Skip to main content
x

भोंसुले, अनंत आत्माराम

            निसर्गचित्रण व भारतीयत्व जपणाऱ्या ‘बॉम्बे रिव्हायव्ह-लिस्ट स्कूल’ या कलाचळवळीचे एक चित्रकार, जे.जे. स्कूलमधील उत्तम शिक्षक व दर्जेदार व्यक्तिचित्रण करणारे मनस्वी कलावंत म्हणून ‘भोंसुले मास्तर’ प्रसिद्ध होते. हिंदू सारस्वत असलेले अनंत आत्माराम भोंसुले घराणे मूळचे गोव्यातील रायबंदरचे. अनंत हे नऊ मुलांमधील सर्वांत धाकटे अपत्य होते. त्यांच्या जन्मानंतर दोन वर्षांतच त्यांच्या आईचे निधन झाले. वडील गणपतीच्या मूर्ती करीत व किराणामालाचे दुकान चालवीत. लहानगा, खोडकर अनंत मिळेल त्या साधनाने गणपतीची चित्रे काढी व मूर्तीही तयार करण्याचा प्रयत्न करी. त्यातूनच अनंतला दृश्यकलेबाबत आवड निर्माण झाली.

त्या काळी गोव्यात पोर्तुगीज राजवट होती. त्याचे शालेय शिक्षण सुरू झाले आणि पाच-सहा वर्षांतच एका दुर्दैवी घटनेमुळे ते संपुष्टात आले. एकदा अनंतच्या वर्गात त्याच्या बाजूलाच बसणारा एक ख्रिश्‍चन विद्यार्थी हिंदू धर्माबद्दल काही अपमानकारक शब्द बोलला. हे ऐकून स्वतःच्या धर्माबद्दल अभिमान असणाऱ्या अनंतने संतापून लिहिण्याचा टाक त्याच्या डोक्यात खुपसला. टाकाचे टोक डोक्यात घुसले व भळभळा रक्त वाहू लागले. या प्रसंगामुळे अनंतला शाळेतून काढून टाकण्यात आले व त्याचे शालेय शिक्षण थांबले. काहीच उद्योग नसल्यामुळे अनंत हुंदडणे, खेळणे व लहर लागेल तेव्हा गणपतीच्या मूर्ती करण्यात वेळ घालवू लागला. घरच्यांना त्याच्या भवितव्याबद्दल काळजी वाटू लागली. याच दरम्यान त्याचे वडीलबंधू विष्णू आत्माराम भोंसुले नोकरीनिमित्त मुंबईस आले. त्यांनी आपल्या या सर्वांत धाकट्या भावाला शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीस मुंबईत आणण्याचा निर्णय घेतला.

त्या काळी पावसाळ्यापूर्वी बोटीचा प्रवास बंद होत असे व गोव्याहून मुंबईस येणे कठीण होई. त्यामुळे रायबंदरहून अनंतला त्याची आत्या बेळगावपर्यंत बैलगाडीतून घेऊन आली व त्यानंतर कोल्हापूरमार्गे अनंत मुंबईस पोहोचला. मुंबईत आल्यावर दिवसा कलाशिक्षणासाठी आवश्यक असलेल्या फर्स्ट व सेकंड ग्रेड या चित्रकलेच्या दोन परीक्षांचा अभ्यास आणि नाइट स्कूलमधील शिक्षण सुरू झाले.

अंदाजे १९१६ च्या दरम्यान या परीक्षा देऊन अनंतने सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये शिल्पकला विभागात प्रवेश घेतला. त्या वेळी सेसिल बर्न्स हे जे.जे.चे प्राचार्य होते. त्या काळात बॉम्बे आर्ट सोसायटीचे वार्षिक प्रदर्शन ही कला क्षेत्रातील फार मोठी घटना होती. हे प्रदर्शन अनंत भोंसुले यांनी बघितले व या घटनेमुळे ते शिल्पकलेचे क्षेत्र सोडून चित्रकलेकडे वळले. या प्रदर्शनात जे.जे.त शिक्षक असणाऱ्या धुरंधर, आगासकर, त्रिंदाद या शिक्षकांची चित्रे बघून हा तरुण विद्यार्थी कमालीचा प्रभावित झाला. सोनेरी किंवा लाकडाच्या चकचकीत, पॉलिश केलेल्या फ्रेममधील ती तैलरंगातील वास्तववादी पद्धतीची चित्रे बघून भोंसुलेंना चित्रकार व्हावेसे वाटू लागले. आता शिल्पकला विभागातील त्यांचे लक्ष उडाले. अशा अस्वस्थ मन:स्थितीत असतानाच ते गोव्यातील चित्रकार व जे.जे.तील शिक्षक त्रिंदाद यांना जाऊन भेटले व त्यांना आपली व्यथा सांगितली. त्रिंदाद यांनी भोसुलेंची चित्रे बघून प्राचार्य सेसिल बर्न्स यांना त्याची कथा सांगितली. परिणामी, अनंत भोंसुले यांचे शिल्पकला विभागाऐवजी चित्रकला विभागात शिक्षण सुरू झाले.

