Skip to main content
x

भिडे, गोपाळ हरी

     भिडे गर्ल्स एज्युकेशन सोसायटीचे आद्य संस्थापक, स्त्रीस्वातंत्र्य आणि स्त्री शिक्षणाचे ज्वलंत पुरस्कर्ते, कट्टर समाजसुधारक, देशभक्त, गोरक्षण आणि गोसंवर्धन चळवळीचे सूत्रधार, तत्कालीन अनेक सामाजिक चळवळींचे आधारस्तंभ गोपाळराव हरी भिडे. भिडे कुटुंब हे मूळचे कोकणातील नेरळचे आहे. गोपाळराव भिडे हे बी.ए. एलएल. बी. झाले. त्यानंतर त्यांनी नागपुरात वकिलीचा व्यवसाय सुरू केला आणि अल्पशा कालावधीत ते एक नामांकित वकील म्हणून प्रस्थापित झाले. ते गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना तसेच गरजूंना सर्वतोपरी मदत करीत असत. विद्यार्थ्यांना पुस्तके देणे, त्यांची फी भरणे अशा प्रकारची मदत ते सढळ हाताने करीत असत. याशिवाय विविध प्रकारच्या सामाजिक कार्यात त्यांचा नेहमीच पुढाकार असे.

      त्यांची दूरदृष्टी आणि स्त्रीशिक्षणाची तळमळ याचेच प्रतिक म्हणजे नागपूर शहरातील ‘भिडे कन्याशाळा’ होय. गोपाळराव भिडे आणि मोरेश्वरराव पारधी यांनी १८७६ मध्ये आपल्या वाड्यातच ती सुरू केली. मुलींची वाढती संख्या आणि तत्कालीन देशभक्त मंडळींचा पाठिंबा घेऊन या शाळेला रीतसर अधिकृत स्वरूप देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचेच फळ म्हणजे १८७८ मध्ये झालेली ‘भिडे गर्ल्स एज्युकेशन सोसायटीची’ स्थापना होय.

       तत्कालीन मध्य प्रांत आणि वऱ्हाड प्रांतात स्त्रीशिक्षणाला चालना देणाऱ्या संस्थांचे सक्षम केंद्र निर्माण करणे हेच या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट होते. सुरुवातीच्या प्राथमिक शाळेचे विकसित रूप म्हणजेच आजचे बालक मंदिर, प्राथमिक विभाग, माध्यमिक विभाग, कनिष्ठ महाविद्यालय, क्रीडा विभाग, अभ्यासपूरक आणि अभ्यासेतर विभाग असणारे आजचे हे विद्यामंदिर होय.

       भिडे हे आपल्या अतिशय व्यस्त कार्यातून सवड काढून मुलींना शिकवीत असत. त्या काळात भारतात ब्रिटिश राजवट असल्यामुळे संस्थेला सतत आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. परंतु प्रस्तुत संस्थेचे काँग्रेसशी सलोख्याचे संबंध होते म्हणून १९२२ मध्ये नागपूर नगर काँग्रेस कमिटीने या संस्थेला ५०० रुपयांची देणगी दिली. एवढेच नव्हे तर त्यानंतरही काँग्रेस कमिटीने शाळेला बरेचसे फर्निचर दिले. मुलींच्या मनावर राष्ट्रप्रेमाचे संस्कार करण्याचे तसेच मुलींना चांगले शिक्षण देण्याचे कार्य ही संस्था सातत्याने करीत आहे.

       सुरुवातीला म्हणजे १८७६ मध्ये त्यांनी आपल्या घरीच शाळेला सुरुवात केली. नंतर बर्डीवरील मुख्य रस्त्यावर संस्थेसाठी पहिली इमारत बांधली. सद्यस्थितीत त्या इमारतीत बाल वर्गापासून प्राथमिक शाळेचे वर्ग भरतात. १९१७ मध्ये ही संस्थेची सरकारी नियमानुसार नोंदणी करण्यात आली. १९७५ मध्ये कनिष्ठ महाविद्यालय सुरू झाले. १९६३ मध्ये ‘बाँबे पब्लिक ट्रस्ट’ अंतर्गत ही संस्था नोंदणीकृत झाली.

