे ज्ञान मिळते, धैर्य निर्माण होते आणि स्वार्थ-परमार्थ दोन्ही क्षेत्रांत हात घालाल तेथे फत्तेच होते. फत्ते झाली की पुन्हा दुप्पट वेगाने गुरुनिष्ठा वाढते, असे ते सदैव सांगत. पत्नी जानकीबाई (रंगूबाई) यांचे १९११ मध्ये निधन झाले आणि त्यानंतर त्यांची विरक्ती अधिकच वाढली. ‘आता आपले काही खरे नाही, आता आमचाही काही नेम नाही,’ अशी निर्वाणीची भाषा ते शिष्यांशी बोलताना वारंवार वापरू लागले. पत्नीच्या निधनानंतर कशीबशी दोनच वर्षे गेल्यावर अखेर फाल्गुन वद्य दशमीला, शके १८३४ मध्ये दोन प्रहरी रामानंद महाराज निजानंदी लीन झाले. पुण्याच्या शनिवार पेठेतील त्यांचे निवासस्थान हाच त्यांचा मठ आहे.