अल्पावधीतच त्यांनी सर्व विषयांत नैपुण्य दाखवण्यास सुरुवात केली व हुशार विद्यार्थी म्हणून त्यांची ख्याती पसरली. पुढे १९१९ मध्ये सेसिल बर्न्स निवृत्त होऊन त्या जागी कॅप्टन ग्लॅडस्टन सॉलोमन यांची जे.जे.चे संचालक म्हणून नियुक्ती झाली. त्यांनी जे.जे.तील कलाशिक्षणाला नवीन दिशा दिली. डिसेंबर १९१९ पासून प्रत्यक्ष नग्न मॉडेल समोर बसवून अभ्यास व म्युरल डेकोरेशनचा खास वर्गही सुरू केला. भोंसुले व त्यांच्या समकालीन विद्यार्थ्यांना या दोन्ही वर्गांचा फायदा मिळाला.

व्यक्तिचित्रणासोबतच सॉलोमन यांनी १९१९ च्या दरम्यान कलेतील भारतीयत्व जपणाऱ्या ‘बॉम्बे रिव्हायव्हलिस्ट’ या कलाचळवळीची सुरुवात केलीहोती. भोंसुले यांनी या कलाशैलीतही प्रावीण्य मिळविले. याशिवाय व्यक्तिचित्रणातही त्यांची स्वतःची अशी शैली विकसित होऊ लागली. परंतु बॉम्बे रिव्हायव्हलिस्ट स्कूलचे वैशिष्ट्य असणार्‍या ‘वॉश टेक्निक’ या तंत्रात ते फारसे रमले नाहीत. तैलरंग हेच माध्यम व्यक्तिचित्रे व भारतीयत्व जपणाऱ्या रचना- चित्रांसाठीही ते वापरू लागले.

जी.डी.आर्ट ही पदविका ते १९२२ मध्ये उत्तीर्ण झाले. त्या वर्षी डिप्लोमा इन ड्रॉइंग अ‍ॅण्ड पेंटिंग ही परीक्षा प्रथमच घेतली गेली होती. या परीक्षेला चार विद्यार्थी बसले होते व त्यांत भोंसुले यांच्या सोबत नगरकर, फर्नांडिस व एन.एल. जोशी यांचा समावेश होता. त्यांना कलाशिक्षणात सातत्याने प्रावीण्य दाखविणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणारे मानाचे ‘मेयो पदक’ देण्यात आले.

त्यानंतर भोंसुले यांनी नुकत्याच सुरू झालेल्या म्युरल डेकोरेशन क्लासमध्ये शिक्षण घेण्यास सुरुवात केली. या वर्गातील विद्यार्थ्यांकडून १९२० मध्ये जे.जे. स्कूलच्या पहिल्या मजल्यावरील सेंट्रल हॉलच्या पश्‍चिमेकडील भिंतीवर ‘द रिक्राउनिंग ऑफ इंडिया’ या नावाचे १६ फूट ९ इंच × ३० फूट ८ इंच आकाराचे भव्य तैलचित्र रंगविण्यात आले. त्यात भोंसुले यांचा सहभाग होता. हे काम बघून तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड लॉइड यांनी जे.जे.च्या म्युरल क्लासच्या विद्यार्थ्यांना मुंबईच्या राजभवनामधील दरबार हॉलच्या सजावटीचे काम दिले, त्यातही भोंसुले यांचा समावेश होता.

इंग्लंडमधील वेम्बले येथे १९२४ मध्ये जानेवारीमध्ये ब्रिटिश एम्पायर एक्झिबिशन करण्याचे ठरले. त्यात जगभरच्या इंग्रज साम्राज्यातील कलासंस्थांसोबत जे.जे. स्कूललाही आमंत्रित करण्यात आले होते. त्यासाठी चित्र, शिल्प, लाकडी व धातूंच्या कलाकुसरीच्या वस्तू आणि पडदे यांनी युक्त ‘इंडियन रूम’ पाठविण्यात आली होती. या इंडियन रूमच्या प्रमुख पॅनलवरील ‘गणपती प्रोसेशन’ हे भोंसुले यांनी रंगविलेले ६ फूट × ३ फुटांचे चित्र अत्यंत गाजले. त्यासाठी त्यांना मुंबईच्या गव्हर्नरकडून सुवर्णपदक देण्यात आले.