        ‘भिडे कन्याशाळा’ हे विदर्भातील सर्वात जुने महिला विद्यालय आहे. मुलींसाठी शिक्षणाची सोय स्वतंत्रपणे उपलब्ध करून देणे, स्त्रियांना व्यक्तिमत्त्व विकासाच्या संधी, व पोषक वातावरण निर्माण करणे, त्यांना कर्तृत्वाची विविध दालने उघडून देणे ही गोपाळरावांची या संस्थेच्या स्थापनेची मुख्य उद्दिष्टे होती.

        गोपाळरावांनी ‘शीलं परं भूषणम्’ हे आपल्या संस्थेचे ब्रीदवाक्य निश्‍चित केले. त्यांनी चारित्र्य संपादन आणि चारित्र्य संवर्धन यांना प्राधान्य दिले.

        त्यांचा पिंड मुख्यतः सामाजिक कार्यकर्त्यांचाच होता. भारतीय जीवनात गोवंशाचे महत्त्व आणि योगदान लक्षात घेऊन त्यांनी गोवंश रक्षणासाठी आणि गोवध बंदीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. त्यांनी गोरक्षणाचे कार्य सुरू केले. त्यांनी हाती घेतलेले गोरक्षण कार्य नागपूर शहरातील ‘गोरक्षण संस्था’ किंवा मुंबई आणि आनंद यासारख्या मोठ्या शहरातील ‘गोधनालये’ एवढ्यापुरतेच मर्यादित नव्हते. त्यांनी गोहत्याविरोधी जनमत तयार करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी सभा-संमेलने आयोजित केली. गोमाता आणि गोवंश यांचे आपल्या जीवनात असणारे महत्त्व आणि उपयुक्तता लक्षात घेऊन प्रत्येक भारतीयाच्या मनात त्यांच्याविषयी अत्यंत आदर आणि सन्मानाची भावना असली पाहिजे असा त्यांचा आग्रह होता.‘गोहत्या विरोधी कायदा’ संमत झाला पाहिजे. यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केले.

       भारतीय उद्योगांचा विकास झाला पाहिजे आणि त्यामुळे भारतीयांच्या जीवनावश्यक गरजा भारतीय उद्योगातूनच तयार होणाऱ्या वस्तुंद्वारे भागविल्या गेल्या पाहिजेत. तसेच त्याद्वारे रोजगारनिर्मिती झाली पाहिजे ही गोपाळरावांची भूमिका होती. आर्थिक क्षेत्रात भारत स्वावलंबी व्हावा यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात स्वदेशीचा पुरस्कार केला. 

       राष्ट्रीय उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी ‘स्वदेशी सूतगिरणी’ सुरू केली होती. काळाची पाऊले ओळखून त्यांनी सूतकताईला यंत्राचा आधार दिला. पुढे टाटा उद्योग समूहाने गोपाळरावांचा प्रयत्न उचलून धरला. ‘एम्प्रेस मिल क्रमांक - ५ च्या’ रुपाने आजही तो उपक्रम विकसित स्वरूपात आपणास पहावयास मिळतो.

       त्यांनी स्वतः संपादित केलेल्या या भूप्रदेशात उत्कृष्ट संत्री आणि जातिवंत आंबा यांची पैदास करून ती फल संपत्ती परदेशात पाठवावी आणि नागपुरात ही फळांची आंतरराष्ट्रीय बाजारपेठ व्हावी अशी त्यांची मनापासून इच्छा होती. त्यावेळी नागपूरात विमान वाहतूक नसतानासुद्धा त्यांच्या मनातले हे विचार किती धाडसी होते याची आपणाला कल्पना येते.

       ही फळबाग चांगल्या प्रकारे विकसित व्हावी यासाठी पाण्याचा सतत पुरवठा व्हावा यासाठी त्यांनी सध्याच्या बाजीप्रभू नगरात एक तलाव बांधला होता. तो तलाव त्यावेळी ‘भिडे तलाव’ या नावानेच प्रसिद्ध होता.

        त्यांच्या कार्याने नागपूर शहरात आणि विदर्भ विभागात स्त्रीशिक्षणाचे आणि मुलींच्या व्यक्तिमत्त्व विकासाचे एक चिरंतन दालन खुले झाले.

- सु. ना. बोधनकर

भिडे, गोपाळ हरी