या चित्रात गणपतीची भली मोठी मूर्ती व ती असलेला गाडा खेचणारे श्रमिक दिसतात. गणपतीच्या पाठीमागे हातात नैवेद्याचे, फळांचे तबक घेतलेली स्त्री व त्यामागे हातातल्या मशालीवर बुधलीतून तेल ओतणारा पगडीधारी पुरुष दिसतो. गणपतीपुढे विविध आविर्भावातील लहान मुले व मुली असून एका मुलीच्या हातात फुलांची माळ आहे, तर एक लहानगा मुलगा मोठ्या उत्साहाने गणपतीची गाडी ढकलतो आहे. पुढील बाजूस नृत्य करणारे, शिंग फुंकणारे भक्त असून मागील बाजूस स्त्री-पुरुषांचा जमाव आहे. त्यांतील कोणी चवरीने वारा घालत आहे, तर एक स्त्री आपल्या लहान मुलाला कडेवर घेऊन या मिरवणुकीत सहभागी झाली आहे. रचनेच्या दृष्टीने अत्यंत गतिमान असलेल्या या चित्रात पाश्‍चिमात्य रेखन व सपाट रंगांमधून अत्यंत प्रभावी आविष्कार केला आहे.

बाघ येथील गुंफामधील चित्रांच्या प्रतिकृती करण्यासाठी १९२४ च्या सुमारास भारतातील काही चित्रकारांची निवड करण्यात आली होती. त्यांत नंदलाल बोस, असितकुमार हलधर यांच्या सोबतच जे.जे.तील एन.एल. जोशी व भोंसुले यांना आमंत्रित केले होते. हे काम त्यांनी यशस्विरीत्या पूर्ण केले. या काळात भोंसुल्यांच्या लक्षात आले, की अजिंठा व बाघ येथील उत्कृष्ट कलाकृतींवर चित्रकारांनी आपली नावे लिहिली नाहीत. भारतीय चित्रकारांच्या अनामिक राहण्याच्या या परंपरेस अनुसरून त्यांनी काही काळ स्वतःच्या चित्रनिर्मितीवर नावे टाकली नाहीत. बाघहून परतल्यानंतर १९२४ मध्ये भोंसुले यांची सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये शिक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली. भोंसुले व्यक्तिचित्रण व मानवाकृतींवरून रेखाटन शिकवू लागले.

जे.जे. स्कूलला १९२७ मध्ये दिल्ली येथील इंपीरिअल सेक्रेटरिएट मधील  भित्तिचित्रांचे प्रतिष्ठेचे काम मिळाले. त्यातील इमारतीच्या अर्धवर्तुळाकार घुमटाच्या आतील बाजूस काढलेल्या चित्रातील ‘गांधार पीरियड’ हे चित्र भोंसुले यांनी रंगविले. ही एक पंखधारी स्त्री असून तिचा चेहरा व हस्तमुद्रा यांतून गांधार शैलीची वैशिष्ट्ये व्यक्त होेतात. अशा प्रकारे भोंसुले यांनी बहरात असलेल्या भारतीय कलामूल्ये जपणाऱ्या बॉम्बे रिव्हायव्हलिस्ट कलाशैलीत वेळोवेळी चित्रनिर्मिती केली असली तरी ते तैलरंगात व्यक्तिचित्रे रंगवण्यातच जास्त रमत. त्यांनी रंगविलेल्या अशा चित्रांत ‘सेल्फ पोट्रेट पासून नातेवाईक, परिचित व प्रसंगी मॉडेल बसवून केलेली अनेक व्यक्तिचित्रे आहेत. दरम्यानच्या काळात त्यांनी त्यांचे चहाते व मार्गदर्शक ग्लॅडस्टन सॉलोमन यांचे एक अप्रतिम व्यक्तिचित्र रंगविले. जे.जे. स्कूलच्या संग्रहात असलेल्या या अफलातून व्यक्तिचित्राने पुढील काळात अनेक तरुण चित्रकारांना प्रेरणा दिली. या चित्रात सॉलोमन यांचा गौरवर्ण, तकाकणारा भालप्रदेश, करारी निळे डोळे, फुगीर गाल व मिष्किल हसणारी बारीक जिवणी अत्यंत उत्स्फूर्तपणे व सहजतेने रंगवली आहे. आजही हे चित्र भोंसुले मास्तरांचे निर्दोष तंत्र व उत्स्फूर्त हाताळणीचे एक उत्तम उदाहरण आहे.

त्यांनी मुंबईतील मुंबई महानगरपालिकेसारख्या काही संस्थांसाठी व्यावसायिक व्यक्तिचित्रे रंगविली. परंतु त्यांच्या समकालीन इतर कलावंतांप्रमाणे ते व्यावसायिक व्यक्तिचित्रणापेक्षा त्यांच्या कलात्मक व्यक्तिचित्रणासाठी प्रसिद्ध होते. त्यासाठी ते त्यांच्या ब्रशना विशिष्ट प्रकारचा आकार, विशिष्ट प्रकारे रंग लागावा म्हणून देत असत. विद्यार्थ्यांना मानवाकृती काढण्यापासून व्यक्तिमत्त्व व्यक्त करणाऱ्या चित्रापर्यंत नेण्यासाठी मार्गदर्शन करीत असतानाच, ब्रश बनविण्याचे तंत्रही ते शिकवीत.

कलाविचारातील त्यांची जाण व चित्रकलेचे तंत्र यां बाबतीत ते त्या काळात इतर कलावंतांपेक्षा प्रागतिक विचारांचे होते. त्या काळात सर्वसाधारणपणे व्यक्तिचित्र असो की रचनाचित्र, बारीक सारीक बारकावे व अलंकरण करण्याची तत्कालीन भारतीय कलावंतांची प्रवृत्ती होती. परंतु भोंसुले मास्तरांनी अशा प्रकारच्या अलंकरण व बारीकसारीक बारकाव्यांत हरवून न जाता, साध्या, सौष्ठवपूर्ण मानवाकृती व काहीसा उत्स्फूर्त आविष्कार असणारी व्यक्तिचित्रे रंगविण्यास  सुरुवात केली. त्याचा पुढील काळातील कलावंतांवर परिणाम होऊन ते अधिकच उत्स्फूर्तपणे चित्रनिर्मिती करू लागले. ‘दिसते तसे यापेक्षा जाणवते तसे’ याकडे चित्रांचा प्रवास अशा प्रयत्नातूनच सुरू झाला.

त्या काळातील पगडी, धोतर व कोट घालणार्‍या इतर शिक्षकांपेक्षा त्यांची राहणी आधुनिक पद्धतीची असे. रुबाबदार व्यक्तिमत्त्वाचे भोंसुले मास्तर कोट, पँट घालून कधी टाय, तर कधी लाल रंगाचा ‘बो’ लावत. त्यांची प्रकृती संथ, वृत्ती कलावंताची व काहीशी आळशी होती असे त्यांच्या समकालीनांनी नोंदवून ठेवले आहे. या संथ प्रवृत्तीमुळे त्यांच्या हातून कलानिर्मिती कमी झाली व त्यामुळेच कलावंत म्हणून त्यांची प्रसिद्धीही कमीच झाली.

मूक-बधिर व्यक्तीबद्दल त्यांना आपुलकी होती. त्यामुळेच त्या काळात सतीश गुजरालसारख्या विद्यार्थ्यांशी ते हाताच्या खाणाखुणांनी संवाद साधत. मानसिक रुग्ण झालेले चिमुलकर असोत, की आधुनिक आविष्काराच्या मार्गावरचे सूझा, लक्ष्मण पै किंवा गायतोंडे यांच्यासारखे बंडखोर विद्यार्थी, भोंसुले मास्तर त्यांना समजावून घेत व समजावून सांगत. ते म्हणत, ‘‘प्रथम शिकत असलेली यथार्थदर्शी अकॅडमिक कला समजून घ्या व त्यानंतरच इंप्रेशनिस्ट, एक्स्प्रेशनिस्ट किंवा अमूर्त असे प्रयोग करत स्वतःची शैली विकसित करा.’’

सर जे.जे.स्कूल ऑफ आर्टच्या पेन्टिंग विभागाचे प्रमुख म्हणून ते १९५३ मध्ये निवृत्त झाले. भारतातील चित्रकलेने स्वातंत्र्योत्तर काळात आधुनिक वळण घेतले, परिणामी महाराष्ट्रातील कलाजगताने भोंसुल्यांच्या आधीच्या, भोंसुले आणि त्यांच्या नंतरच्या काळातील कलावंतांच्या कलेची योग्य ती दखल घेतली नाही. पण या सर्वांनीच आधुनिक दृष्टिकोनाकडील वाटचाल सुरू होण्यात महत्त्वाची भूमिका बजावली असल्यामुळे जे.जे.स्कूलचे, पर्यायाने बॉम्बे स्कूलचे वैशिष्ट्य असणाऱ्या व्यक्तिचित्रण कलापरंपरेत अनंत आत्माराम भोंसुले या चित्रकाराचे स्थान महत्त्वपूर्ण आहे.

- सुहास बहुळकर

भोंसुले, अनंत आत्माराम